Thursday, March 26, 2026

रामनवमी

शाळेत मूल्यशिक्षणाच्या तासाला रामरक्षा म्हणायचो. 

“दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे तू जनकात्मजा 

पुरतो मारुतीयस्य तं वंदे रघुनंदनं….”

डोळ्यांसमोर रामाचं चित्र उभं रहायचं. कोदंडधारी (कोदंड म्हणजे धनुष्य) राम , त्याच्या एक बाजूला लक्ष्मण, दुसऱ्या बाजूला सीता आणि पायाशी हात जोडून बसलेला हनुमान. 

आज बऱ्याच वर्षांनी पुन्हा रामरक्षा म्हटली. 


रामायण आणि महाभारत गोष्टी म्हणून ऐकलं नेहमी. कधी आईकडून , कधी बाबांकडून. 

बाबा सांगतात माणसाने कसं रामासारखं व्हावं. “एक वचनी” , “एक बाणी” , “एक पत्नी” . मग आपण म्हणयचं “ आहो बाबा , रामाचा काळ त्रेता युगाचा. आत्ता चालू आहे कलियुग. कलियुगात रामासारखं होणं किती अवघड” 


मग एक दिवस केव्हातरी गीत रामायण ऐकलं….  

“पुत्र सांगती चरित पित्याचे , ज्योतीने तेजाची आरती” . 

गदिमांच्या शब्दांनी , बाबूजींच्या सुरांनी वेड लावलंच पण राम सुद्धा त्यातून उलगडत गेला. 

वनवासात भेटायला आलेल्या भरताला सहजपणे म्हणणारा  राम की , 

“तात स्वर्गवासी झाले , बंधू ये वनात..,

अतर्क्य ना घडले काही , जरी अकस्मात…

खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा… पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा…” 

अक्खं जग ज्याला देव मानतं तो म्हणतो , खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा ???. इतकं सहज ?? 

कधी कधी वाटतं, हिंदू धर्माचं सौंदर्य हे आहे की आपले देव , देवांचे अवतार हे सगळे असे आपल्यासारखे, आपल्यातले वाटतात. अस्सल माणसांसारखे. त्यांचं सुख , दुःख , प्रयत्न, त्यांचं जिंकणं, हारणं सगळं काही अस्सल तुमच्या आमच्यासारखं. म्हणून कदाचित रावणाला जिंकून आलेल्या भगवान रामाला सुद्धा सीतेची अग्निपरीक्षा घेण्यावाचून उपाय राहत नाही. 


मग पुढे जाऊन कधीतरी रामायणातल्या इतर कॅरेक्टर्स बद्दल वाचलं.  शबरी असो , शिळा होऊन पडलेली आणि रामाच्या पदस्पर्शाने पुन्हा जिवंत झालेली अहिल्या असो किंवा बंधू प्रेमापोटी वनवासात गेलेल्या लक्ष्मणाची चौदा वर्षं वाट पाहणारी उर्मिला. ग्रेसांची कविता आठवते…

“आटले सरोवर जेथे , का मोर नाचती लागू 

तू सोड उर्मिले आता , डोळ्यांत बांधला राघू…” 

एक वनवास रामाचा , एक वनवास उर्मिलेचा…..कुणाचा अधिक दारुण ते ज्याने त्याने ठरवायचं.


राम आणि रामायण हे असं इथल्या प्रत्येकाच्या जगण्यात भिनलेलं. कुणी म्हणतं रामायण फक्त महाकाव्य आहे. कुणी अगदी रामाचा कालखंड वगैरे काढून दाखवतं. पण राम आणि रामायण या सगळ्याच्या पल्याड आहे. वाल्या कोळीचा वाल्मिकी झाला आणि त्याने लिहिलेलं हे गारुड विणलं गेलंय हिंदुस्थानच्या मनामनात. 


मग तो विणकर आठवतो कबीर नावाचा. संत कबीर म्हणतो, 


एक राम दशरथ का बेटा।।

एक राम घट घट में बैठा।

एक राम का सगल पसारा।

एक राम सब हूँ से नियारा।


आणि मग साहजिक आठवतं माणिक वर्मानी गायलेलं गाणं. 

“कबीराचे विणतो शेले , कौसल्येचा राम 

भाबड्या या भक्तांसाठी देव करी काम “


रस्त्याने येताना हे सगळं आठवत होतो , इकडे तिकडे भाबडे भक्त शोधत होतो मी. सुंठवडा कुठे मिळेल प्रसाद म्हणून ते शोधत होतो. 

डीजे, साउंडच्या आवाजात आणि लेसर लाइट्सच्या प्रकाशात रामाला शोधत होतो. अयोध्येत रामाचं मंदिर झालं आणि अचानक राम नवमी फार मोठा सण , उत्सव वगैरे झाल्यासारखं झालंय. चालायचंच. विकास फक्त शहरांचाच नाही देवांचा पण होतो. 


सहजच एका दुकानात गेलो तर तिथल्या काकांनी हातावर सुंठवडा ठेवला. बरं वाटलं. कुठल्याशा मंदिरात , आठ दहा सुवासिनींनी एकत्र येऊन रामला पाळण्यात घालून जोजवलं असेल , कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या म्हणत , “राम जन्मला गं सखे राम जन्मला” गात गात आनंद साजरा केला असेल आणि तोच प्रसादाचा सुंठवडा आपल्यापर्यंत पोहोचला असेल. 

आता त्या डीजे च्या कर्कश्श आवाजाचं आणि “भारत का बच्चा बच्चा, जय जय श्रीराम बोलेगा “ या तद्दन सुमार गाण्याचं वाईट वाटेनासं झालं. 

शेवटी राम एकच असला तरी प्रत्येकाचा राम वेगळा. आजच्या राम नवमीला तुमचा राम तुम्हाला आणि तुमच्या रामाला तुम्ही भेटो हीच सदीच्छा. 


  • अभिषेक राऊत 

Friday, March 13, 2026

मृत्यूची वाट , मणिकर्णिका घाट आणि ब्लू लस्सी वाला

हळू हळू सूर्य पश्चिमेला कलू लागतो. संध्याकाळ होते . दशाश्वमेध घाटावर गंगा आरतीची तयारी सुरू होते. काशी विश्वेश्वराच्या देवळातला घंटानाद आसमंत भारून टाकू लागतो. मंदिराबाहेरच्या मणिकर्णिका घाटावर चिता पेटलेली असते. 

गंगा आरती संपते. घाट गजबजून उठतात. आकाशातली चंद्राची कोर हळू हळू ठळक होऊ लागते. आकाश निरभ्र असेल तर चांदण्या गंगेच्या पाण्यावर उतरतात. एक एक घाट ओलांडून मणिकर्णिका घाटाजवळ जायचं. गडद काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर पिवळ्याकंच केशरी रंगाच्या ज्वाळा उठून दिसतात. अविरत चालू असतं त्या ज्वाळांचं आभाळाला भिडणं. 

रात्र अजून गहिरी होते. घाटांवरचा कोलाहल थांबतो. दिवसभर गंगेच्या पात्रात असणाऱ्या होड्या घाटाकडेला बांधल्या जातात. एखाद दुसरा बाबा चिलीम ओढत घाटाच्या पायऱ्यांवर पथारी पसरतो. दोन चार अघोरी साधू साधना करत असतात. एक स्तब्धता येते वातावरणात. चालू असते फक्त मणिकर्णिका घाटावरची अविरत चिता. 


आणि मग काल मावळलेला सूर्य अस्सी घाटाच्या समोरून हळू हळू परत वर येऊ लागतो. सारस पक्ष्यांचे थवे गंगेच्या पाण्यावरून उडू लागतात. एखादा कलाकार घाटाच्या पायऱ्यांवर बसून बासरीचे सूर छेडू लागतो. काल-चक्र पुन्हा सुरू होतं आणि तिथे मणिकर्णिका घाटावर मृत्युचक्र सुरूच असतं अविरत. 


मी वाचलं की मणिकर्णिका घाटाचं सुशोभीकरण करण्यासाठी काही मंदिरे तोडली गेली वगैरे. 


किती किती बारकी बारकी मंदिरे आहेत हो काशीत. नजर जाईल तिकडे मंदिर आणि हात लागेल त्या दगडाला शेंदूर फासलेला. आणि हे आज नाही , पुरातन काळापासून तसंच. 


साक्षात विश्वेश्वराच्या मंदिराचं सुशोभीकरण करून कॉरिडोर बांधला तेव्हा अनेकांची घरं, दुकान तोडली आहेत . 

तर मणिकर्णिका घाटासाठी तोडली आजूबाजूची दोन चार मंदिरे तर काय एवढं.  लोक उगाच म्हणतात , बनारस की रूह छीन ली वगैरे. 


तर मणिकर्णिका घाट. सगळ्यांना वाटतं मरण यावं तर काशीत आणि अंत्यसंस्कार व्हावेत तर मणिकर्णिका घाटावर. मोक्ष मिळतो म्हणे. सदैव सुरू असतात तिथे चिता. 


घाटाच्या बाजूचा रस्ता अगदी चिंचोळा आहे. त्या रस्त्यावरून सदैव प्रेतांची रीघ लागलेली असते. बाकी गर्दी सुद्धा असतेच. लोक कुठून कुठून येतात मोक्ष प्राप्ती साठी काशी मध्ये शेवटचा श्वास घ्यायला. 


मृत्यू यायच्या आधी ते असतात माणसं आणि मृत्यू आला की एका क्षणात त्यांची होते “बॉडी” . मग चार पैसे देऊन चौघांच्या खांद्यावर ती बॉडी जाते मणिकर्णिका घाटाच्या पायऱ्यांवर. तिथे होतात सौदे तिथल्या “डोम” राजासोबत. 

बॉडीला फासलं जातं तूप , बाजूच्या गाळ्यांमध्ये रचलेली चंदनाची लाकडं जमवून रचली जाते चिता. डोंब उसळतो आगीचा. 

मृताला मिळतो मोक्ष. त्याच्या नातेवाईकांना मिळतं समाधान , पिढ्यान पिढ्या प्रेतं जाळणाऱ्या हातांना मिळतात पैसे आणि गंगेच्या विशाल पात्राला मिळते कधी राख तर कधी अर्धवट जळलेले बॉडीचे तुकडे. 

गंगामाई सगळं तिच्या पोटात घेऊन वाहत राहते. 

मसान चित्रपट पाहिला असेल तुम्ही त्यात आहेच हे सगळं दाखवलेलं….


मणिकर्णिका घाटाच्या त्या बारक्या गल्लीतून गंगेकडे जाताना अनेक विचार मनात येतात. अंगाला घासून जाणाऱ्या तिरड्या आणि त्यावर निश्चल पडलेले देह. निव्वळ व्यवसाय म्हणून पिढ्यान पिढ्या चितेला डोंब लावण्याचं काम करणारे लोक , चंदनाच्या लाकडांचा नाकात जाणारा वास, एकच वेळी जळणाऱ्या चार , चार , पाच पाच चिता, धूर आणि एक चिता विझण्या आधीच दुसरी चिता रचायची घाई. सगळं बघून एक रितेपणा येतो 


दोनच उपाय उरतात. एकतर घाटावरून गंगेकडे जावं आणि होडीत बसून दूर दूर जावं किंवा ….

बिन चेहऱ्याच्या गर्दीला , “हे राम जयराम” च्या आवाजाला , सजवलेल्या तिरड्यांना भिडावं आणि त्याच बारीकशा गल्लीतून वरच्या अंगाला जावं - तिथं जगात भारी लस्सीचं दुकान आहे - ब्लू लस्सी वाला. त्या ब्लू लस्सी वाल्याकडे बसावं, मस्त लस्सी प्यावी , खुश व्हावं कारण मरणाला बघितल्यावर जगण्याला भिडायला जास्त मजा येते. 


- अभिषेक राऊत