Sunday, October 11, 2026

कलकत्याची सफर

 मिर्झा गालिब ने लिहून ठेवलंय….


कलकत्ते का जो ज़िक्र किया तूने हमनशीं

इक तीर मेरे सीने में मारा के हाए हाए…


वर्षभरापूर्वी कलकत्त्यात होतो. सप्टेंबरचेच दिवस होते. बंगालचा राष्ट्रीय सण, “दुर्गा पूजो” थोड्या दिवसांवर आलेला. 

वातावरणात लगबग होती. सॉल्ट लेक स्टेडियमच्या समोरच आमचं हॉटेल होतं. एका रूमच्या खिडकीतून स्टेडियमचे उंचच उंच लाइट्स दिसायचे आणि दुसऱ्या रूमच्या खिडकीतून सुभाष सरोवर चा हिरवागार परिसर. 

हा भाग तसा नव शहर म्हणून विकसित झालेला. 

दीदी मुख्यमंत्री होत्या मागच्या वर्षापर्यंत. अक्खं शहर निळ्या रंगात रंगवून काढलेलं. काही वर्षांपूर्वी या राज्यात डाव्यांची सत्ता होती, त्यांचा रंग लाल होता याचा मागमूसही सापडणार नाही. आता दीदी नाहीत. भाजप आलंय. मला खात्री आहे आता दीदींचा निळा रंग खरवडून तिथे भाजपचा भगवा रंग आला असेल. चालायचंच. 

तिथला जवळपास प्रत्येक कॅबवाला बिहारी पण दोन - तीन पिढ्या बंगालात राहिलेला. व्यवस्थित बंगाली बोलणारा. मला वाटतं बिहार मध्ये , इतर राज्यांत जाऊन काम करणं सोयीचं व्हावं म्हणून त्या त्या राज्यांच्या भाषा शिकवत असावेत. 

असंच एका अरुंद रस्त्याच्या मध्यभागी कॅब सोडून आम्ही एका चौकात आलो आणि त्या चौकातून शिरलो एका बोळात. ही कुमारतुली. मराठीत म्हणायचं कुंभार गल्ली. 

नवरात्रीच्या आधी ही गल्ली गजबजून उठते कारण त्या बारीक गल्लीच्या आजूबाजूला असलेल्या खोपट्यासारख्या दुकानांमध्ये अगदी छोट्या ते मोठ्या दुर्गेच्या मूर्त्या तयार होतात. फार पूर्वी इथले कुंभार , हूगळी नदीच्या काठावरची माती आणून त्याच्या मुर्त्या तयार करायचे. काळ बदलला, टेक्निक बदलली पण कुंभारांच्या हातातली कला अजून तशीच आहे.  नुसती मूर्तींची रंगरंगोटी नाही तर त्यांचं प्रॉपरशन, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव, रौद्र काली, शांत सरस्वती आणि तिच्या हातातल्या वीणेच्या छेडलेल्या तारा, वरदायिनी लक्ष्मी, कोपऱ्यातले गणेश आणि कार्तिकेय आणि कालीच्या पायाशी छातडात त्रिशूळ घुसल्याने विव्हळणारा महिषासुर असं सगळं त्या छोट्या खोपटात आकार घेत असतं. ताडपत्री टाकलेल्या अरुंद दुकानांमध्ये ठेवलेल्या मूर्ती , मरणाच्या दमट हवेतला उकाडा आणि लागलेल्या घामाच्या धारा , त्यात अगदी सहजपणे दुर्गेच्या डोळ्यांत नुसत्या ब्रशने जीव ओतणारा मूर्तिकार. हे पाहणं अविस्मरणीय असतं. कुमारतुलीच्या गोष्टी. 

मग तिथून जायचं “जोरशंखो ठाकुरबाडी”ला . रवींद्रनाथांचं घर. घर कसलं हवेलीच म्हणायची. आत शिरलं की दिसतं प्रशस्त “ठाकुरदालान” म्हणजे व्हरंडा किंवा कोर्टयार्ड. उंचच उंच गेलेले खांब आणि त्यांच्या आधाराने उभी राहिलेली हवेली. मग नंतर रवींद्रनाथांच्या वस्तू , त्यांच्या गीतांजली मधल्या कविता, बरंच काही जपून ठेवलंय. त्यांनी ज्या देशांना भेटी दिल्या - रशिया , चाइना, अमेरिका त्या त्या देशांतील फोटो , त्यांनी तिथे मांडलेले विचार या सगळ्यांचं डॉक्यूमेंटेशन करून ठेवलंय. आणि मग आपण येतो त्या खोलीत जिथे त्यानी शेवटचा श्वास घेतला. 

तिथे लिहिलंय, रवींद्रनाथांच्याच शब्दांत….

“मृत्यू म्हणजे दिवा विझवून निघून जाणं नाही तर होणाऱ्या पहाटेसाठी हातातला  दिवा फक्त बाजूला ठेवणं.” 

मृत्युला नव्या सुरुवातीची पहाट म्हणणारा हा महाकवी. बंगालच्या रक्तामध्ये भिनलेला महाकवी. 

जसे टागोर तसेच आणखी एका माणसावर प्रेम करणारे बंगाली भरपूर आणि ते म्हणजे रामकृष्ण परमहंस. 

माझ्या शाळेचं नाव स्वामी विवेकानंदांच्या नावावरून दिलेलं त्यामुळे रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल ममत्व थोडं जास्तच. त्यामुळे बेलूर मठात गेलो.  हुगळीच्या काठावरच प्रशस्त परिसर, कालीमातेचं मंदिर , आवारात लागलेलं रबींद्र संगीत आणि विवेकानंदांच्या आयुष्यावरचं म्यूजियम बघत दोन तीन तास सहज निघून गेले. या मठापासून दक्षिणेश्वर काली मंदिर (इथे कालीमातेने रामकृष्ण परमहंसांना दर्शन दिलं म्हणतात) ला जायला फेरी असते. तिथे काही जाता आलं नाही मग माघारी फिरलो. हुगळी नदीच्या काठाकाठाने रिक्षा जात होती आणि रिक्षावाला हुगळीतल्या “हिल्सा” माशांचं कौतुक सांगत होता. हिलसा म्हणजेच बंगालीत “इलिश” हा मासा म्हणजे समस्त बंगाली लोकांचा वीक पॉइंट. हुगळी नदीतला इलिश रुचकर की बांगलादेशातल्या पद्मा नदीतला एलीश रुचकर याच्यावर महाचर्चा झाडतील बंगाली लोक. मोहरी चे दाणे कुटायचे की त्याची पिवळीधम्मक पेस्ट तयार होते. इलिशचा चांगला भरलेला तुकडा घ्यायचा आणि त्या पेस्ट मध्ये त्याला घोळवून , जोडीला नारळाचा चव लावून चांगला वाफवून घ्यायचा. त्याला म्हणायचं “शोरशे इलिश” . वाफाळलेल्या गरम भातासोबत हा  एलिश खाणं म्हणजे स्वर्गसुख. “भोजहारी मन्ना” नावाचं रेस्टोरेंट आहे. तिथे जायचं आणि भर दुपारी एलिश खाऊन तृप्त व्हायचं. बंगालात इतरही मासे भरपूर , आलू घालून केलेली बिर्याणी चविष्ट किंवा मटण कोशा पण स्वादिष्ट तरी इलिश ची मजा वेगळीच. 

असंच एक नावाजलेलं ठिकाण म्हणजे इंडियन कॉफ़ी हाऊस. याच्या आजूबाजूच्या परिसरात सगळ्या शैक्षणिक संस्था , जुने कॉलेजेस. त्यामुळे एकच वेळी विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी गजबजलेला परिसर. कलकत्त्यातलं सगळ्यांत जुनं कॉलेज- प्रेसीडेंसी कॉलेज (१८१७ मध्ये सुरू झालेलं) आणि कलकत्ता यूनिवर्सिटी याच परिसरात. 

हे कॉफी हाऊस म्हणजे एके काळी बंगाली “भद्र” लोकांचा अड्डा. सत्यजीत रे , मृणाल सेन , मन्ना डे , असे अनेक साहित्यिक , दिग्दर्शक, अर्थतज्ज्ञ, प्रोफेसर्स यांचं नेहमी येऊन बसण्याचं ठिकाण. कॉफी , सिगरेट , ऑम्लेट आणि “चर्चा- वाद विवाद” यांचं ठिकाण. कॉफ़ी हाऊस च्या पहिल्या मजल्यावर प्रसिद्ध चित्रकारांची चित्र लावली आहेत. आणि रवींद्रनाथांचं पोर्ट्रेट तरुणपणीचं. इतिहास जगलेली वास्तू कशी असते ते कळतं. कॉफ़ीची चव कशी होती ते मात्र विचारू नका. 

कोलकात्यात जावं आणि गोड खाऊ नये यासारखं पाप नाही. कपड्यांच्या खरेदीसाठी श्यामबजार ला गेलेलो. श्यामबजारच्या चौकात सुभाषबाबूंचा मोठा पुतळा आहे. घोड्यावर बसलेला आणि सैनिकी वेषातला. सुभाषबाबू म्हणजे बंगालच्या क्रांतीचा हुंकार. तिथून पुढे चालत आलात की रस्त्याच्या दोन्ही बाजूला कपड्यांची ढीगभर दुकानं. त्यातल्या कोपऱ्यात “चित्तरंजन” नावाचं मिठाई, जेवणाचं दुकान आहे. तिथे रसगुल्ले खायचे. आणि मग तिथून जायचं “अमृत स्वीट्स” ला. “नोलेन गुड मिष्टी दोई”  खायला. खजूराच्या पाकात लावलेलं दही. अप्रतिम गोड. 

कलकत्त्यातला आज शेवटचा दिवस. श्यामबजारच्या रस्त्यावरून फिरताना अचानक पावसाची सर आली. आधी आभाळ भरून आलं मग टपोऱ्या थेंबांचा पाऊस. आडोशाला थांबलो तर लक्षात आलं अरे हे असे अनेक ट्राम ट्रॅक्स आतमध्ये वळतायेत नक्की काय असावं आतमध्ये. त्या वळणाने चार पावलं आत गेलो तर श्यामबजारचा ट्राम डेपो. आता फारसा ट्रॅम्स उरल्या नाही पण एकेकाळी ट्राम म्हणजे कोलकात्याचं वैभव होतं. या ट्राम डेपो मध्ये जुन्या ट्राम लागलेल्या साइडिंग ला आणि एक छोटं ऑफिस होतं जीर्ण झालेलं. त्यातला संथपणे फिरणारा पंखा, दोन चार जुनाट लाकडी कपाटातून भरून वाहणारे कागदपत्रं आणि त्या डेपोचा तितकाच जुना म्हातारा मैनेजर. “ट्राम अभी वक्त पे नही चलती. पता नहीं कब आयेगी” एक वाक्यात त्याने मला पिटाळलं. त्या पावसात न्हाऊन निघालेले ट्रॅम्सचे जुनाट डबे आणि मोडकळीला आलेलं ते ऑफिस अजूनही स्पष्ट आठवतं. 

कलकत्ता मला असंच जुनं शहर वाटलं. एकेकाळी या हिंदुस्तानची राजधानी असलेलं पण काळाच्या ओघात आपला रिलेवन्स घालवून बसलेलं. एकेकाळी कलकत्त्याने आणि बंगालने या देशाला एक दिशा दिली. राजा राममनोहर रॉय , चित्तरंजन दास , रवींद्रनाथ टागोर , ईश्वर चंद्र विद्यासागर , बंकिमचंद्र चट्टोपाध्याय अशा एक ना अनेक नामांकितांनी कला , साहित्य, चित्रकला , विज्ञान , कविता या प्रत्येक क्षेत्रात मोलाचं काम करून ठेवलं. बंगाल हे देशासाठी प्रबोधनाचं केंद्र ठरलं. Bengal Renaissance was a phenomenon. 

आता या गोष्टीनाही फार वर्षं झाली. आजचं कोलकाता हे असंच भूतकाळाचं ओझं घेऊन भविष्याची नुसती स्वप्न पाहत उभं आहे असं वाटत राहतं. 

पाऊस ओसरला आणि परत पुण्याला निघायची तयारी केली. बऱ्याच गोष्टी राहिल्या. शांतिनिकेतन पहायचं राहिलं. सुभाषबाबूंचं घर पहायचं राहिलं, सुंदरबन मधला रॉयल बंगाल टाइगर पहायचा राहिला. जाऊ पुन्हा केव्हातरी. तोवर रवींद्र संगीत ऐकत कोलकात्याची आठवण काढू. हे ही नसे थोडके. 


  • अभिषेक राऊत 








Thursday, September 24, 2026

मयखाना

 सूर्य ढळतो पश्चिमेला , सांज आभाळी भरते  , 

रात्र अजूनही कोवळी, चांदण्यांअडून बघते. 


वळू लागतात पावलं मग , रस्ता ओळखीचा चालताना 

मंद पिवळ्या प्रकाशातून , खुणावत असतो मयखाना 


कधी उभ्यानेच पितो , कधी बसून घेतो  घोट चार 

हळूहळू विसरू लागतो , आयुष्याने दिलेला मार 


आजूबाजूच्या टेबलांवरही , भरू लागतात प्याले खास 

आयुष्याची कहाणी सांगते , एक क्वार्टर आणि दोन ग्लास 


फेसाळत्या सुखाचे प्याले , क्षणार्धात होतात रिते 

रात्र होते गहिरी आणि , दुःख गाली हासते. 


रात्र होते गहिरी आणि आठवतो  चेहरा तुझा 

कपाटातल्या आतल्या खणात जपलेला रुमाल तुझा 


सुकून गेलं त्या रुमालतलं फूल पिवळ्या चाफ्याचं 

डोळ्यांदेखत  उडून गेलं प्रेम आपल्या दोघांचं 


चार लोक जमवून मग , ऐकवतो कहाणी प्रेमाची ,

एखादा शेर , एखादी कविता , सगळी उजळणी दुःखाची 

 

एका एका शब्दागणिक , टाळी पडते , वाहवा होते , 

घोटागणिक होतो रीता मी  आणि फक्त तुझी नशा उरते . 


इतकेच वाटते मला , गीत शेवटचे गाताना 

तुझ्याजवळ पोहोचावे मी आणि सुटावा हा मयखाना.


- अभिषेक राऊत 

चांदणभूल

 मंतरलेली रात्र असावी , शुभ्र चांदणे आभाळभर 

गंध तुझा वाऱ्याने ल्यावा, अन जगणे माझे व्हावे अत्तर . 


अत्तर अत्तर जगणे माझे , शब्दांमधुनी सांडत जावे ,

शब्द असावेत माझे तरीही , गाणे मात्र तुझे व्हावे . 


तुझ्या टपोऱ्या डोळ्यांच्या डोही , अलगद उतरत खोल शिरावे

काजळभरल्या पापण्यांनी, नकळत मजला मिटून घ्यावे 


चांदण्यांचा स्पर्श तुझा अन ओल्या ओठांची थरथर, 

बंध तुटावे, बांध फुटावे , तसे मिटावे दोघांतील अंतर


मानेवरचा तीळ तुझ्या मग , मी ओठांनी चुंबून घ्यावा 

अन तुझ्या पाठीवर हलके , मदहोशीचा म लिहावा..


रात्र चढावी क्षणाक्षणाने, चंद्र क्षितिजाकडे झुकावा 

तुझ्या देहाचा चांदणचुरा, माझ्या गात्रांमधून वाहावा. 


कसे तुला सावरू अन, कसा स्वतःला घालू आवर 

त्या रात्रीच्या चांदणखुणा, अजून माझ्या सर्वांगावर 


सकाळ व्हावी मिटल्या डोळी, अन शेजेवर चाफ्याचे फूल 

शतजन्मांना पुरून उरावी , त्या रात्रीची चांदणभूल 


-अभिषेक राऊत 

संध्याकाळ

 सुर्य झुकतो पश्चिमेला , रंग लाल आभाळभर 

संपतो दिवस आणि , आठवण तुझीच रात्रभर 


पक्ष्यांचे रेखीव थवे, लागती घरट्यांच्या वाटेला 

पावले माझी तरीही का पडती तुझ्याच दिशेला 


क्षितिजाच्या पल्याड सूर्य , सरकू लागतो कलेकलेने 

अन ओठांवर हळूच येते,  तुझ्या माझ्या विरहाचे  गाणे 


सांज अशी विरघळते  , निळ्याशार नदीच्या पल्याड 

वाहत जात्या नदीला केवळ पाहत राहते एकाकी झाड 


आशा सांज वेळी सुटे गार वारा, अंगभर तुझा शहारा

आवरुनी ऊरला पसारा, मी शोधतो एकाकी निवारा 


तुझ्याच डोळ्यांतली माझी स्वप्नं, या वाऱ्यात वितळली 

शपथ आपल्या सोबतीची , संधिप्रकाशात धूसरली…


असे काही ठाम, पक्के आता तुझे माझे उरले नाही 

आणि तरीही तुझेच नाव , का माझ्या कवितेत येत राही 


  • अभिषेक राऊत 

Monday, July 6, 2026

फाळणी, वारिस शाह आणि इम्तियाज अली




खरं तर मी सिनेमावर लिहीत नाही कारण मला त्यातलं काही कळत नाही पण काल परवा इम्तियाज अली चा मै वापस आउंगा पाहिला आणि बरंच काही आठवलं. 

उल्हासनगरच्या कॅम्पमध्ये गेलेलो फार फार पूर्वी फर्निचर घ्यायला. तेव्हा बाबांनी सांगितलेलं. फाळणीनंतर पाकिस्तानमधून आलेल्या सिंधी लोकांसाठी बांधलेले हे रिफ्युजी कॅम्प. घरदार , पैसा अडका सगळं सोडून कुणी मुलतान , कुणी सिंध तर कुणी कराची मधून इकडे आलेले सिंधी लोक आणि त्यांनी वसवलेलं उल्हासनगर. तेव्हा ना फाळणी समजायचं वय होतं ना रिफ्यूजी कॅम्प समजण्याचं. 

नंतर इतिहासाच्या पुस्तकात एक वाक्य होतं . १९४७ नंतर फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान हे दोन देश निर्माण झाले. एकच वाक्य. फक्त एकच वाक्य. 

नंतर फाळणीबद्दल बऱ्यापैकी वाचलं. फाळणीची राजकीय आणि सामाजिक अपरिहार्यता, त्या काळात तयार झालेलं हिंदू विरुद्ध मुस्लिम समाजमन, मुस्लिम लीग ने पुकारलेला “डायरेक्ट एक्शन डे “ आणि त्यात झालेली हिंदूंची कत्तल आणि मग अत्यंत घाईघाईत झालेली फाळणी आणि त्यानंतरचा हिंसाचार. 

तशी तर फाळणी झाली भारताची पण त्याचे कायमचे घाव सोसले पंजाब आणि बंगाल ने. सिनेमा बघताना कधी काळी वाचलेल्या गोष्टी आठवतात. 


पृथ्वी थिएटर ला मंटो महोत्सव लागलेला तेव्हा टोबा टेक सिंह या त्याच्या कथेवर केलेलं नाटक पाहिलेलं. त्या कथेतल्या बिशन सिंगचं दुःख. 


एकदा असंच अमृता , साहिर आणि इमरोज बद्दल वाचताना हाती लागलेली अमृता प्रीतमची फाळणीवरची कविता आठवते . हीर-रांझा सारखी अजरामर प्रेमकथा लिहिणाऱ्या वारीस शाह ला उद्देशून लिहिलेली कविता. 

ती म्हणते , पंजाबमधल्या हीरचं दुःख तू हीर-रांझा लिहून अजरामर केलंस मग या फाळणीच्या दिवसातल्या असंख्य स्त्रियांची दुःख तुला दिसत नाहीत काय. कधी लिहशील याबद्दल वारीस शाह, कधी लिहशील, उठ तुझ्या कबरीतून उठ ….

“अज्ज आखाँ वारिस शाह नूँ कित्थों क़बरां विच्चों बोल

ते अज्ज किताब-ए-इश्क़ दा कोई अगला वरका फोल

इक रोई सी धी पंजाब दी तू लिख-लिख मारे वैन

अज्ज लक्खां धीयाँ रोंदियाँ तैनू वारिस शाह नु कैन”


फैझ आठवतो. एकेकाळी त्याच्या “हम देखेंगे” ची पारायणं केलेली. आणि अचानक सुबह- ए- आझादी वाचण्यात आली.

“ये दाग़-दाग़ उजाला, ये शब-गज़ीदा सहर

वो इंतिज़ार था जिस का, ये वो सहर तो नहीं!” 


अखंड हिंदुस्तानातल्या प्रत्येकाला हवी असणारी, प्रत्येक देशभक्ताने स्वप्नात पाहिलेली ती “सहर” … ती सकाळ कधी उगवलीच नाही. 


नेहरूंच्या लाल किल्ल्यावरच्या भाषणाचे शब्द आठवतात, “at the stroke of midnight hour…..” आणि त्या रात्री आणि त्यानंतरचे कित्येक दिवस आणि रात्र पंजाब आणि बंगालच्या सीमेवर घडलेले अत्याचार….


बॅचलर असताना वाकडला रहायचो दोस्तांसोबत. वेड्यासारखं कोक स्टूडियो ऐकायचो. तेव्हा ऐकलेली पीयूष मिश्राची “हुस्ना”. शेवटच्या एका ओळीत पाणी येतं डोळ्यांत…. “रोता है रातोंमे पाकिस्तां क्या वैसा ही जैसे हिंदोसतां यहां..”


मागच्या वर्षी कलकत्त्याला रविन्द्रनाथांच्या  हवेलीला - “जोराशंखों ठाकूर बाडी” ला भेट दिलेली. वाटलेलं की नशीब फाळणी झाली तेव्हा रवींद्रनाथ हयात नव्हते. “आमार शोनार बांगला” लिहिणाऱ्या रवींद्रनाथांना फाळणी आणि बंगालचे तुकडे सहन झाले असते काय. 


शेरशाह मधले ऐन बॉर्डरवर लढाईच्या धामधुमीत एकमेकांना पंजाबीतून चिथावणी देणारे भारतीय आणि पाकिस्तानी सैनिक आठवतात. ज्यांची मातृभाषा एक आहे, जे एथनिकली पंजाबी आहेत असे लोक फक्त मधल्या एका बॉर्डर नावाच्या रेषेमुळे, धर्मामुळे एकमेकांच्या जीवावर उठतात हे माणूस म्हणून अंगावर येणारं असतंय. 


धुरंधर सारखे चित्रपट , देश म्हणून , देशभक्ती जागवावी म्हणून महत्वाचे असतील, असावेत. पण एखादा मैं वापस आउंगा सुद्धा असावा.  सिनेमाच्या शेवटी जगभरातल्या विस्थापितांचं दुःख अधोरेखित करणारा….


मला गाव नाही , मुंबईसारख्या रुढार्थाने स्थलांतरितांच्या शहरात मी वाढलो, देशाच्या सीमेवर जेव्हा ड्रोन उडत होते त्याची पुसटशी झळ मला पोचली नाही. तरीही कधी काळी झालेल्या फाळणीवरचा सिनेमा बघताना मला सतत त्यावर वाचलेलं आठवत राहतं, आतून हलून जायला होतं.या सगळ्याला ७५ पेक्षा जास्त वर्षं झाली. फाळणी बघितलेली पिढी हळू हळू काळाच्या पडद्याआड जातेय. इंस्टाग्रामवर रिल्स दिसत राहतात. ७०-८०-९० वर्षांचे म्हातारा - म्हातारी सांगतात त्या अनुभवांबद्दल. अत्याचारांबद्दल पण सांगताना ना कडवटपणा असतो ना द्वेष. असतात त्या फक्त लहानपणीच्या गावच्या आठवणी, हरवलेले , मागे सुटलेले लोक , त्यांच्या आठवणी आणि परत जाण्याची ओढ. 

आम्ही नशीबवान. आम्हाला ना युद्धाच्या झळा बसल्या , ना दंगलीचे चटके बसले , आमची घरं कुणी उध्वस्त केली नाही, ना आम्हाला कधी जातीय- वर्गीय संघर्षाचे फटके बसले. आमच्यासारख्यांना- ज्यांच्या आजूबाजूला पद्धतशीरपणे द्वेष पेरला जातोय त्यांना सिनेमातून पुन्हा एकदा शुद्ध, निर्विवाद प्रेम आणि त्या प्रेमाची ताकद दाखवल्याबद्दल इम्तियाज अली चे आभार मानायला हवेत. 


- अभिषेक राऊत 

Thursday, March 26, 2026

रामनवमी

शाळेत मूल्यशिक्षणाच्या तासाला रामरक्षा म्हणायचो. 

“दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे तू जनकात्मजा 

पुरतो मारुतीयस्य तं वंदे रघुनंदनं….”

डोळ्यांसमोर रामाचं चित्र उभं रहायचं. कोदंडधारी (कोदंड म्हणजे धनुष्य) राम , त्याच्या एक बाजूला लक्ष्मण, दुसऱ्या बाजूला सीता आणि पायाशी हात जोडून बसलेला हनुमान. 

आज बऱ्याच वर्षांनी पुन्हा रामरक्षा म्हटली. 


रामायण आणि महाभारत गोष्टी म्हणून ऐकलं नेहमी. कधी आईकडून , कधी बाबांकडून. 

बाबा सांगतात माणसाने कसं रामासारखं व्हावं. “एक वचनी” , “एक बाणी” , “एक पत्नी” . मग आपण म्हणयचं “ आहो बाबा , रामाचा काळ त्रेता युगाचा. आत्ता चालू आहे कलियुग. कलियुगात रामासारखं होणं किती अवघड” 


मग एक दिवस केव्हातरी गीत रामायण ऐकलं….  

“पुत्र सांगती चरित पित्याचे , ज्योतीने तेजाची आरती” . 

गदिमांच्या शब्दांनी , बाबूजींच्या सुरांनी वेड लावलंच पण राम सुद्धा त्यातून उलगडत गेला. 

वनवासात भेटायला आलेल्या भरताला सहजपणे म्हणणारा  राम की , 

“तात स्वर्गवासी झाले , बंधू ये वनात..,

अतर्क्य ना घडले काही , जरी अकस्मात…

खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा… पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा…” 

अक्खं जग ज्याला देव मानतं तो म्हणतो , खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा ???. इतकं सहज ?? 

कधी कधी वाटतं, हिंदू धर्माचं सौंदर्य हे आहे की आपले देव , देवांचे अवतार हे सगळे असे आपल्यासारखे, आपल्यातले वाटतात. अस्सल माणसांसारखे. त्यांचं सुख , दुःख , प्रयत्न, त्यांचं जिंकणं, हारणं सगळं काही अस्सल तुमच्या आमच्यासारखं. म्हणून कदाचित रावणाला जिंकून आलेल्या भगवान रामाला सुद्धा सीतेची अग्निपरीक्षा घेण्यावाचून उपाय राहत नाही. 


मग पुढे जाऊन कधीतरी रामायणातल्या इतर कॅरेक्टर्स बद्दल वाचलं.  शबरी असो , शिळा होऊन पडलेली आणि रामाच्या पदस्पर्शाने पुन्हा जिवंत झालेली अहिल्या असो किंवा बंधू प्रेमापोटी वनवासात गेलेल्या लक्ष्मणाची चौदा वर्षं वाट पाहणारी उर्मिला. ग्रेसांची कविता आठवते…

“आटले सरोवर जेथे , का मोर नाचती लागू 

तू सोड उर्मिले आता , डोळ्यांत बांधला राघू…” 

एक वनवास रामाचा , एक वनवास उर्मिलेचा…..कुणाचा अधिक दारुण ते ज्याने त्याने ठरवायचं.


राम आणि रामायण हे असं इथल्या प्रत्येकाच्या जगण्यात भिनलेलं. कुणी म्हणतं रामायण फक्त महाकाव्य आहे. कुणी अगदी रामाचा कालखंड वगैरे काढून दाखवतं. पण राम आणि रामायण या सगळ्याच्या पल्याड आहे. वाल्या कोळीचा वाल्मिकी झाला आणि त्याने लिहिलेलं हे गारुड विणलं गेलंय हिंदुस्थानच्या मनामनात. 


मग तो विणकर आठवतो कबीर नावाचा. संत कबीर म्हणतो, 


एक राम दशरथ का बेटा।।

एक राम घट घट में बैठा।

एक राम का सगल पसारा।

एक राम सब हूँ से नियारा।


आणि मग साहजिक आठवतं माणिक वर्मानी गायलेलं गाणं. 

“कबीराचे विणतो शेले , कौसल्येचा राम 

भाबड्या या भक्तांसाठी देव करी काम “


रस्त्याने येताना हे सगळं आठवत होतो , इकडे तिकडे भाबडे भक्त शोधत होतो मी. सुंठवडा कुठे मिळेल प्रसाद म्हणून ते शोधत होतो. 

डीजे, साउंडच्या आवाजात आणि लेसर लाइट्सच्या प्रकाशात रामाला शोधत होतो. अयोध्येत रामाचं मंदिर झालं आणि अचानक राम नवमी फार मोठा सण , उत्सव वगैरे झाल्यासारखं झालंय. चालायचंच. विकास फक्त शहरांचाच नाही देवांचा पण होतो. 


सहजच एका दुकानात गेलो तर तिथल्या काकांनी हातावर सुंठवडा ठेवला. बरं वाटलं. कुठल्याशा मंदिरात , आठ दहा सुवासिनींनी एकत्र येऊन रामला पाळण्यात घालून जोजवलं असेल , कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या म्हणत , “राम जन्मला गं सखे राम जन्मला” गात गात आनंद साजरा केला असेल आणि तोच प्रसादाचा सुंठवडा आपल्यापर्यंत पोहोचला असेल. 

आता त्या डीजे च्या कर्कश्श आवाजाचं आणि “भारत का बच्चा बच्चा, जय जय श्रीराम बोलेगा “ या तद्दन सुमार गाण्याचं वाईट वाटेनासं झालं. 

शेवटी राम एकच असला तरी प्रत्येकाचा राम वेगळा. आजच्या राम नवमीला तुमचा राम तुम्हाला आणि तुमच्या रामाला तुम्ही भेटो हीच सदीच्छा. 


  • अभिषेक राऊत