Thursday, February 26, 2026

मराठी भाषा दिन…

केशरी रंगाचं रेशनच कार्ड होतं घरी. एकदा झेरॉक्स काढायला गेलेलो. तेव्हा मागच्या पानावर कुसुमाग्रजांची कविता लिहिलेली- “स्वातंत्र्यदेवतेची विनवणी” - “पन्नाशीची उमर गाठली , अभिवादन मज करू नका . मीच विनवते हात जोडुनी वाट वाकडी धरू नका “. 

भारताच्या स्वातंत्र्याला ५० वर्षं झाल्याबद्दल त्यांनी लिहिलेली कविता. १०-१२ वर्षांचा असेन मी. त्या दिवशीपासून कुसुमाग्रजांशी ओळख झाली. 


मग आठवीत असताना मराठीच्या पुस्तकातली “कणा” कविता वाचली . कुसुमाग्रजांचीच. “पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा” . त्याच्या आधी केव्हातरी अशीच मराठीच्या पुस्तकात वाचलेली , “कोलंबसाचे गर्वगीत” - “अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा , किनारा तुला पामराला” . थेट समुद्राला सांगणारा कोलंबस. समुद्र म्हटला की न चुकता आठवतात सावरकर. सातवी किंवा नववीच्या पुस्तकात होती त्यांची कविता - “ने मजसी ने , परत मातृभूमीला , सागरा , प्राण तळमळला”. 

समुद्र आठवला की गोवा आठवतो आणि गोवा आठवलं की आठवतात बोरकर. पाचवीत की सहावीत केव्हातरी वाचलेले - “माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा” किंवा मग आठवीच्या पुस्तकातले मर्ढेकर आठवतात. सकाळच्या मुंबईचं वर्णन करणारे “न्हालेल्या जणू गर्भवतीच्या सोज्वळ मोहकतेने बंदर, मुंबापुरीचे उधळत येई माघामधली प्रभात सुंदर” 

मुंबई आठवली की साहजिक नारायण सुर्वे आठवतात. दहावीच्या पुस्तकात होती त्यांची कविता - “कामगार आहे मी , तळपती तलवार आहे . सरस्वतानो थोडा गुन्हा घडणार आहे”. 


थोडं अजून मागे जाऊन बुद्धीला ताण दिला की लहानपणापासून वाचलेले समर्थांचे मनाचे श्लोक आठवतात. रोज म्हणायचो शाळेत. “मना सज्जना भक्ती पंथेची जावे” आणि मग “पसायदान” व्हायचं- “आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे”. मराठीला विश्वाच्या पटलावर उभं करून “माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेही पैजा जिंके “ असं म्हणणारे सांग ज्ञानेश्वर आठवतात. चालता बोलता “भले ते देऊ कासेंची लंगोटी, नाठाळआंचे माथा हाणो काठी” म्हणणारे तुकाराम आठवतात. गाथेची पहिली ओळख आम्हाला मराठीच्या पुस्तकातून शाळेतूनच झाली. 


तिसरी चौथीची मराठीची पुस्तकं आठवतात. इंदिरा संत आठवतात, चौथीत असताना वगैरे त्यांची कविता असेल - “नको नको रे पावसा , असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली” . बहिणाबाईंची साधी सोपी कविता आठवते, “मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर. किती हाकला हाकला फिरी येत पिकावर” . शांताबाई शेळक्यांनी लिहिलेली “पैठणी” आठवते. सहावीत होती वाटतं . “कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवटाळून, मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून. मधली वर्षं गळून पडतात , काळपटाचा जुळतो धागा , पैठणीच्या चौकड्यांनो- आजीला माझे कुशल सांगा” 

 

मराठी भाषा दिन आला की असं सगळं आठवतं. असं वाटतं आपण मराठी नाही शिकलो . मराठीने आपल्याला शिकवलं. या सगळ्या कविता पुन्हा वाचाव्यात वाटतात. असं वाटतं आपल्या लहान मुलाला या सगळ्या कविता ऐकवाव्यात. 


मग लक्षात येतं, अरे आपण तर त्याला इंग्रजी शाळेत घातलंय. आजकाल तो आपल्याशी इंग्रजी + हिंदी + मराठी अशा त्रिसूत्री भाषेत बोलतो.  “मैं खुद हा होमवर्क केलाय “ असलं काहीतरी त्याच्या तोंडून ऐकलं की स्वतःचा फार मोठा पराभव झाल्यासारखं वाटतं. 


पण ठीक आहे. आपण हरायचं नाही . रोज एखादा वाक्प्रचार , एखादी म्हण , एखादा नवीन शब्द नव्या पिढीला शिकवायचा. मराठी दिन नव्या पिढीसोबत रोज साजरा करायचा. मग एक दिवस आपोआपच इंग्रजी शिकणारी ही पिढी सहजपणे तुकोबाचे अभंग समजून घेईल आणि कुसुमाग्रजांच्या कविता सुद्धा. तोवर म्हणत रहायचं , “अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा , किनारा तुला पामराला” 


मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा. 


  • अभिषेक राऊत 

1 comment: