Saturday, April 19, 2025

मुंबई ते बनारस ते मुंबई - काही नोंदी - २ - ट्रेन प्रवास

 


एकदा तरी यूपी बिहार ला जाणाऱ्या ट्रेन ने किंवा मुंबईहून यूपी बिहार ला येणाऱ्या ट्रेन ने छत्तीस तास प्रवास करावा माणसाने . काय काय अनुभव येतील तुम्हाला सांगतो, फक्त निरीक्षण करत रहावं.

भांगेत सिंदूर आणि ओठांना लिपस्टिक लावून डोक्यावर पदर घेतलेल्या बायका 

दिवसभर तोंडात पान किंवा जर्दा किंवा तमाखु किंवा नुसती सुपारी चघळत राहणारे त्यांचे “ए जीऽऽ” 

पहिली दीदी , मग दुसरी बेबी झाल्या नंतर फार नवसाने झालेल्या “छोटे सरकार “ ला सांभाळत बसणाऱ्या बायका

ए बाबू , ए लड्डूगोपाल म्हणत त्या छोटे सरकार ला सांभाळणारी दीदी तर ए लडके, ए छुटकू म्हणत त्याचे गाल ओढणारी बेबी 

प्रत्येक सीट वर पुरी सब्जी , सत्तू की मठरी आणि आचार आणि मसाला मरमारा यांचा दिवसभर चाललेला रतीब, 

अख्खा संसार मुंबईला घेऊन चाललेले नव वधू आणि वर आणि त्यांच्यासोबत एखादी म्हातारी , संसार लावून द्यायला. 

“बडे चाचा को मीरा रोड में पार्किंग का काँट्राक्ट मिला है तो उन्होने बुला लिया “ म्हणत पहिल्यांदाच गाव सोडणारे , तर दोन तीन पिढ्या मुंबईत राहून , अस्खलित मराठीत बोलणारे , गावाशी बऱ्यापैकी नाळ तुटलेले पण तरीही एखाद दोन वर्षातून एकदा गावाला जाणारे.  

मग ते आपल्याला सांगतात , “आमचं कसं रे , लहानपणापासून शेजार पाजार, मित्र मंडळी सगळे मराठी. आता माझी मराठी ऐकून कोणाला वाटणार पण नाही माझं आडनाव गुप्ता आणि गाव मिर्झापूर ते . गावाला जायला नको वाटतं रे . तुला सांगतो हे लोक जेवढे गलिच्छ मुंबईत राहतात ना त्याच्यापेक्षा दहापट गलिच्छ गावात राहतात . दिवसभर नुसतं ते पान तंबाखू खात इथं तिथं थुकत रहायचं. पोरांना तर अजिबात आवडत नाही पण काय करणार वडिलांच्या नावावर जमीन आहे चुलत्याचा डोळा आहे लक्ष ठेवायला जायला लागतं.” आपण मनात विचार करतो चायला हा तर आपल्यापेक्षा कट्टर मराठी निघाला . 


ट्रेन पुढे सरकत राहते . 

“अब मुंबईमें आना और बस जाना उतना सहज भी नही रहा. वो ही आ सके अब मुंबई में जिसका कोई अपना रिश्तेदार यहा हो या फिर अच्छी खासी जॉब लगी हो . अब हमारे गांव से ज्यादातर लोग गुजरात वगैरा जाते है” 

बाजूच्या सिट वरचा खोकणारा म्हातारा त्याला अनुमोदन देतो. तेवढ्यात त्या म्हाताऱ्याची सून त्याला औषध आणून देते. “ये लिजिये पापा. आधे घंटे बाद मनोज खाना लेके आयेगा” म्हणत. ती गेल्यावर म्हातारा म्हणतो , “ ये हमार छोटकी बहुरानी. मराठी है. दुई महिना  हुआ है शादी को . पहली बार गांव लेके गये थे इस वक्त. शादी तो बंबई में ही किए थे क्यूँकी”

मग त्याच्यात आणि अजून एका जणात अस्खलित भोजपुरी मध्ये मराठी लोकांची लग्न कशी सुटसुटीत एका दिवसात आटोपतात आणि आपल्याकडे गावाकडे कसं अगदी चार -पाच दिवस वेळ, पैसा , फुकटचे मानपान, हुंडा वगैरे असं सगळं करायला लागतं यावर दहा मिनिट चर्चा होते.


एकूणात उत्तर भारतीयांवद्दल मनात राग नसेल तर छत्तीस तासांचा मुंबई - वाराणसी - मुंबई पर्यंतचा प्रवास व्यवस्थित होऊ शकतो.


शेंडी ठेवलेला एखादा पंडित , “अब आये हो तो अयोध्या भी हो आओ पुण्य मिलेगा “ असं सांगतो. एखादा कुशवाह, मोदीजीनी किती systematically मायावतींची SC -ST वोट बँक तोडत आणि ओबीसी ना आपल्या बाजूला खेचून घेत मुस्लिम -यादव समीकरणाची आणि पर्यायाने अखिलेश मुलायम ची कशी जिरवली हे सांगतो.


वाराणसी , बलिया , जौनपूर , भदोही , इलाहाबाद , मिर्जापुर, बरैली, गोरखपूर. 

यू पी , बिहार ला जाणाऱ्या कोणत्याही ट्रेन मध्ये बसलात तरी ही अशी दृश्यं, अशी माणसं दिसतातच , भेटतातच. 

आपण फक्त कान , डोळे आणि मन उघडं ठेवायचं. मुंबईसारखं. सगळ्यांसाठी, सदैव . 


- अभिषेक राऊत 

Tuesday, February 25, 2025

बनारस - काही नोंदी. - काशी विश्वनाथ मंदिर आणि कॉरीडोर वगैरे.

“नमामी शमिशान निर्वाणरूपम, विभू व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम …”


संतकवी तुलसीदासने लिहिलेलं रुद्राष्टकम धीरगंभीर आवाजात सुरू असतं आणि काशी विश्वेश्वराच्या मंदिरातली रांग हळू हळू पुढे सरकत असते. 

देवाच्या रांगेत असताना डोळे मिटून नामस्मरण वगैरे करावं म्हणतात. पण मला ते जमत नाही . मी डोळे अगदी उघडे ठेवतो. त्याने अनेक गोष्टी अशा दिसतात ज्या दिसू नयेत म्हणून कदाचित भगवंताने डोळ्यावर पट्टी बांधून घ्यावी. 

मंदिरात जायला अनेक मार्ग आहेत पण सगळ्यात प्रशस्त मार्ग घाटाच्या समोरचा. जिथून काशी विश्वनाथ कॉरिडोर आहे तो. 

गंमत बघा . आधी म्हणजे खूप खूप आधी फक्त गंगा होती . मग मंदिर झालं, घाट झाले , मंदिराभोवती , मंदिराला लागून घरं झाली , वस्ती झाली अगदी दाट . मग मंदिर भ्रष्ट झालं , पिंडीवर घाला घातला गेला , मशीद उभी राहिली , काळाच्या ओघात मंदिर पुन्हा उभं राहिलं. पुन्हा आजूबाजूला तशीच दाट वस्ती , घरं, दुकानं सगळं तसंच. मंदिरात मंत्र म्हटले जाऊ लागले आणि मशिदीत शुक्रवारचे नमाज. मग मशिदीतल्या वादग्रस्त भागाला कुलूप लावण्यात आलं. मग मंदिराला भव्य दिव्य बनवण्यासाठी कॉरिडोर झाला. कॉरिडोर म्हणजे काय तर मंदिराचं नूतनीकरण. आजूबाजूची घरं, दाट लोकवस्ती , दुकानं हे सगळं योग्य मोबदला देऊन हटवून मंदिराचं प्रशस्तीकरण. रांगेत उभं राहिल्यावर  मंदिर प्रांगणाचा प्रशस्तपणा दिसतो , भव्य काशी , दिव्य काशी चे स्लोगन्स दिसतात. भारतमातेचा पुतळा आहे मंदिर प्रांगणात. शिवाय इतर ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती असलेली छोटी मंदिरे, सगळं चकाचक , सुंदर. कौतुक करायचं फक्त. 


रांग पुढे पुढे सरकत राहते. पुढे मागे एखादा बनारसीया असतोच. हातात दुधाचा प्याला आणि बेलपत्र. “पैतीस साल से आ रहे है. रोज. दूध चढाते है और पत्री. फिर निकल जाते है रोज के कामकाज को. अब तो खैर मोदीजी ने सब बदल दिया. लेकिन आच्छा है. बदलाव होना चाहिये. दो चार घर दुकाने टूटी है लेकिन उसका पैसा भी बोहोत दिये है सरकार. इसिलिये तो जिताया मोदीजी को. वापस जितायेंगे. मंदिर तो खूब बढिया बन गया अब. लेकिन भगवान का असल स्थान तो आज भी भ्रष्ट है. भोलेबाबा चाहेंगे तो वो भी शुद्ध होगा. “ मग आपण विचारायचं, “भोलेबाबा या फिर मोदी और योगी बाबा ? “. मग तो फक्त हसतो. 

रांग पुढे सरकत राहते. 

मंदिराला भव्य दिव्य बनवताना झालेल्या घरांच्या , दुकानांच्या पडापडीचे अवशेष आहेत थोडेफार आजूबाजूला. रांगेतून ते दिसतात. साधारणपणे तीनशे घरं, त्यापेक्षा दुप्पट दुकानं, बरीचशी छोटी मोठी मंदिरे सुद्धा आणि जवळपास ६०० परिवार याना आर्थिक मोबदला देऊन हटवण्यात आलं आणि मंदिर प्रशस्त केलं गेलं. स्वच्छ, सुंदर केलं गेलं. त्यातही आता चार वर्षं झाली. भाविकांची संख्या आता वाढलीये. काशी मध्ये या आधी भाविक येत होतेच पण आता त्यांची संख्या दुप्पट, तिप्पट  झालीय. रांग पुढे सरकत राहते. 

“क्या सोच रहे हो भय्या??” बनारसिया पुन्हा गप्पा मारायला चालू करतो. “कुछ साल पहले ऐसे पिंडी को हाथ लगाकर दूध चढाते थे. अब थोडा दूर से. मंदिर जितना बडा हो जाये, भगवान उतना दूर से देखना पडता है. लेकीन सही है , मोदीजी इतना सुंदर मंदिर बनाये, सनातन धर्म का डंका बज रहा है विश्व में. और क्या चाहिये ?? 

और रही बात बाबा की , तो बाबा विश्वनाथजी तो दिल में है हमारे” . 

रांग पुढे सरकत राहते.

आपण कधी पिंडीच्या समोर उभे राहिलो आणि कधी पुजाऱ्याने आपल्याला ओढून बाजूला केलं हे आठवत नाही . मग मी मंदिराच्या प्रांगणात सावलीखाली शांत बसतो. ज्ञानवापी मशिदीकडे कडे तोंड करून असलेल्या नंदीकडे बघत बसतो. 


आज दोन महिने झाले. आज महाशिवरात्र. मी आठवून आठवून थकलो पण मला अजूनही विश्वनाथाच्या मंदिराचा गाभारा आठवत नाही किंवा पिंड सुद्धा आठवत नाही.

मला फक्त आठवतात बनारसच्या त्या सामान्य माणसाचे शब्द. “विश्वनाथजी तो दिल मे है हमारे. और क्या चाहिये”.  


-अभिषेक राऊत 





Friday, February 14, 2025

प्रयागराज , ७,८,९ फेब्रुवारी २०२५.


आयुष्यात कधी मी कुंभ मेळ्याला जाईन असं वाटलं नव्हतं. 
 डोंबिवलीतल्या टिपिकल मध्यमवर्गीय घरात मी वाढलो. देवाबद्दल श्रद्धा असली तरी देवभोळेपणा वगैरे नव्हता. 

शिवाय वडिलांचे विचार बऱ्यापैकी धर्मनिरपेक्ष आणि थोडेफार समाजवाद वगैरे कडे झुकणारे. अनेक वर्ष , “गंगेत स्नान केल्याने पुण्य पदरात पडेल याची शाश्वती नाही मात्र दोन चार त्वचेचे रोग नक्की होतील” असं माझं ठाम मत होतं. (अजूनही आहे ). इतकंच काय , दोनेक महिन्यांआधी वाराणसीला गेलेलो तेव्हा वडील म्हटलेले, जातोच आहेस तर अलाहबाद ला जाऊन ये. नेहरुंचं “आनंद भवन “ पाहण्यासारखं आहे. संगम वगैरेला त्यांच्या लेखी फार महत्व नव्हतं.  


पण मी ठरवलं की जायला पाहिजे , बघायला पाहिजे , अनुभवायला पाहिजे. एक दिवस का होईना , जीवाचा कुंभमेळा केला पाहिजे. 


तर आता , मी पाहिलेल्या कुंभ मेळ्याची कहाणी… 


समुद्र मंथन झालं आणि त्यातून अमृत बाहेर आलं. अमृताने भरलेला घडा म्हणजेच कुंभ जसजसा  समोर दिसू लागला तसं देव आणि दानवांमध्ये त्यावरून जुंपली. त्यांच्या खेचाखेचीत त्या कुंभातून अमृताचे चार थेंब चार ठिकाणी पडले. पुढे विष्णूने मोहिनी नावाच्या सुंदर स्त्रीचं रूप घेऊन राक्षसांना वेड्यात काढत सगळं अमृत देवांना पाजलं. 

पण ज्या चार ठिकाणी हे अमृताचे थेंब सांडले तिथे , म्हणजे हरिद्वार , इलाहाबाद , नाशिक आणि उज्जैन या ठिकाणी एका विशिष्ट तिथीला स्नान केलं की त्याचं पुण्य अमृत स्नानाएवढं मानलं जाऊ लागलं. आणि तिथे भरू लागले अर्ध कुंभ , पूर्ण कुंभ आणि महा कुंभ . दर काही वर्षांनी आलटून पालटून. 

आता ही गोष्ट खरंतर एखादी फँटसी कथा वाटेल पण 

धर्माची ताकद काय असते तर एरवी एखाद्या फँटसीच्या पुस्तकात शोभेल अशा गोष्टीला धर्माची , पाप-पुण्याची आणि थोडीफार देवाच्या भीतीची जोड दिली की त्या गोष्टीवर पिढ्यानपिढ्या , हजारो वर्षं लोक विश्वास ठेवतात. प्रयागराजच्या रस्त्यावरून गंगा आणि यमुनेच्या संगमाकडे जाताना धर्माच्या या ताकदीचा प्रत्यय पावलागणिक येत जातो. 

संगम -

 गंगा आणि यमुनेचा. दोन महत्वाच्या नद्या. भारताची आणि त्यातही उत्तर भारताची  संस्कृती या दोन नद्यांभोवती विणली गेलीये.

कितीतरी गोष्टी , गाणी , मिथकं या नद्यांबद्दल जनमानसात रुजली आहेत. 

तर संगम…. एका बाजूला यमुना , भगवान कृष्णाच्या बालपणीच्या लीला बघितलेली, तिच्याच डोहात उतरून कृष्णाने कालियामर्दन केलं, गवळणींच्या मडक्यातलं दही दूध लोणी खाल्लं अशी कृष्णलीलांची साक्षीदार यमुना. तर दुसऱ्या बाजूला गंगा. साक्षात भगवान शंकराने जटेत धारण केलेली, फक्त भगीरथाच्याच नाही तर अख्ख्या भारतभूमीच्या उद्धारासाठी स्वर्गातून पृथ्वीवर आलेली गंगा , गंगामैया.  आणि गुप्तपणे वाहणारी सरस्वती. त्रिवेणी संगम. 

होडीतून संगमाकडे जायचं. लाकडी होड्या , एका होडीत ८-१० जण. होडीवाला तुमच्या तोंडाकडे बघून सांगतो , माणशी हजार रुपये. त्याला माहीत असतं कोणाला काय भाव सांगायचा. 

त्याच्या मागच्या कित्येक पिढ्यांनी श्रद्धाळूना गंगापार सोडलं असेल. केवट जातीचे हे लोक. पिढ्यांपिढ्या गंगेत नाव चालवून पोट भरणारे. त्यांचा आद्य निषादराज. श्रीराम वनवासात निघाले तेव्हा त्यांना शरयू पार करून देणारा. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी.  तर तुमच्याकडून माणशी हजार रुपये घेणारा परत नेताना तुम्हाला बजावतो , “आपने कितना पैसा दिया किसी को बताओ मत”.  त्याला माहीत 

असतं, श्रद्धा प्रत्येकाची सारखी असली तरी त्याचं मोल मोजण्याची कुवत प्रत्येकाची वेगवेगळी. नुसत्या श्रद्धेने पोट भरत नाही पण त्याला पैशांची जोड मिळाली की कित्येक भुकेली पोटं सहज भरतात. 


स्नान - 

सगळ्यात महत्वाचं म्हणजे संगमावर स्नान. लाखो करोडो लोक येतात रोज. सगळ्यांचं ध्येय एकच. एक डुबकी मारायची. कोण कोण कुठून कुठून येतं. ज्याला जसं जमेल तसं येतं. चालत , बसने, ट्रेन ने , विमानाने, हेलिकॉप्टरने, स्वतःच्या विमानाने. ज्याला जसं जमेल आणि मानवेल तसं. 

महंत येतात , आचार्य येतात , शंकराचार्य येतात , नागा साधू येतात.  साहजिक आहे ना , मेंढ्यांचा कळप निघाला की मेंढपाळ सुद्धा निघतातच.

अतिसामान्य येतात , सामान्य येतात आणि असामान्य येतात. फक्त प्रत्येकाची सोय वेगवेगळी. अतिसामान्य चेंगराचेंगरीत मरतात,(किती मरतात , कसे मरतात,ते विचरायचं नाही बर का ) . सामान्य जिथे जमेल तिथे पटकन स्नान करून इन्स्टाग्राम वर ,”चलो कुंभ चले” वगैरे चे स्टेटस टाकतात. असामान्य मात्र उंचावर बसून या सगळ्या मेळ्याचे नियोजन किती उत्तम झाले म्हणत स्वतःची पाठ थोपटून घेतात. धर्म सांगतो सगळे समान आहेत पण धर्म रक्षकांना असं वागून चालत नाही. 


प्रयागराज - 

काही वर्षांपूर्वी इलाहाबाद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराचं नुकतंच नामांतर झालं. कुंभ मेळा कित्येक शतकांपासून इथे भरतोय पण हा कुंभ मेळा विशेष. १४४ वर्षांनी आलेला महा कुंभ वगैरे. शहरासाठी आणि शहरातल्या प्रत्येकासाठी पैसे कमवण्याची संधी. शहरातला प्रत्येक जण या संधीचं सोनं करून घेत असतो. मग तो “हा हा बिलकुल संगम घाट पे छोडेंगे” म्हणत तिथून पाच किलोमीटर दूर सोडून ५०० रुपयाला चुना लावणारा बैटरी रिक्षावाला असू दे किंवा जेमतेम चार माणसं झोपतील एवढ्याशा खोलीचे वर तोंड करून माणशी १००० रुपये मागणारा हॉटेलवाला असू दे. 

इतकंच काय , कुंभमेळ्यातला साधू सुद्धा हातावर दहाची नोट ठेवल्याशिवाय पिशवीतून अंगारा काढून देत नाही.

एकूण काय तर , धर्म, श्रद्धा आणि त्यामागचं अर्थकारण समजून घ्यायचं असेल तर प्रयागराज ला जायला पाहिजे. 


तरी आम्ही संत आणि महंत पहिले नाहीत. स्वतःच स्वतःला अभिषेक करून घेणारे महामंडलेश्वर पहिले नाहीत. नागा पहिले नाहीत किंवा अघोर पण पहिले नाहीत.

गांजा पिऊन प्रवचन देणारा आयआयटी बाबा पहिला नाही.  किंवा ती सुंदर डोळ्यांची मोनालिसा पाहिली नाही.

आम्ही साधू पाहिले ते पण चार पैशे काढून दिल्यावर आशीर्वाद म्हणून रुद्राक्ष देणारे. गर्दीत हात पकडून हातावर मंत्र पुटपुटत काहीतरी बोलणारे आणि “वो देखो उसने पैसा निकाला “ म्हटल्यावर तुमचा हात सोडून पैशेवाल्याचा हात पकडणारे. साधूंच्या वेषातले सामान्य!!!


माहिती ला ज्ञान समजण्याच्या आजच्या जगात कुंभ मेळा म्हणजे सनातन धर्माचा फार मोठा सोहळा वाटूच शकतो एखाद्याला. मला मात्र राहून राहून एक गोष्ट आठवली 

अस्सी घाटावरच्या एका पुस्तकांच्या दुकानात बसलो होतो गप्पा मारत. “ये कुंभ के दो माह और उसके आगे और दो माह, कोई भी बनारसी गंगा में डुबकी लगाने से डरता है, इतनी मैली हो जाती है मैया” हे ऐकलं आणि एकदम चंद्रभागा आठवली. वारीनंतर तिची अवस्था सुध्दा गंगेसारखीच होत असेल किंवा मग सिंहस्थानंतर जशी गोदावरी. 

जसं सिंहस्थ आठवला तसं कुसुमाग्रज आठवले. आणि आठवली त्यांची कुंभमेळ्यावरची कविता. त्यातली चार कडवी पुढे देतो आणि थांबतो. पूर्ण कविता नक्की मिळवून वाचा 


 व्यर्थ गेला तुका | व्यर्थ ज्ञानेश्वर

संताचे पुकार | वांझ झाले ||


रस्तोरस्ती साठे | बैराग्यांचा ढीग

दंभ शिगोशीग | तुडुंबला ||


हे साधू नाहतात | साधू जेवतात

साधू विष्ठतात | रस्त्यावरी ||


यांच्या लंगोटीला | झालर मोत्याची

चिलीम सोन्याची | त्यांच्यापाशी ||


अशी झाली सारी | कौतुकाची मात

गांजाची आयात | टनावारी ||


तुका म्हणे ऐसे | मायेचे माईंद 

त्यापाशी गोविंद | नाही नाही ||