एकदा तरी यूपी बिहार ला जाणाऱ्या ट्रेन ने किंवा मुंबईहून यूपी बिहार ला येणाऱ्या ट्रेन ने छत्तीस तास प्रवास करावा माणसाने . काय काय अनुभव येतील तुम्हाला सांगतो, फक्त निरीक्षण करत रहावं.
भांगेत सिंदूर आणि ओठांना लिपस्टिक लावून डोक्यावर पदर घेतलेल्या बायका
दिवसभर तोंडात पान किंवा जर्दा किंवा तमाखु किंवा नुसती सुपारी चघळत राहणारे त्यांचे “ए जीऽऽ”
पहिली दीदी , मग दुसरी बेबी झाल्या नंतर फार नवसाने झालेल्या “छोटे सरकार “ ला सांभाळत बसणाऱ्या बायका
ए बाबू , ए लड्डूगोपाल म्हणत त्या छोटे सरकार ला सांभाळणारी दीदी तर ए लडके, ए छुटकू म्हणत त्याचे गाल ओढणारी बेबी
प्रत्येक सीट वर पुरी सब्जी , सत्तू की मठरी आणि आचार आणि मसाला मरमारा यांचा दिवसभर चाललेला रतीब,
अख्खा संसार मुंबईला घेऊन चाललेले नव वधू आणि वर आणि त्यांच्यासोबत एखादी म्हातारी , संसार लावून द्यायला.
“बडे चाचा को मीरा रोड में पार्किंग का काँट्राक्ट मिला है तो उन्होने बुला लिया “ म्हणत पहिल्यांदाच गाव सोडणारे , तर दोन तीन पिढ्या मुंबईत राहून , अस्खलित मराठीत बोलणारे , गावाशी बऱ्यापैकी नाळ तुटलेले पण तरीही एखाद दोन वर्षातून एकदा गावाला जाणारे.
मग ते आपल्याला सांगतात , “आमचं कसं रे , लहानपणापासून शेजार पाजार, मित्र मंडळी सगळे मराठी. आता माझी मराठी ऐकून कोणाला वाटणार पण नाही माझं आडनाव गुप्ता आणि गाव मिर्झापूर ते . गावाला जायला नको वाटतं रे . तुला सांगतो हे लोक जेवढे गलिच्छ मुंबईत राहतात ना त्याच्यापेक्षा दहापट गलिच्छ गावात राहतात . दिवसभर नुसतं ते पान तंबाखू खात इथं तिथं थुकत रहायचं. पोरांना तर अजिबात आवडत नाही पण काय करणार वडिलांच्या नावावर जमीन आहे चुलत्याचा डोळा आहे लक्ष ठेवायला जायला लागतं.” आपण मनात विचार करतो चायला हा तर आपल्यापेक्षा कट्टर मराठी निघाला .
ट्रेन पुढे सरकत राहते .
“अब मुंबईमें आना और बस जाना उतना सहज भी नही रहा. वो ही आ सके अब मुंबई में जिसका कोई अपना रिश्तेदार यहा हो या फिर अच्छी खासी जॉब लगी हो . अब हमारे गांव से ज्यादातर लोग गुजरात वगैरा जाते है”
बाजूच्या सिट वरचा खोकणारा म्हातारा त्याला अनुमोदन देतो. तेवढ्यात त्या म्हाताऱ्याची सून त्याला औषध आणून देते. “ये लिजिये पापा. आधे घंटे बाद मनोज खाना लेके आयेगा” म्हणत. ती गेल्यावर म्हातारा म्हणतो , “ ये हमार छोटकी बहुरानी. मराठी है. दुई महिना हुआ है शादी को . पहली बार गांव लेके गये थे इस वक्त. शादी तो बंबई में ही किए थे क्यूँकी”
मग त्याच्यात आणि अजून एका जणात अस्खलित भोजपुरी मध्ये मराठी लोकांची लग्न कशी सुटसुटीत एका दिवसात आटोपतात आणि आपल्याकडे गावाकडे कसं अगदी चार -पाच दिवस वेळ, पैसा , फुकटचे मानपान, हुंडा वगैरे असं सगळं करायला लागतं यावर दहा मिनिट चर्चा होते.
एकूणात उत्तर भारतीयांवद्दल मनात राग नसेल तर छत्तीस तासांचा मुंबई - वाराणसी - मुंबई पर्यंतचा प्रवास व्यवस्थित होऊ शकतो.
शेंडी ठेवलेला एखादा पंडित , “अब आये हो तो अयोध्या भी हो आओ पुण्य मिलेगा “ असं सांगतो. एखादा कुशवाह, मोदीजीनी किती systematically मायावतींची SC -ST वोट बँक तोडत आणि ओबीसी ना आपल्या बाजूला खेचून घेत मुस्लिम -यादव समीकरणाची आणि पर्यायाने अखिलेश मुलायम ची कशी जिरवली हे सांगतो.
वाराणसी , बलिया , जौनपूर , भदोही , इलाहाबाद , मिर्जापुर, बरैली, गोरखपूर.
यू पी , बिहार ला जाणाऱ्या कोणत्याही ट्रेन मध्ये बसलात तरी ही अशी दृश्यं, अशी माणसं दिसतातच , भेटतातच.
आपण फक्त कान , डोळे आणि मन उघडं ठेवायचं. मुंबईसारखं. सगळ्यांसाठी, सदैव .
- अभिषेक राऊत

No comments:
Post a Comment