Friday, November 18, 2016

म्हातारी, मी आणि वर कुठेतरी घेतलेला निर्णय



आमच्या बिल्डिंगमधून खाली उतरलात कि लगेच चौक लागतो. नेहमी गजबजलेला. अगदी प्रातिनिधिक असा. चार रस्ते चार बाजूंनी अस्ताव्यस्तपणे एकत्र येतात तिथे. एका कोपऱ्यातलं वाण्याचं दुकान फूटभर रस्त्यावर आलेलं असतंय. तिकडे तो भाज्या मांडतो. वरती लावलेल्या हिरव्या रंगाच्या दिव्याने त्या दिवसभर ताज्या दिसत राहतात. दुसऱ्या कोपऱ्यात चहावाल्याने त्याचा संसार थाटलाय. त्याने दुकानासमोर टाकलेल्या बाकड्यांवर दिवसभर गर्दी असते. एखादे टोपीवाले आजोबा, रोजंदारीवरचे मजूर, समोरच्या स्टॅन्डवरचे रिक्षावाले, काळ्या काचांच्या गाडीतून उतरणारे "गुंठामंत्री" आणि असे कित्येक जण. त्याबाजूलाच पोहे, मेदुवडा, इडली मिळते. संध्याकाळी तोच डोसे विकतो. दिवसभर माणसांच्या, गाड्यांच्या गर्दीत ओथंबणाऱ्या चौकाच्या मध्यभागी, येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होईल अशा योग्य ठिकाणी चौकाच्या नावाचा बोर्ड असतो. ती त्या चौकाची ओळख असते.
ती त्या चौकात रोज सकाळी येते. ठरलेल्या वेळेला. तिच्या हातात एक झाडू असतो आणि पाठीला मोठ्ठालं गोणपाट. चार रस्त्यांच्या कडेकडेने झाडते आणि गोळा होणार कचरा गोणपाटात भरत जाते. एका कोपऱ्यातल्या टपरीपासून सुरुवात करत. ती झाडत जाते आणि उडणाऱ्या धुळीसोबत गोळा होत जातात असंख्य गुटख्याची पाकीटं, सिगारेटींची थोटकं आणि चुरगाळून टाकलेले कागद. ती सारं काही पाठीवरच्या गोणपाटात भारत जाते आणि पुढे सरकते. पुढे सरकण्याआधी टपरीवाला तिच्या हातात एक विडी टेकवतो. वाण्याच्या दुकानासमोर ती थोडं जास्तवेळ थांबून नीटपणे झाडते. तिने रस्ता झाडल्याशिवाय तो त्याच्या ताज्या हिरव्या भाज्या मांडून ठेवत नाही. दुकानासमोरचा सगळा कचरा गोणपाटात भरल्यावर  काही वेळ त्याच्या पायरीवर रेंगाळते. गल्ल्यावर बसलेला शेठ ते पाहून उठतो. एका हाताने नाकाला लावलेला रुमाल  तसाच ठेवून दुसऱ्या हाताने दहा-वीसची एखादी नोट काढून तिच्या हातात टेकवतो. ती पुढे सरकत राहते झाडू आणि गोणपाट घेऊन. काय काय पडलेलं असतं रस्त्यांच्या कडेला. प्लास्टिकच्या पिशव्या, रात्री  भर चौकात दारू पिऊन फेकून दिलेल्या बाटल्या, चुरगाळून फेकलेली जुनी बिलं,तिकिटं, वापरून फेकलेल्या असंख्य गोष्टी ज्यात टूथपेस्टच्या संपलेल्या ट्यूबपासून ते कॉन्डोमच्या रिकाम्या पाकिटापर्यंत सगळं काही असतं. ती सगळ्यांवर आपला झाडू फिरवत जाते आणि गोणपाट भारत जाते. चौकाच्या एका कोपऱ्यात पोहे, मेदुवडे विकणारा असतो. त्याच्या आजूबाजूला नेहमी गर्दी असते. गर्दी सहजपणे तिला वाट करून देते. लोक तोंड फिरवतात, काही तोंड वाकडं करतात, काही एका हाताने आपली खाण्याची प्लेट झाकून घ्यायचा प्रयत्न करतात. ती सहजपणे पुढे जाते, कोपऱ्यात ठेवलेला कचऱ्याचा डब्बा ज्यात लोकांच्या खरकट्या प्लेट्स, प्लास्टिकचे चमचे, अर्धवट उरलेला सांबार, फेकून दिलेली चटणी असं सारं काही असतं. ते ती उचलते आणि आपल्या गोणपाटात रिकामं करते आणि पुढे जात राहते. त्याच शेजारी फुलवली आजी दुकान मांडत असते. शिळी फुलं गोणपाटात टाकून ती  पुढे सरकते. कधी कधी आजी तिच्या हातात एखादा गजरा ठेवते तेव्हा ती खुश होते. एका कोपऱ्यात उभं राहून ती स्वच्छ झालेल्या चौकाचा अंदाज घेते. निघताना तिला कधी कधी  एखाद प्लेट मेदुवडा किंवा पोहे मिळतात किंवा गरमागरम चहा करणाऱ्या पोराच्या हातून एखाद कप चहा. त्याने चहा दिला कि खूपशा प्रेमाने ती त्याच्याकडे पाहते. चहा पिऊन झाल्यावर कप ठेवताना सहजपणे ती त्या पोराच्या डोक्यावर हात ठेवून जातेकदाचित तिला तिचा नातू आठवत असावा. चहा आटोपला कि चौकाच्या एका कोपऱ्यात काळी छत्री उघडून चाम्भाराचं सामान घेऊन बसलेल्या आजोबांच्या शेजारी बसून टपरीवाल्याने दिलेली विडी ओढते. रोज सकाळी तीन चार चौक झाडून पन्नासेक रुपये कमावणारी  म्हातारी  आमच्या चौकाचं अविभाज्य अंग झालेली असते. मला वाटत असतं कचरा गोळा करणाऱ्या त्या आज्जीला आणि चौकाला एकमेकांशिवाय करमत नसेल.
 एक दिवशी नाश्ता करताना मला लक्षात येतं, एका कोपऱ्यात ती एकटीच बसलीये, रस्त्याकडे पाहत. निरपेक्ष नजरेने. मी आधी तिच्याकडे पाहतो आणि मग रस्त्याकडे. मला दिसतं रोड स्वीपिंग मशीन. दहा मिनिटात ते मशीन चारी रस्ते झाडून काढतं. धुळीचा एक कणसुद्धा उडत नाही. सगळा रस्ता स्वच्छ होत जातो. टपरीवाल्याला एक विडी द्यावी लागत नाही, शेठला उठून दहा रुपये द्यावे लागत नाहीत, चहावाल्याचा रोजचा एक फुकटचा चहा वाचतो. मला आठवतं पेपरमध्ये स्वीपिंग मशीनबद्दल वाचलेलं. वर कुठेतरी सरकारी पातळीवर निर्णय झालेला असतो आणि स्थायी समितीने असे १० मशिन्स मागवलेले असतात. सिंगापूरच्या धर्तीवर. शहरातले चाळीस चौक स्वच्छ करायला. निवांतपणे ते मशीन अक्खा चौक स्वच्छ करत पुढे जात राहतं आणि ती म्हातारी कुठल्याश्या अस्वस्थतेने कोपऱ्यात बसून राहते. मशीन दूर निघून जातं. चौक स्वच्छ झालेला असतो. म्हातारीचं गोणपाट आज रिकामं असतं. ती पूर्ण चौकात एक फेरी मारते. तिच्याकडे कुणाचंच लक्ष जात नाही. नेहमीच्या लोकांचंही नाही. ती शांतपणे चालू लागते, दूर दूर जाऊ लागते. मला जाणवतं कि अरे आपल्याला उगाचंच असं वाटत होतं कि कचरा गोळा करणारी ती म्हातारी आणि तो चौक यांना एकमेकांशिवाय करमणार  नाही.
त्यानंतर ती म्हातारी मला पुन्हा दिसली नाही. बाकी सगळं  तसंच आहे. म्हातारी कुठे तरी नामशेष झाली. शहराला सिंगापूर बनवायचं तर तेवढी काळ सोसायलाच हवी. कधी कधी असं वाटतं , उतरंडीच्या वर कुठेतरी असणाऱ्या  चार डोक्यांनी मिळून घेतलेला एखादा निर्णय फार खाली राहिलेल्या कुणाला बघता बघता कसा नामशेष करेल सांगता येत नाही.

-अभिषेक राऊत

Tuesday, September 27, 2016

दोघांच्या गोष्टी - अनोळखी



त्याने कचकन ब्रेक दाबला. आवाज करत गाडी रस्त्याच्या कडेला थांबली. थंड नजरेने तिच्याकडे पाहत तो म्हणाला "खाली उतर". तिला क्षणभर काही उमजेना. तडक बाहेर पडून त्याने तिच्या बाजूचा दरवाजा उघडला, तिला दंडाला धरून  बाहेर खेचलं आणि म्हणाला "चल नीघ माझ्या गाडीतून .. ". काही कळायच्या आत तिच्या नजरेसमोरून त्याची गाडी निघूनही गेली. अंगावर पडणाऱ्या पावसाच्या टपोऱ्या थेंबांनी ती भानावर आली तेव्हा तिला जाणवलं कि तो निघून गेलाय.

टपोरे थेंब. आता हे असेच भुरभुरत राहणार. या शहरातला पाऊस हा असाच. ठिबक सिंचनसारखा. तिला कठीण जायचं सुरुवातीला. सलग दहा मिनिटं झड लागल्यागत कोसळणाऱ्या पावसाची सवय तिला. कळायचंच नाही तिला या अशा पावसात बाहेर पडायचं कि नाही, छत्री उघडायची कि नाही, बाजूला थांबायचं की चालत राहायचं. असला पाऊस सोप्पा केला तो त्यानेच. पहिला पाऊस आला की त्याचा फोन यायचा. "खाली येऊन उभी राहा". दहाव्या मिनिटाला ती त्याच्या कारमध्ये बसायची.  ५ मिनिटं ड्राईव्ह केल्यावर गाडी मेनरोडच्या कडेला थांबायची. तिथून आत वीस पावलांवर "अमृततुल्य".
त्याचं सगळं असंच. वेळ अवेळ काही पाहणार नाही. मनात आलं कि भेटायला हजर.  त्याचा तो मनस्वीपणाच फार आवडायचा तिला तेव्हा. ती वाफाळणारा चहा प्यायची, तो सिगरेट प्यायचा आणि त्यांना बघत पाऊस ५ मिनिटं जास्तच भरभुरायचा. एकदा ती त्याला बोलली, "सिगरेट नको पीत जाऊस", ते ऐकून त्याने सिगरेट खाली फेकली आणि अशी काही चिरडली की पुन्हा त्या विषयावर त्यांचं बोलणं झालं नाही. पावसासोबत काय काय आठवेल कसला नेम नाही.
विचार करता करता क्षणभर तिने आजूबाजूला नजर फिरवली. या शहरात तिने आयुष्याची चार वर्षं काढली होती. त्या दोघांचं आवडतं ठिकाण तिथून जवळंच होतं. शांतपणे पावलं टाकत ती त्या दिशेनं निघाली.

त्याने गाडी भरधाव सोडली. तिचे शब्द त्याच्या कानात घुमत होते. घुमणाऱ्या प्रत्येक शब्दागणिक त्याच्या हाताची पकड स्टिअरिंगवर आणखी घट्ट होत होती.  वेग वाढत होता. इतक्यात समोरून येणाऱ्या गाडीचे हेडलाईट्स त्याच्या डोळ्यांना कापत गेले. त्याने झटकन स्टिअरिंग डावीकडे फिरवलं. करकचून ब्रेक दाबला. कर्कश्श आवाज करत त्याची गाडी बाजूला जाऊन थांबली. त्याने झटकन बाजूला पाहिलं. त्याला आवर घालणारी ती बाजूला नव्हती. कपाळावर जमा झालेल्या घामाच्या थेंबांनी त्याला भानावर आणलं. समोरच्या खोक्यातून टिशू काढून त्याने घाम पुसला. आपण भर रस्त्यात तिला एकटं सोडून आलोय हे त्याच्या लक्षात आलं. त्याने गाडी फिरवली. मोबाईल पाहिला. तिचा फोन नाही, मेसेजही नाही. तिचे शब्द त्याला आठवले. आताशा तो बराच शांत झालेला. त्याने गाडी बंद केली. सिगरेट पेटवली. "येईलच तिचा फोन." म्हणत दोन लांबलचक झुरके घेतले. झक मारत २०० किलोमीटर आलो आपण असं त्याला वाटून गेलं.


हा विषय आज संपायला हवाय कायमचा. तिच्या डोक्यात विचार घुमू लागले तशी तिची चाल वेगावली. त्याने ठरवायलाच हवंय. त्याला काय हवंय, कधी हवंय, कसं हवंय. बाबा म्हणायचे तसं ,आयुष्याचं टाईमटेबल रेडी पाहिजे डोक्यात. काय चूक आहे आयुष्य प्लॅन करण्यात. पूर्वी तर मी माझ्या उन्हाळ्याच्या सुट्टीचंही प्लॅनिन्ग करायचे, आयुष्य तर नक्कीच त्यापेक्षा मोठी गोष्ट आहे. वयाच्या पंचविसाव्या वर्षी हे पण करतो , ते पण करतो, तसं पण करून बघतो , असं कसं चालेल.त्याची हीच गोष्ट कदाचित तिला  गेल्या काही महिन्यांपासून खुपत होती. वेळच्या वेळी त्याला सेटल व्हायलाच लागेल. गेल्या चार वर्षांत इतका चाकोरीबद्ध विचार तिने पहिल्यांदाच केला असेल. असं नक्की काय घडलंय कि ज्यामुळे आपण इतकं सरधोपट विचार करायला लागलोय हे तिलाही उमगत नव्हतं. कदाचित, बऱ्याच वर्षांनी तिचं upbringing तिच्या विचारांतून डोकावत होतं.

आपलं upbringing different आहे. मग ही अक्कल चार वर्षांपूर्वी नव्हती का हिला. तेव्हा तर तिला सगळं छान वाटायचं. पासआऊट झाल्यावर मला भारत फिरायचाय हे ऐकून सगळ्यात जास्त तीच एक्साईट झाली होती. अचानक हे सेटल व्हायला हवंय, नोकरी करायला हवीय हे सगळं कुठून आलं. प्रत्येक वेळेस भेटलं कि हाच विषय. मग सगळी चर्चा upbringing, lifestyle वर यायची. माझ्या आयुष्याची  "to do" list नाहीये आणि तशी लिस्ट न बनवताही जगता येऊ शकतं हे हजारदा सांगूनही तिला पटायचं नाही. वाटायचंच नाही की काही वर्षांपूर्वी याच आयुष्यावर  ती फिदा झाली होती. विचारांच्या तंद्रीत त्याने गाडी त्यांच्या आवडीच्या कॉफी शॉप कडे वळवली.

ती तिथे असणार हे नक्की माहीत होतं त्याला. समोरासमोर बसले दोघं. आपापल्या परीने आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधू लागले. कदाचित दोघांना एकत्रच उत्तरं मिळाली असावीत.
ती त्याला म्हणाली, "I am sorry. Sometimes, you can’t marry your love, you have to find husband”.
तो तिला म्हणाला, "Sometimes, it is better to be wanderer than to settle down for love" आणि मग अनोळखी होऊन ते दोघे कॉफी शॉपच्या बाहेर पडले.

 -अभिषेक राऊत 

Sunday, May 29, 2016

रॅंडम रात्रीची गोष्ट



रॅंडम रात्रीचा प्रवास काळोखासोबत सुरु होतो. काळोख उतरत जातो आजूबाजूला. शांतपणे. जसं जमिनीत पाणी मुरतं तसं. काळोखासोबत प्रवास करते ती रात्र. रॅॅंडम प्रवास. वाट फुटेल तिथे जायचं. रात्रीला बंधन नाही. तिला कुणी सांगत नाही तू नको येउस इकडे. काळोख जसजसा जमिनीवर उतरत जातो तसतशी रात्र अजून काळवंडत जाते. आपणसुद्धा रात्रीसोबत बाहेर पडायचं. तिच्यासोबत चालायचं. तिच्यावर बंधनं नाहीत पण आपल्यावर आहेत. निर्बंध नसणारी रात्र म्हणूनच हवीहवीशी वाटते. रात्रीला कुठेही जाता येतं. दरी-डोंगरांत उतरता येतं. निर्मनुष्य पठारांवरून चालता येतं. रॅॅंडमपणे कुठेही कसंही. आपल्याला वाटतं रात्रीला डोळे नसतात, पण तसं नसतं. डोळे सताड उघडे ठेऊन रात्र फिरते. तिच्या उघड्या डोळ्यांना जे दिसतं ते ती पाहते. पाहते आणि पचवते. त्याचा बोभाटा करत नाही. रात्र आवडण्यामागे हे एक कारण असतं.

रॅॅंडमपणे कुठेही जाते रात्र. मावळच्या खोऱ्यात. अलगद उतरते. काळोखाचा फायदा घेऊन जमिनीशी लगट करायला आलेल्या ढगांना हलकेच चिरत जाते; त्यांच्या लगटपणाकडे बिल्कुलही न पाहता. तितक्याच सहजतेने ती फिरते इंद्रायणीच्या घाटावरून.  एकाच लयीत नादणाऱ्या मृदंगाना ऐकत. त्या रात्रीच्या जगात सारखेच असतात सगळे…घाटावर झोपलेले, फुटपाथवर झोपलेले, फलाटावर झोपलेले, सायडिंगला लागलेल्या गाडीच्या डब्ब्यात झोपलेले किंवा भल्या  महालात झोप लागत नाही म्हणून अस्वस्थ कुढणारे. रात्रीचं चांदणं उतरत जातं मशिदीच्या घुमटावर, मंदिराच्या कळसावर. तेव्हा रात्रीला कुणी तिचा धर्म नाही विचारत. मंदिराच्या पायथ्याशी ती घुटमळत नाही कारण तिला कुणी म्हणत नाही… हे  बहुजनांचं मंदिर आणि हे बामणांचं. सहजतेने ती पाहते, देवापुढे घातलेल्या गोंधळात अंगात आल्यावर मुक्तपणे नाचणार्यांकडे आणि निसर्गाच्या सान्निध्यात रंगलेल्या एखाद्या "ट्रान्स"मध्ये हेडबॅंगिंग करणार्यांकडे. गांजाच्या धुराकडे आणि कुठल्याश्या खोपट्यातल्या चुलीत अर्धवट जळणाऱ्या लाकडातून येणाऱ्या धुराकडे. रात्र साक्ष असते. फडात रंगलेल्या तमाशाला, दारू पिउन घातलेल्या गोंधळाला, तुकडे तुकडे करून फेकून दिलेल्या मृतदेहाला.… पण रात्र कधीच ह्या साऱ्याची साक्ष देत नाही. रात्र अशी रॅॅंडम असते. काहिही पाहणारी आणि पचवणारी.

याच रात्रीसोबत फिरताना, एका धोक्याच्या क्षणी आपला डोळा लागतो आणि रात्र संपते. रात्रीसोबत संपतो तो रॅॅंडमनेस. दिवस  साचेबद्ध असतो. कारण तो बांधून घेतो स्वतःला तासांमध्ये, मिनिटांमध्ये. दिवस उजाडतो आणि जे फक्त रात्रीला दिसत असतं ते सगळ्यांना दिसायला लागतं. आपणसुद्धा बांधून घेतो स्वतःला दिवसांमध्ये, वर्षांमध्ये. ठरवतो सगळं. बाविसाव्या वर्षी डिग्री, चोविसाव्या वर्षी दुसरी डिग्री, सव्वीसाव्या वर्षापर्यंत नोकरी, अठ्ठाविसाव्या वर्षी लग्न , तिसाव्या वर्षी पोरं.…. बांधून घेतो स्वतःला.….  रात्रीचा रॅॅंडमनेस जेव्हा हवाहवासा वाटतो तेव्हा चारचाकी काढून जातो लोणावळ्याला. काही तास.… छान वाटतं.  अगदी तसंच जसं "capitalism"चे सगळे फायदे घेतलेल्याला "Communism" छान वाटतो.

मला व्हायचं असतं रात्रीसारखं एकदम रॅॅंडम. पण माझ्या आजूबाजूचे मला थोपटतात. छान छान गोष्टी सांगून. नकळत माझा डोळा लागतो. मी उठलयावर पाहतो तर दिवस उजाडलेला असतो. उठलयावर ते मला सांगतात…. रात्र संपली. त्याच रात्रीसोबत, रात्रीसाठी लिहिलेली ही रॅॅंडम गोष्टसुद्धा संपली.

-अभिषेक राऊत 

Tuesday, January 19, 2016

"राठोड"

त्या दिवशी संध्याकाळी हजरत  निजामुद्दीनला जनरलचं तिकीट काढून आरक्षित डब्ब्यात चढलो तेव्हाच लक्षात आलेलं की खांडव्यापर्यंतचा किमान १६ तासांचा प्रवास आरक्षित डब्यातल्या सर्वात दुर्लक्षित जागेत बसून करावा लागणार आहे. कपाळाला गंध, हातात ४ वेगवेगळ्या खड्यांच्या अंगठ्या, अंगात काळा कोट आणि तोंडात खास बनारसी पानाचा तोबरा भरलेला TC दिसला. त्याला अत्यंत प्रेमाने, "देखो सरजी, कहां जुगाड हो रहा है तो" वगैरे विनवण्या करून पाहिल्या पण काही उपयोग नाही. शौचालयच्या बाजूच्या जागेत १६ तास काढता येतील इतका निर्ढावलेपणा शरीराच्या प्रत्येक अवयवांत आणला.  तोवर गाडीने आग्रा सोडलं होतं. फारसा त्रास होत नव्हता. अगदी टिपिकल मध्यमवर्गीय असल्याने "परिस्थितीशी जुळवून घेणं"तसं माझ्या रक्तातच. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे अक्ख्या डब्ब्यात जेवढे प्रवासी नसतील तेवढे प्रवासी "दरवाजा ते शौचालय" या भागात सहज सामावून घेतले जाऊ शकतात हे सुद्धा लक्षात आलं. एकेक स्टेशन घेत गाडी राजस्थानातल्या कुठल्याशा स्टेशनात शिरली तेव्हा रात्रीचा १ वाजला होता. अंगाचा पंचकोन किंवा षट्कोन करून मी एका कोपऱ्यात बसलेलो. टक्क जागा होतो. तेवढ्यात ते दोघे डब्ब्यात चढले.
ते दोघे. आधी तो आत शिरला. डार्क रंगाचा शर्ट, बाह्या कोपरापर्यंत खेचलेल्या, नजरेत एकाच वेळेला आत्मविश्वास, माज आणि तरीही अस्वस्थ भिरभिरणारे भाव. त्याच्या मागोमाग दुसरा. वयाने त्याच्यापेक्षा बराचसा मोठा. कदाचित फक्त वायानेच. दोघांच्या चेहऱ्यात बऱ्यापैकी साम्य. पण ते फक्त दिसण्यात. दुसऱ्याचा चेहरा तसा निर्विकार, डोळ्यांत फारशी चमक नाहीच असलंच तर कारुण्य. ते सुद्धा भरभरून नाही… त्याला आयुष्यात मिळालेल्या सुखाइतकच…अगदी कणभर.
माझ्याच पुढ्यात ते दोघे बसले. बाप-लेक. अगदी स्वाभाविकपणे मी त्या मुलाच्या बाजूला सरकलो आणि आमच्या गप्पा सुरु झाल्या.
 "राठोड  हैं हम." वाक्यावाक्यात एक प्रकारचा अभिमान आणि "राठोड"पणाची झलक. बोलता बोलता त्याने पाकीट काढलं. पाकिटात दहा-दहाच्या दोन जुनाट नोटा. आतमध्ये जपून ठेवलेला महाराणा प्रतापचा फोटो. "ये हैं हमारे वंशज और हमारे आदर्श. जिस दिन खुद का पैसा कामायेंगे उस दिन टेटू निकलवाएंगे "जय राजपुताना" नाम से. खून से रजपूत हैं  हम" ऐकता ऐकता मी मधूनच त्याच्या बापाकडे पाहायचो. त्याच्या चेहऱ्यावरची निष्क्रिय असाहायता आणि डोळ्यांतली केविलवाणी चमक "राठोड"पणाशी कुठेच जुळायची नाही. बोलता बोलता त्याला तहान लागली. बापाकडे त्याने पाणी मागितलं. एक घोट प्यायला आणि म्हणाला, "ये तो गरम हैं. पाणी ठंडा चाहिये." बाप काहीच बोलला नाही… कदाचित सवयीनुसार.….
थोड्याच वेळात कुठल्याशा छोट्या स्टेशनात गाडी थांबली. सिग्नल लागला असावा म्हणून.  त्याने पाण्याची बाटली घेतली आणि तो खाली उतरला. रात्री अडीच तीनची वेळ असावी. त्या टोकाला सार्वजनिक नळ होता. त्याने पाणी भरायला सुरुवात केली आणि गाडीने भोंगा दिला. निघण्याचा. इतका वेळ बसलेला त्याचा बाप उठला आणि दरवाजात आला. बापाच्या डोळ्यात काळजी होती. "किसने कहा था पाणी लेनेको??? आजा जल्दी ." शक्य तितक्या जोरात आणि अधिकाराने काही बोलेपर्यंत गाडीने वेग पकडला आणि नळासमोरून तो सुद्धा दिसेनासा झाला. पुढच्या दोन मिनिटांत बापाच्या डोळ्यांत मी राग, असहायता आणि हताशपणा सारं काही पाहिलं. "बिलकुल भी हमारी नहीं सुनता. हम जो कहे उसके ठीक उलटा करना हैं इसको. " वाक्य पूर्ण होतंय न होतंय इतक्यात मागच्या  डब्ब्यातून  तो आला. बापाने त्याला चार शब्द सुनावले. त्याने पाण्याची बाटली बापाला दिली  आणि म्हणाला, "ये लिजिये. पिजीये….  ठंडे हो जाइये. हम गये वहां इसलिये ठंडा पानी मिला. बैठे रहके जिंदगीभर गरम पानी नहीं पिना हैं हमें." तो माझ्या बाजूला येउन बसला. माझ्या नजरेला नजर मिळवली आणि म्हणाला,"कभी कभी हमें लगता हैं घरमें सिर्फ हम ही राठोड हैं " या वाक्यावर त्याच्या बापाकडे पहायची माझी हिंमत झाली नाही.
कुठल्याशा स्टेशनात ते दोघे उतरले. जाताना म्हणालेला "फेसबुकपे हू मैं".  मी काही त्याला पुन्हा शोधलं नाही. नावापुढे "राजे" आणि आडनावापुढे "पाटील" लावणारे पुष्कळ "पोरं" मी पाहतो कधी कधी मला त्यांच्यात तोच दिसतो. कधी कधी वाटतं आपला अंदाज चुकीचा असेल.  फक्त एक प्रश्न मला राहून राहून सतावतो कि ऐन तारुण्यात असलेलं हे "राठोड"पण कायम राहील की आयुष्यातले उन्हाळे-पावसाळे बघून त्याचाही "बाप" होईल.

-अभिषेक राऊत

Saturday, November 7, 2015

लेबर चौक, IT , स्किल्स वगैरे वगैरे ….



लेबर चौक, IT , स्किल्स वगैरे वगैरे ….


cubicle
एका मोठ्या शहरात मी राहतो. माझ्या आजूबाजूला जिकडे नजर जाइल तिकडे फक्त बांधकाम सुरु असतं. १०-१५ मजल्यांच्या उंच इमारती. इमारतींच्या मध्ये गार्डन, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रक, त्याच्या बाजूने कृत्रिम झाडांची हिरवळ, त्या झाडांच्या अंगावरून सोडलेल्या लाईटच्या माळा, काडेपेटीसारखी चौकोनी घरं आणि त्या चौकोनी घरांत राहणारी समाधानी चार लोकं. शहराच्या कुठल्याही भागातून मला हेच दिसतं.
मी ह्या शहरात आलो तेव्हा लहान होतो लहान म्हणजे वयाने नाही अनुभवाने. माझ्याच सोबत कधीतरी तो सुद्धा ह्या शहरात रहायला आला असावा. शहराच्या एका कोपऱ्यात रांगेने बांधून ठेवलेल्या वेगवेगळ्या नावांच्या खूप सुंदर इमारती होत्या. मी रोज तिथे जायचो. काम करायला. माझ्याचसारखे काही हजार लोक तिकडे यायचे. वेगवेगळ्या वयाचे, अनुभवाचे, स्किल्सचे आणि वेगवेगळ्या विचारांचे लोक. रोज अशा बिल्डीन्गीमध्ये बसून काम करायचे. त्यांना प्रत्येक शहरांच्या कोपऱ्यात जाउन गोळा केलेलं.त्यांना विचारलेलं तुमची स्किल्स काय? त्या स्किल्सची किंमत ठरायची आणि मग वर्षाला त्या हजारो लोकांना त्यांच्या कुवतीनुसार “पगार” मिळायचा. त्यांच्या मधलाच एक मी. ……. आणि तो? तो रोज बघायचा ह्या शहरातले लोक सकाळी एका छोट्या चौकोनात चौकोनात काम करतात आणि संध्याकाळी मोठ्या चौकोनात येउन आराम करतात. मोठ्या चौकोनाना म्हणायचं घर आणि छोट्यांना म्हणायचं “क्युबिकल”. मोठे चौकोन बांधण्याचं काम करणारे शहराच्या एका कोपऱ्यातून “स्किल”बघून लोक उचलायचे. त्यालाहि तसंच उचललेलं. तासाच्या हिशोबाने त्याला दर महिना पैसे मिळायचे. माझंही तसंच.………
हळूहळू आम्ही दोघेही मोठे होत गेलो. आधी मी स्वतःच्या कामाचा विचार करायचो, आता “प्रोजेक्ट”चा करायला लागलो. अजून थोडा मोठा झालो. आता माझ्यासाठी काम फक्त काम न राहता “बिझनेस” झालं होतं. मोठ्या मोठ्या “प्रोजेक्ट”वर मी लोक लावायला लागलो. झटझट प्रमोशन घेत पुढे गेलो. तो सुद्धा एकेक पायऱ्या चढत गेला. कामगार होता, ठेकेदार झाला, पुढे पुढे जात राहीला. स्वतःचे स्किल्स विकता विकता तो स्किल्ड लोक विकू लागला.
परवा एका मोठ्या पार्टीमध्ये तो भेटला. मला विचारलं “काय करता साहेब तुम्ही?” मी म्हटलं “IT मध्ये आहे.” तो म्हणाला,”म्हणजे नक्की करता काय?” माझ्या डोळ्यांसमोरून झपझप सगळं सरकलं software, skills , business वगैरे वगैरे. क्षणभर विचार केला म्हटलं……. “वैसे तो हम…” त्याने मध्येच मला थांबवलं आणि म्हणाला, “वैसे तो हम बंदे लगाते है…… हेच ना???” मी म्हटलं, “but it is not bodyshopping………It is knowledge……” मग मी आपणहूनच गप्प बसलो.
Engineering colleges मला शहरातल्या लेबर चौकांसारखे दिसायला लागले. त्यातला प्रत्येक विद्यार्थी केवळ एक “Resource” दिसू लागला.
Consultants म्हणजे ठेकेदार वाटू लागले.मला स्वतःलाच मी लोकांचे “स्किल्स”विकून मधल्या मध्ये माल खाणारा व्यापारी वाटू लागलो. शहराच्या कोपऱ्यात “विशेष आर्थिक क्षेत्रात” बांधलेल्या त्या सुंदर सुंदर बिल्डिंगी मला APMC मार्केटसारख्या वाटू लागल्या.……मी त्याच्याकडे पाहिलं “Information Technology” च्या ह्या धंद्याला मनोमन नमस्कार केला. माझ्यासारखाच “बंदोका बिझनेस करणाऱ्या “त्या”च्यासोबत बसून मी पुढचा पेग ओठांना लावला.
– अभिषेक राऊत

Saturday, August 1, 2015

काही नाती काही रात्री



मागच्या एका तासात कॉफी पिता पिता त्याने तीन वेगवेगळ्या कॅटलाॅग मधल्या किमान शंभर मुलींचे फोटो नजरेसमोरून घातले होते. फोटो, त्यापुढे नाव , त्याखाली वय , खाली उंची, त्याखाली पगार. अगदी ते लहानपणी W W E चे कार्ड्स कसे यायचे त्यावर कसे ते फोटो आणि मग त्या खाली बाकी आकडेवारी अगदी तसंच. अर्थात त्या खाली ज्या आकडेवाऱ्या द्यायचे, चेस्ट, बायसेप्स वगैरे त्या इथे दिल्या तर… असा एक तद्दन अॅडल्ट विचार त्याच्या मनात आलाच. कॉफी संपली, त्याने आळस दिला आणि सुट्टा मारायला म्हणून निघाला. एकंदरच हे लग्नासाठी मुलगी शोधणे प्रकरण फारच डोक्यात जायला लागलं होतं. सिगरेटच्या धुरासोबत त्याचे विचार हलके हलके होत भूतकाळात जायला लागले. आपले क्रश, प्रेम , आकर्षण असे वेगवेगळे ‘tags’ दिलेल्या मुली त्याला आठवू लागल्या. आज इतक्या वर्षांत मुलगी निवडण्यासाठीचे आपले निकष बदललेत याची त्याला जाणीव झाली.
तो घरी आला. घरात आल्या आल्या आईने नवीन एका वधू-वर सूचक संस्थेचा फॉर्म त्याच्याकडे दिला. सवयीने त्याने फॉर्म भरायला सुरुवात केली. एका प्रश्नापाशी येउन तो थांबला. “Did you have any past relationship?” “Are you virgin ?” चायला इतके प्रश्न तर जनगणनावाले, आधारवाले , गेला बाजार रेशन कार्डवाले सुद्धा विचारत नाहीत. बरं हे दोन्ही प्रश्न एकमेकांना लागून. म्हणजे relationship आणि virginity यांचा इतका जवळचा संबंध आहे असं वाटतं कि काय ह्यांना.
त्या प्रशानंभोवती तो फिरत राहिला. तिचे निरोपाचे काही शब्द आठवले त्याला. ती म्हणालेली “कसंय सुजय, There is a difference in liking someone, loving someone and marrying someone. तुला हे जितक्या लवकर कळेल तितक्या लवकर आपण एकमेकांतून मोकळे होऊ.” बस्स. इतकंच बोलून आणि MS करण्यासाठी USA ला जाण्याचा निर्णय सांगून तिची आवडती कॉफी तशीच अर्धवट सोडून ती निघून गेली होती. इतक्या सहज?? इतक्या सहज निघून जावं तिने? तो एकटाच कॉफी शॉप मध्ये बसून राहिला. त्याला आठवलं बरोब्बर एक वर्षापूर्वी ह्याच मुलीसोबत त्याने आयुष्यातलं पहिलं स्मूच केलं होतं. त्याला नेहमी वाटायचं की स्मूच म्हणजे फटाक्यांच्या लडीतल्या सगळ्यात पहिल्या फटाक्यासारखं आहे. एकदा तो पेटला कि मग अक्खी लड धगधगत फुटते. ‘uncontrolled events’ सारखी. त्या रात्री ते त्याला पटलं.  काही रात्रींमध्ये अख्खं नातं घडवण्याची ताकद असते.  पण मग एक वर्षात सारेच अंदाज आणि प्रत्येक हिशोब चुकत गेला. एकमेकांसोबत आयुष्यभर राहण्याच्या शपथा हवेत विरल्या आणि ती US ला निघून गेली.
त्या गोष्टीलाही आता ४ वर्षं होतील. या चार वर्षांत तो सेटल झाला. २ ‘onsite’ ट्रीप, ७ आकडी पगार आणि नुकताच बुक केलेला नवीन flat. आणि आता लग्नासाठी मुली शोधायची गडबड. ती गेल्यानंतर काय बदललं काय नाही याचा धांडोळा त्याने कधी घेतला नाही. पण तिच्यासोबतच्या त्या पॅशनेट रात्रीनंतर त्या दोन प्रश्नांची उत्तरं त्याच्यासाठी कायमची बदलली होती.
“Did you have any past relationship?” – YES
“Are you virgin ?” – NO
त्याने फॉर्म पूर्ण भरून लिफाफ्यात बंद केला. लिफाफा आईला देत म्हणाला,,”हे घे, उद्या जाउन त्या वधू-वर सूचक केंद्रात देऊन ये.”
“तुम्ही वेगवेगळ्या ccd मध्ये एकाच व्यक्तीसोबत जाउन कॉफी पीत असाल तर तुम्ही प्रेमात असता पण जर तुम्ही एकाच ccd मध्ये वेगवेगळ्या व्यक्तींसोबत जाउन कॉफी पीत असाल तर नक्कीच तुम्ही लग्नाळू आहात असं समजायला हरकत नाही…”  आज ज्याला पाहणार तो बाविसावा मुलगा. काहीना आपण नाकारलं काहींनी आपल्याला. ह्या सगळ्या  प्रवासाचा साक्षीदार एकच. चांदणी चौकातल ccd.
संध्याकाळी ६ ची हिंजवडीहून निघालेली बस पावणेसात ला बरोब्बर ccd च्या मागच्या अंगाला सोडते. तिथून चालत ५ मिनिट बस्स. ७ ची वेळ व्यवस्थित पाळता येते. कंपनीच्या पार्किंगमधून तिने बस पकडली. कानात हेडफोन्स घातले आणि एकाच वेळी तिच्या कानात गाणं आणि डोक्यात विचार घुमू लागले.
तुमचा भूतकाळ तुमची पाठ सोडत नाही. तुम्ही त्यात गुंतून राहिलात तर वर्तमान आणि भविष्य या दोन्ही काळांचे L लागतात. हे वाक्य आयुष्याच्या व्याकरणाला अगदी योग्य दिसतं. भूतकाळातून बाहेर पडण्यासाठी तिने २ अफ़ेअर केली आणि मग वैतागून विवाह संस्थेचा अर्ज भरला आणि एकवीस लोकांना reject करून आज बाविसाव्याला भेटायला निघाली होती.
देवांग तिच्या आयुष्यातला पहिला पुरुष. चार वर्षं सोबत राहून मग ते वेगळे झाले. कारणं तशी बरीच. तिला वाटायचं त्यांचं प्रेम सगळ्याला पुरून उरेल. तसं काही झालं नाही. त्यानंतर गेल्या तीन वर्षात २ पुरुष येउन गेले. तापलेल्या जमिनीला शांत करायला पाउस येतो ना… अगदी तसेच. प्रेम, कमीटमेंट यावरचा तिचा विश्वास पाचोळ्यासारखा उडून गेला मागच्या तीन पावसाळ्यांत. इतका कि ज्या नात्यात प्रेम हा शब्द नसेल ते कुठलही नातं स्वीकारायला ती तयार होती. तिलाही तिच्यासारखाच कुणीतरी हवा होता. बस थांबली. ती उतरली आणि ccd पर्यंतच्या पाच मिनिटात सारे प्रश्न आणि उत्तरं यांची रिविजन झाली. मनातच. बाविसावा जे काही विचारेल ते “एकवीस अपेक्षित” मधूनच असणार याची तिला खात्री होती.
बरोब्बर सातच्या ठोक्याला ते समोरासमोर बसले.
” मी सुजय.”
” मी सानिका”
“वाह. सुजय सानिका शुभविवाह छान वाटेल न ऐकायला”
ती हसली आणि म्हणाली “शुभविवाह या शब्दात छान वाटेल असं काय आहे मित्रा…”
त्याने चमकून वर पाहिलं. तिच्या नजरेला नजर मिळवली. इतक्या स्पष्ट शब्दांमागच्या नजरेतली व्याकुळता त्याने सहज टिपली.
“मला म्हणायचं होतं आपली नावं छान वाटतील. शुभविवाह वगैरे बघू  नंतर.”
ती हसली. हा “एकवीस अपेक्षित” वाटत नाही  तिच्या मनाने हे टिपलं आणि त्यांच्या गप्पा खुलल्या. दीड तासांनी दोघेही उठले. तो म्हणाला, ” चल, तुला तुझ्या रूमपर्यंत सोडतो.
ती कारमध्ये बसली. दीड तास प्रचंड गप्पा मारणारे दोघे आता प्रचंड शांत होते. तिच्या रुमजवळ कार थांबली. ती उतरली दरवाज्याजवळ थांबली. त्याने काच खाली केली. ती म्हणाली,”Thanks.…  क्षणभर थांबली आणि त्याच्या नजरेला नजर देऊन म्हणाली, “प्रेमावर विश्वास आहे  तुझा? ” तो क्षणभर थांबला आणि म्हणाला,” माझा फक्त विश्वास आहे आजच्या क्षणावर. बस्स.” त्या क्षणात त्याच्या नजरेत दाटलेली व्याकुळता तिने सहजपणे टीपली. “चल येते” इतकं म्हणून ती निघाली.
रूमवर पोहोचली आणि आईला फोन केला. “आई, त्या ‘शुभमंगल’च्या ब्रोशर मधल्या आठव्या पानावरच्या खालून दुसर्या मुलाशी मी लग्न करतेय”
फोन ठेवून ती गच्चीत आली. आणि मोठ्ठ्या मोठ्ठ्या थेंबांचा पाउस तापलेल्या जमिनीवर आसुस्ल्यागत कोसळू  लागला.
तिच्याकडून होकार आला तेव्हा तो जरा हडबडलाच. प्रेम, शुभविवाह या गोष्टींवर विश्वास नसलेली मुलगी एका भेटीत होकार देईल कशी अशी साधी सरळ शंका त्याच्या मनाला स्पर्शून गेलीच. त्याला वाटलं या शंकेचं निरसन करून घ्यावंच पण मग त्याला जाणवलं, अनेकदा प्रश्न विचारून, उत्तरं शोधून आणि नको इतकी 'Clarity'घेऊनही शेवटी नाती तुटतातच. त्यापेक्षा काही प्रश्नांची उत्तरं, ते न विचारताच मिळालेली चांगली. तिच्या होकारात त्याने हो मिळवला आणि दोन्ही घरं तयारीला लागली.

लग्न ही कन्सेप्ट अजूनही तिच्या पचनी पडत नव्हतीच. नाइलाज म्हणा किंवा गरज म्हणा किंवा पहिल्या भेटीत मिळालेली आश्वस्तता म्हणा तिघांपैकी काहीतरी एक असावं ज्यामुळे तिने लग्नाला होकार दिलेला. तिचं तिलाच अजूनही काळात नव्हतं कि नक्की कुठल्या कारणाने तिच्या होकाराला ठामपणा आला. ''Wedding Planner"ने सुहागरात्रीसाठी सजवलेल्या बेड वर बसून तिच्या मनात असे असंख्य विचार येत होते. आपण लग्न का केलं याचं ठोस उत्तर तिला अजूनही मिळत नव्हतं. जगरहाटी नाकारण्याची हिंमत नव्हती म्हणून? निव्वळ एक मानसिक आणि कौटुंबिक गरज म्हणून ? की फक्त "Marriage is legitimate form of sex" इतका प्रक्टिकल विचार करून. तिला प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती आणि आज न उद्या तो हे प्रश्न विचारणारच याचीही तिला खात्री होती.

विचारांचा असा खेळ तिच्या मनात चाललेला असतानाच तो आत आला. सजवलेल्या बेडवर तिच्या बाजूला येउन बसला. काही क्षण प्रचंड शांततेत गेले. त्या शांततेचा भंग करत त्याने विचारलं, "मग, आता काय ? " निर्विकार चेहऱ्याने ती म्हणाली, "पुन्हा, तेच…" तो हसला. म्हणाला, "लग्नाची सोय त्यासाठीच तर केलेली असते." तिला काही सुचेना. ती म्हणाली, "म्हणजे तू पण फक्त त्याच गरजेसाठी लग्न केलंस?" तो शांतपणे म्हणाला, "नाही. Marriage is legitimate form of sex इतकं भयंकर मत नाहीये माझं." ती जराशी चपापली आणि जराशी हसली, म्हणाली, "पण मग तू काही माझं पहिल प्रेम वगैरेसुद्धा नाहीयेस". तो जरासा गंभीर झाला आणि म्हणाला,"हो ते ही खरंच. आपण काही एकमेकांचं पहिलं प्रेम वगैरे नाही. खरंतर दुसरं किंवा तीसरही नाही. पण आपलं लग्न तर पहिलं आहे ना". ती हसली म्हणाली "ते ही खरंच." "आणि प्रत्येक नवीन गोष्ट करून बघायचीच हा अट्टाहास आपल्या दोघांमध्ये आधीपासून आहेच." या त्याच्या वाक्यावर आणि त्यातल्या गर्भितार्थावर ती मनापासून हसली.

त्या रात्री फार प्रश्न न विचारता त्या दोघानाही बरीच उत्तरं मिळाली. फारशी 'Clean' नसली तरी त्यांच्या नात्याची सुरुवात तर नक्कीच झाली होती. कारण काही रात्रींमध्ये नाती घडवण्याची ताकद असते.

 
काही नाती काही रात्री (भाग तिसरा)



तिच्याकडून होकार आला तेव्हा तो जरा हडबडलाच. प्रेम, शुभविवाह या गोष्टींवर विश्वास नसलेली मुलगी एका भेटीत होकार देईल कशी अशी साधी सरळ शंका त्याच्या मनाला स्पर्शून गेलीच. त्याला वाटलं या शंकेचं निरसन करून घ्यावंच पण मग त्याला जाणवलं, अनेकदा प्रश्न विचारून, उत्तरं शोधून आणि नको इतकी 'Clarity'घेऊनही शेवटी नाती तुटतातच. त्यापेक्षा काही प्रश्नांची उत्तरं, ते न विचारताच मिळालेली चांगली. तिच्या होकारात त्याने हो मिळवला आणि दोन्ही घरं तयारीला लागली.

लग्न ही कन्सेप्ट अजूनही तिच्या पचनी पडत नव्हतीच. नाइलाज म्हणा किंवा गरज म्हणा किंवा पहिल्या भेटीत मिळालेली आश्वस्तता म्हणा तिघांपैकी काहीतरी एक असावं ज्यामुळे तिने लग्नाला होकार दिलेला. तिचं तिलाच अजूनही काळात नव्हतं कि नक्की कुठल्या कारणाने तिच्या होकाराला ठामपणा आला. ''Wedding Planner"ने सुहागरात्रीसाठी सजवलेल्या बेड वर बसून तिच्या मनात असे असंख्य विचार येत होते. आपण लग्न का केलं याचं ठोस उत्तर तिला अजूनही मिळत नव्हतं. जगरहाटी नाकारण्याची हिंमत नव्हती म्हणून? निव्वळ एक मानसिक आणि कौटुंबिक गरज म्हणून ? की फक्त "Marriage is legitimate form of sex" इतका प्रक्टिकल विचार करून. तिला प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती आणि आज न उद्या तो हे प्रश्न विचारणारच याचीही तिला खात्री होती.

विचारांचा असा खेळ तिच्या मनात चाललेला असतानाच तो आत आला. सजवलेल्या बेडवर तिच्या बाजूला येउन बसला. काही क्षण प्रचंड शांततेत गेले. त्या शांततेचा भंग करत त्याने विचारलं, "मग, आता काय ? " निर्विकार चेहऱ्याने ती म्हणाली, "पुन्हा, तेच…" तो हसला. म्हणाला, "लग्नाची सोय त्यासाठीच तर केलेली असते." तिला काही सुचेना. ती म्हणाली, "म्हणजे तू पण फक्त त्याच गरजेसाठी लग्न केलंस?" तो शांतपणे म्हणाला, "नाही. Marriage is legitimate form of sex इतकं भयंकर मत नाहीये माझं." ती जराशी चपापली आणि जराशी हसली, म्हणाली, "पण मग तू काही माझं पहिल प्रेम वगैरेसुद्धा नाहीयेस". तो जरासा गंभीर झाला आणि म्हणाला,"हो ते ही खरंच. आपण काही एकमेकांचं पहिलं प्रेम वगैरे नाही. खरंतर दुसरं किंवा तीसरही नाही. पण आपलं लग्न तर पहिलं आहे ना". ती हसली म्हणाली "ते ही खरंच." "आणि प्रत्येक नवीन गोष्ट करून बघायचीच हा अट्टाहास आपल्या दोघांमध्ये आधीपासून आहेच." या त्याच्या वाक्यावर आणि त्यातल्या गर्भितार्थावर ती मनापासून हसली.

त्या रात्री फार प्रश्न न विचारता त्या दोघानाही बरीच उत्तरं मिळाली. फारशी 'Clean' नसली तरी त्यांच्या नात्याची सुरुवात तर नक्कीच झाली होती. कारण काही रात्रींमध्ये नाती घडवण्याची ताकद असते.



(समाप्त)



-अभिषेक राउत.