खरं तर मी सिनेमावर लिहीत नाही कारण मला त्यातलं काही कळत नाही पण काल परवा इम्तियाज अली चा मै वापस आउंगा पाहिला आणि बरंच काही आठवलं.
उल्हासनगरच्या कॅम्पमध्ये गेलेलो फार फार पूर्वी फर्निचर घ्यायला. तेव्हा बाबांनी सांगितलेलं. फाळणीनंतर पाकिस्तानमधून आलेल्या सिंधी लोकांसाठी बांधलेले हे रिफ्युजी कॅम्प. घरदार , पैसा अडका सगळं सोडून कुणी मुलतान , कुणी सिंध तर कुणी कराची मधून इकडे आलेले सिंधी लोक आणि त्यांनी वसवलेलं उल्हासनगर. तेव्हा ना फाळणी समजायचं वय होतं ना रिफ्यूजी कॅम्प समजण्याचं.
नंतर इतिहासाच्या पुस्तकात एक वाक्य होतं . १९४७ नंतर फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान हे दोन देश निर्माण झाले. एकच वाक्य. फक्त एकच वाक्य.
नंतर फाळणीबद्दल बऱ्यापैकी वाचलं. फाळणीची राजकीय आणि सामाजिक अपरिहार्यता, त्या काळात तयार झालेलं हिंदू विरुद्ध मुस्लिम समाजमन, मुस्लिम लीग ने पुकारलेला “डायरेक्ट एक्शन डे “ आणि त्यात झालेली हिंदूंची कत्तल आणि मग अत्यंत घाईघाईत झालेली फाळणी आणि त्यानंतरचा हिंसाचार.
तशी तर फाळणी झाली भारताची पण त्याचे कायमचे घाव सोसले पंजाब आणि बंगाल ने. सिनेमा बघताना कधी काळी वाचलेल्या गोष्टी आठवतात.
पृथ्वी थिएटर ला मंटो महोत्सव लागलेला तेव्हा टोबा टेक सिंह या त्याच्या कथेवर केलेलं नाटक पाहिलेलं. त्या कथेतल्या बिशन सिंगचं दुःख.
एकदा असंच अमृता , साहिर आणि इमरोज बद्दल वाचताना हाती लागलेली अमृता प्रीतमची फाळणीवरची कविता आठवते . हीर-रांझा सारखी अजरामर प्रेमकथा लिहिणाऱ्या वारीस शाह ला उद्देशून लिहिलेली कविता.
ती म्हणते , पंजाबमधल्या हीरचं दुःख तू हीर-रांझा लिहून अजरामर केलंस मग या फाळणीच्या दिवसातल्या असंख्य स्त्रियांची दुःख तुला दिसत नाहीत काय. कधी लिहशील याबद्दल वारीस शाह, कधी लिहशील, उठ तुझ्या कबरीतून उठ ….
“अज्ज आखाँ वारिस शाह नूँ कित्थों क़बरां विच्चों बोल
ते अज्ज किताब-ए-इश्क़ दा कोई अगला वरका फोल
इक रोई सी धी पंजाब दी तू लिख-लिख मारे वैन
अज्ज लक्खां धीयाँ रोंदियाँ तैनू वारिस शाह नु कैन”
फैझ आठवतो. एकेकाळी त्याच्या “हम देखेंगे” ची पारायणं केलेली. आणि अचानक सुबह- ए- आझादी वाचण्यात आली.
“ये दाग़-दाग़ उजाला, ये शब-गज़ीदा सहर
वो इंतिज़ार था जिस का, ये वो सहर तो नहीं!”
अखंड हिंदुस्तानातल्या प्रत्येकाला हवी असणारी, प्रत्येक देशभक्ताने स्वप्नात पाहिलेली ती “सहर” … ती सकाळ कधी उगवलीच नाही.
नेहरूंच्या लाल किल्ल्यावरच्या भाषणाचे शब्द आठवतात, “at the stroke of midnight hour…..” आणि त्या रात्री आणि त्यानंतरचे कित्येक दिवस आणि रात्र पंजाब आणि बंगालच्या सीमेवर घडलेले अत्याचार….
बॅचलर असताना वाकडला रहायचो दोस्तांसोबत. वेड्यासारखं कोक स्टूडियो ऐकायचो. तेव्हा ऐकलेली पीयूष मिश्राची “हुस्ना”. शेवटच्या एका ओळीत पाणी येतं डोळ्यांत…. “रोता है रातोंमे पाकिस्तां क्या वैसा ही जैसे हिंदोसतां यहां..”
मागच्या वर्षी कलकत्त्याला रविन्द्रनाथांच्या हवेलीला - “जोराशंखों ठाकूर बाडी” ला भेट दिलेली. वाटलेलं की नशीब फाळणी झाली तेव्हा रवींद्रनाथ हयात नव्हते. “आमार शोनार बांगला” लिहिणाऱ्या रवींद्रनाथांना फाळणी आणि बंगालचे तुकडे सहन झाले असते काय.
शेरशाह मधले ऐन बॉर्डरवर लढाईच्या धामधुमीत एकमेकांना पंजाबीतून चिथावणी देणारे भारतीय आणि पाकिस्तानी सैनिक आठवतात. ज्यांची मातृभाषा एक आहे, जे एथनिकली पंजाबी आहेत असे लोक फक्त मधल्या एका बॉर्डर नावाच्या रेषेमुळे, धर्मामुळे एकमेकांच्या जीवावर उठतात हे माणूस म्हणून अंगावर येणारं असतंय.
धुरंधर सारखे चित्रपट , देश म्हणून , देशभक्ती जागवावी म्हणून महत्वाचे असतील, असावेत. पण एखादा मैं वापस आउंगा सुद्धा असावा. सिनेमाच्या शेवटी जगभरातल्या विस्थापितांचं दुःख अधोरेखित करणारा….
मला गाव नाही , मुंबईसारख्या रुढार्थाने स्थलांतरितांच्या शहरात मी वाढलो, देशाच्या सीमेवर जेव्हा ड्रोन उडत होते त्याची पुसटशी झळ मला पोचली नाही. तरीही कधी काळी झालेल्या फाळणीवरचा सिनेमा बघताना मला सतत त्यावर वाचलेलं आठवत राहतं, आतून हलून जायला होतं.या सगळ्याला ७५ पेक्षा जास्त वर्षं झाली. फाळणी बघितलेली पिढी हळू हळू काळाच्या पडद्याआड जातेय. इंस्टाग्रामवर रिल्स दिसत राहतात. ७०-८०-९० वर्षांचे म्हातारा - म्हातारी सांगतात त्या अनुभवांबद्दल. अत्याचारांबद्दल पण सांगताना ना कडवटपणा असतो ना द्वेष. असतात त्या फक्त लहानपणीच्या गावच्या आठवणी, हरवलेले , मागे सुटलेले लोक , त्यांच्या आठवणी आणि परत जाण्याची ओढ.
आम्ही नशीबवान. आम्हाला ना युद्धाच्या झळा बसल्या , ना दंगलीचे चटके बसले , आमची घरं कुणी उध्वस्त केली नाही, ना आम्हाला कधी जातीय- वर्गीय संघर्षाचे फटके बसले. आमच्यासारख्यांना- ज्यांच्या आजूबाजूला पद्धतशीरपणे द्वेष पेरला जातोय त्यांना सिनेमातून पुन्हा एकदा शुद्ध, निर्विवाद प्रेम आणि त्या प्रेमाची ताकद दाखवल्याबद्दल इम्तियाज अली चे आभार मानायला हवेत.
- अभिषेक राऊत
