Saturday, January 6, 2024

नर्मदापुरम (होशंगाबाद) - २५ डिसेंबर २०२३.

सकाळी उठून घाटावर जावं, नर्मदेचं पात्र पाहावं. शांत व्हावं. 

भल्याथोरल्या घाटाच्या  पायऱ्यांवर उभं राहून नर्मदेला पाहावं

घाट स्वच्छ नसतोच. 

नर्मदेचं पात्र, नजर ठरत नाही. डुबकी मारायची इच्छा होतेच. आपण थोडीच पापं धुवायला आलेलो असतो? आपण आलेलो असतो नर्मदेच्या गोष्टी ऐकायला. 

आपल्याच विचारात चालत जावं , घाटावरच्या नर्मदेच्या मंदिरात. नर्मदासूक्त लिहिलेलं असतं तिथे. प्रयत्नपूर्वक वाचावं ते. "त्वदीय पाद पंकज , नममि देवी नर्मदे"

पुजाऱ्याच्या पुढ्यातल्या ताटात पैसे टाकले की पुजारी बोलता होतो. 

तो सांगतो, नर्मदा मैया पवित्र. साक्षात भगवान शंकराच्या घामापासून तयार झालेली. ,"बात ये है की पाप धोने के लिये गंगा जी में डुबकी लगानी पडती हैं , लेकीन नर्मदा जी के तो दर्शन ही काफी हैं"

आपण आपला पाप पुण्याचा हिशोब मांडायला लागतो आणि वाटतं, इतरांचं नुसत्या दर्शनाने काम होईल पण आपल्याला मात्र पाप धुण्यासाठी इथेही डुबकीच मारायला लागेल. 

मग घाटाच्या पायऱ्या उतरताना मग एक बाबा दिसतो. त्याच्या बाजूला बसून नुसतं "नर्मदे हर" म्हणायचं अवकाश की गप्पाच सुरू होतात.

तो सांगतो, ही इतकी शांत, निवांत नर्मदा इथली होशंगाबाद (आता नर्मदापुरम) ची. खरी नर्मदा अवखळ,  एखादी टीनऐजर मुलगी जशी असते ना , उत्साहाने खळखळणारी, अल्लड, अवखळ अगदी एखाद्या प्रेमकथेत शोभेल अशी.  अमरकंटक च्या पहाडांमधली. नुसती खळखळणारी , आपला मार्ग शोधणारी आणि उपजतच आवेगाने वाहणारी, सतत प्रवाही. म्हणून तिला म्हणायचं रेवा. आणि मग तिचा जीव जडतो सोनभद्र वर. लोक म्हणतात अल्लड वयात झालेलं प्रेम थिल्लर असतं पण आमच्या नर्मदेचं, लाडक्या रेवाचं तसं नाही. तिचं प्रेम अगदी खरं. म्हणून तर सोनभद्र मिलन नावाचं ठिकाण आहे अमरकंटक जवळ. तर ही रेवाची गोष्ट. रेवाच्या सोनभद्र वरच्या प्रेमाची. पण हे प्रेम स्वीकारता आलं नाही सोनभद्र ला. रेवाशी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या खऱ्या पण सोनभद्रचा जीव जडलेला जोहीला वर (ही सुद्धा एक नदीच बरं का). आणि मग एक दिवस रेवाला कळलं ना हे सगळंच. ती तशीच वळली, मागे फिरली वेगाने धावू लागली, दूर दूर उलट्या दिशेने, सोनभद्र पासून दूर, अमरकंटक पासून दूर, भेडाघाटातून मार्ग काढत , मागे वळून पाहिलंच नाही तिने. वाहत वाहत तिची नदी झाली, ती नर्मदा झाली. आज तिच्या आजूबाजूच्या सगळ्या नद्या बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात पण आमची रेवा, प्रेमात खाल्लेल्या धोक्याने जी मागे वळली, मार्गच बदलला तिने.  ती थेट अरबी समुद्रालाच जाऊन मिळाली. ती एकटीच अशी. 

ही अशी नर्मदेची गोष्ट. ती गोष्ट ऐकून मग नर्मदा अजून जवळची वाटायला लागते. बाबा तर निघून जातो आपल्याला घाटावर एकटं सोडून. 

आयुष्यात धोके, धक्के आपण खाल्लेलेच असतात की सगळ्यांनी. असं वाटतं रेवाच्या पाण्यात आता खरंच उतरावं. पाप धुवायला म्हणून नाही तर तिला सांगावं,  मला तुझी गोष्ट कळते, समजते आणि म्हणून तू मला जवळची वाटतेस. 

अशा या घाटावरच्या गोष्टी.. नदी, तिच्या गोष्टी, तिच्या गप्पा आणि तिच्याभोवती नकळत विणली जाणारी संस्कृती. 

आता जायलाच हवं पाण्यात असं म्हणत निग्रहाने पाण्यात पाय ठेवला की लक्षात येतं प्रचंड थंड आहे पाणी. तरीही दोन डुबक्या घेतोच. मग प्रचंड भूक लागते. पुढे चालत आलात की एका ठिकाणी रस्त्याच्या चौकात गर्दी असते तिथे नक्की कचोरी आणि समोसा मिळतो.

कचोरी खावी छोले आणि चटणी मिक्स करून

चवीचा कल्लोळ होतो जिभेवर

समोसा खावा. अजून विचारावं ," भैयाजी और क्या खिलाओगे"

तो म्हणतो ," हाव गुलाबजाम में रबडी मिला के खावो"

मग ते घ्यावं, पहिल्याच घासात तृप्त व्हावं.

दिवसाची सुरुवात छान आहे. नर्मदापुरम छान आहे. 

असं वाटतं नदीकिनारीच राहावं, नदीच्या गोष्टी ऐकत राहाव्यात . पण मग लक्षात येतं अरे पुढचा प्रवास करायचाय. आता निघायला हवं. नर्मदेचं पाणी मनाच्या कप्प्यात जपून ठेवत पुढचा प्रवास सुरु होतो. त्याबद्दल पुन्हा कधीतरी.


- अभिषेक राऊत

Saturday, September 30, 2023

तुम्ही जंटलमन क्लबात जाऊन आलात का


तर तसे माझ्या लंडन च्या ट्रिप ला आता 4 वर्ष झाली. एक आठवड्याची ऑफिस ट्रिप म्हणजे काही फार मोठी ट्रिप नाही खरंतर पण तरीही त्यातल्या काही गोष्टी , आठवणी अधूनमधून उफाळून वर येतात आणि चेहऱ्यावर तजेला आणतात अगदी "इंग्लिश मॉर्निंग टी" सारख्या. 

आजही ठळकपणे आठवतं ते म्हणजे प्रिन्सेस डायनाच्या स्मरणार्थ बांधलेल्या कारंज्याची सफर आणि तो जगप्रसिद्ध प्रिन्सेस डायना मेमोरियल वॉक. त्यावर कोरलेली गुलाबफुलं आणि कानात रुंजी घालणारे एल्टन जॉनच्या गुडबाय इंग्लंडस रोज चे शब्द. 

तसाच एक चेहऱ्यावर अचानक तजेला आणणारा अनुभव म्हणजे स्ट्रीपर क्लब चा . तारुण्य सुलभ कुतूहलाने "टॉप 10 स्ट्रीपर क्लब इन सेंट्रल लंडन" असं आधीच सर्च करून ठेवलं होतं. एकूणच ट्रिप ला जाण्यापूर्वीची धावपळ यात कुठेतरी ते मागे पडलं पण लक्षात होतंच. २-३ दिवसात स्थिरस्थावर झाल्यानंतर आणि वीकेंडला रूढार्थाने जी पर्यटनस्थळं बघावी असं सांगतात ती बघून झाल्यावर मात्र या ऑफ बिट डेस्टिनेशन चे वेध लागले. आत्ता या क्षणाला 

आपली खर्च करण्याची कुवत, कम्पनीने रोजच्या खर्चाला दिलेले पौंड आणि त्याची रुपायातली किंमत असा सगळा हिशोब लावून झाला आणि आपोआपच "टॉप 10 स्ट्रीपर क्लब" हे मागे पडलं आणि "नियरेस्ट अँड चीप स्ट्रीपर क्लब" असा सर्च करून , एक ठिकाण हेरून ठेवलं. 

दुसऱ्या दिवशी ऑफिस वगैरे आटोपल्यानंतर ट्यूब पकडली आणि इच्छित स्टेशन ला उतरून स्ट्रीपर क्लब चा रस्ता पकडला. तुम्हाला सांगतो , गुगल मॅप हा किती क्रांतिकारी शोध आहे याची जाणीव मला त्या क्षणाला झाली. अन्यथा एक भारतीय माणूस, लंडन च्या रस्त्यांवर ते इथलं जवळचं "जंटलमन क्लब" कुठे ओ असं किती जणांना विचारत फिरला असता याची कल्पनाच न केलेली बरी. 

बरं , विषय असा की इंग्रजाला सभ्यतेचा इतका लळा की स्ट्रीपर क्लब ला तिथलं जनमानस जंटलमन क्लब वगैरे म्हणतंय. म्हणजे अमच्याकडचे नगरसेवक किंवा आमदार कसे सांस्कृतिक महोत्सव किंवा लोक कलेचा जागर या नावाने गौतमी पाटीलच्या नाचाचा कार्यक्रम ठेवतात अगदी तसंच. 

आत्ता या क्षणाला ते ट्यूब स्टेशन कुठलं, त्या स्ट्रीपर क्लब चं नाव काय अशा छोट्या छोट्या गोष्टी अजिबात आठवत नाहीत बघा. मॅप वर दाखवलेल्या रस्त्याने सरळ चालत गेलो आणि अगदी सहज फूटपाथ ला लागून असलेल्या एका दारापाशी आलो. बाऊन्सर बाहेर होताच. जगाच्या पाठीवर कुठल्याही क्लबत जा, बाऊन्सर सगळीकडे सारखेच दिसतात आणि सारखेच काळे कपडे घालतात. त्याने एक नजरेत मला जोखलं आणि एवढंच म्हणला, "फर्स्ट टाइम"? "डु यु हाव कॅश" ? मी फक्त मानेने होकार दिला. तसा तो म्हणाला, "बी गुड" आणि दरवाजा उघडून मी आत शिरलो. 

एखाद्या स्टॅंडर्ड पब सारखा सेट अप, फक्त डान्स फ्लोर च्या ऐवजी साधारणपणे सगळ्यांना सगळ्या बाजूने व्यवस्थित दिसेल आशा ठिकाणी लावलेलं स्टेज आणि त्याला लावलेला एक पोल आणि त्याच पोल वर डान्स करणाऱ्या तरुणी. आजूबाजूला दोन चार मखमली सोफे. ते खास लॅप डान्स घेण्यासाठी / देण्यासाठी, प्रशस्त बार काउंटर आणि  दोन चार टेबल एखाद दोन जण बसतील इतके (शक्यतो आंबट शौकीन म्हाताऱ्यांसाठी कदाचित) असा सगळा तो माहोल. 

बार काउंटर च्या बाजूलाच मोक्याची जागा हेरून मी उभा राहिलो, एक पाइंट बियर मागवली उभ्या उभ्याच एक चौफेर नजर टाकली. तिथल्या तरुणी, तिथे मजा करायला आलेले तरुण, तिथलं संगीत , नुकतेच डोळे शेकायला आलेले म्हातारे या सगळ्यांपेक्षा माझं लक्ष वेधून घेतलं ते तिथल्या ,"ग्राहकांना सूचना" या मथळ्याखाली लिहिलेल्या किमान 10 सूचनांनी. अगदी "Do's and Dont's". 

त्यांना सूचना म्हणण्यापेक्षा नियम म्हटलेलं अधिक योग्य ठरेल. उगाच स्ट्रीपर क्लबात आलात म्हणून संयम विसरू नका असा सज्जड दम सोज्ज्वळ शब्दांत देण्याचं काम त्या सूचना करत होत्या.

मी अगदी काळजीपूर्वक सगळ्या सूचना वाचल्या.  "लॅप डान्स " घेताना तरुणींच्या अंगाला न विचारता स्पर्श करू नका, आशा सूचना घोकून घेतल्या आणि बियर चा एक घोट पोटात जातो न जातो तोच माझ्यासमोर एक ललना सुहास्य वदनाने समोर उभी राहिली. 

तिच्या हातात एक नक्षीदार भांडं होतं आणि माझ्यामते ती त्याच्यात तिचं इनाम गोळा करत होती.  मी फार विचार न करता एक पौंडचं नाणं तिच्या भांड्यात घातलं. ( वर म्हटल्याप्रमाणे खूप सारे हिशेब करून मी खास 10 पाउंडाचे सुट्टे करून आणले होते) ती हसली आणि पूढे गेली. पुढचा परफॉर्मन्स तिचाच होता. 

माझ्या पुढे उभ्या असलेल्या इंग्लिश तरुणांच्या घोळक्याने एकत्रीतच काही नोटा तिच्या हातात ठेवल्या. पुढच्या काही क्षणात ती पोल जवळ पोहोचली आणि मग सुरू झालं नृत्य आणि नृत्यासह स्ट्रीपिंग. 

गाण्याच्या ठेक्यावर अदाकारी आणि अंगावरून उतरत जाणाऱ्या प्रत्येक कपड्यासोबत वाढत जाणारा ठेका. 

वाढणाऱ्या प्रत्येक ठेक्यासोबत त्या तरुणीकडे वळणाऱ्या नजराही वाढायच्या. मी तर टक लावून बघत होतोच म्हणा (आ वासून असं म्हणणं जास्त योग्य ठरेल पण अर्थातच आ मनात वासलेला) . 

बाजूचे इंग्लिश तरुणही वाढत्या संगीताच्या ठेक्यासोबत (उतरणाऱ्या एकेक  कपड्या सोबत असं वाचा) तरुणीकडे बघू लागले. बाजूच्या दोन सोफ्यावर बसून लॅप डान्स घेणारे दोन शौकीन पण मांडीवर बसलेल्या लालनांचा मोह चुकवून हळूच एखादी नजर पोल डान्स करणाऱ्या तरुणीकडे टाकू लागले (इथं मी ह्याच्या मांडीवर बसलेय आणि हा त्या नाचऱ्या नटवी कडे बघतोय असा विचार करून लॅप डान्स देणारी तरुणी अधिकच मादकतेने तिचं काम करू लागली). संगीत टिपेला पोचलं, पोल डान्स करणाऱ्या तरुणीच्या अंगावर कपड्याचा एकही अंश उरला नाही आणि त्या क्षणी सगळ्यांच्या नजरा त्या नर्तिकेकडे लागल्या. अगदी मगाचपासून कोपऱ्यात खुर्चीवर बसून "डेली मेल" (डेली मेल म्हणजे इंग्लंडचा संध्यानंद असं म्हणायला हरकत नाही) वाचणाऱ्या म्हाताऱ्यानेही त्यातून डोकं वर काढलं आणि डोळ्यावरचा चष्मा सावरत , नेमक्या योग्य वेळी तरुणीकडे कटाक्ष टाकला. मादकतेचं अत्युच्च टोक गाठून ती तरुणी बाजूला झाली आणि तिची जागा घेण्यासाठी दुसरी तरुणी सज्ज झाली. तिथला माहौल, मादक ललना , त्यांचं नेत्रदीपक नृत्य यांचा मनापासून आनंद घेत आणि अजून दोन चार पाइंट रिचवून मी तिथून बाहेर पडलो. तसं तर मुंबईतही मी डान्स बार अनुभवलेत. पण अर्थातच दोन्हींची तुलना करून इथल्या  बार बालांचं आयुष्य कसं खडतर वगैरे टेप मी लावणार नाही.

चूक काय बरोबर काय, नैतिक काय अनैतिक काय ह्या गोष्टींचा किस काढायला मला आवडत नाही. 

पण एक नक्कीच सांगेन की लंडनला गेलात तर स्ट्रीप क्लब ला नक्की जा. 

~ अभिषेक राऊत


Sunday, January 17, 2021

तुकोबांच्या भेटी शेक्सपियर आला -विंदा करंदीकर - रसग्रहण

 मुळात ही कल्पनाच ग्रेट आहे. ते म्हणतात ना जे न देखे रवी ते देखे कवी. त्यात जर तो कवी म्हणजे विंदा करंदीकर असतील तर सांगायलाच नको.

तर ही कविता म्हणजे दोन महान सृजनशील माणसांमधला संवाद आहे. एकाच वेळेला दोघांचं एकमेकांच्या निर्मितीबद्दल असणारं कुतूहल आणि त्या कुतुहलातून येणारा छानसा संवाद म्हणजे ही कविता. 

बरं हा संवाद होतो कुठे तर तुकारामांच्या दुकानात. शेक्सपियर अगदी सहज म्हणून जातो , मी भलेही मानवी भावभावनांचा संसार मांडला असेल पण बा तुकारामा, जे शब्दातीत तू शब्दांत मांडलेस त्याची तोड नाही . 

शेवटच्या काही कडव्यांमध्ये तुकाराम म्हणतात , ही सगळी शब्दपीट व्यर्थच. शेवटी जाऊन भगवंताला मिळणं हेच खरं सत्य. आणि मग क्षणार्धात त्यांना आठवण येते आवडेची. संसाराची. संसारात राहून विठ्ठलाची प्रीती करणं कठीणच.


तर अशी ही शेक्सपिअर आणि तुकारामांच्या भेटीची कहाणी, विंदानी ती फार सुरेख रंगावलीये

Sunday, January 10, 2021

पितात सारे गोड हिवाळा - रसग्रहण

 पितात सारे गोड हिवाळा - बा. सी. मर्ढेकर 

बाळ सीताराम अर्थात बा. सी. मर्ढेकर हे मराठीतले एक नामवंत कवी. मर्ढेकरांचा जन्म १९०९ चा तर १९५६ ला त्यांचं निधन झालं. उण्यापुऱ्या ४६ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी मराठी कवितेला एका वेगळ्या वळणावर आणून सोडलं. मर्ढेकरांच्या कवितेची ठळक लक्षणं सांगायची झाली तर, नावीन्यपूर्ण प्रतिमांचा वापर , रचनेमधील नवता आणि दुसऱ्या महायुद्धोत्तर शहरी जीवनाच्या जाणिवांचे चित्रण. हे करताना त्यांनी प्रस्थापित मराठी कवितेचा ढाचा बदलला आणि स्वतःची वेगळी शैली प्रस्थापित केली. 

आजची त्यांची कविता , पितात सारे गोड हिवाळा ही मुंबईतल्या हिवाळ्याच्या दिवसाची कविता. पहाट आणि सकाळ ह्यांच्या सिमरेषेवरची ही कविता आणि त्यासोबत आजूवाजुला घडणारे बदल मर्ढेकरांनि टिपलेत. 

वर सांगितलेली त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये या कवितेत प्रकर्षाने जाणवतात. 

पहाटेच्या मुंबईला न्हायलेल्या गर्भवतीच्या सौंदर्याची उपमा देणे असो किंवा मग झोपेतून जाग येण्याला , "डोकी अलगद घरे उचलती , काळोखाच्या उशिवरूनी" असं म्हणणं असो. प्रतिमांमधला नावीन्यपूर्णपणा दिसतो तो असा . 

मर्ढेकरांच्या आधीची मराठी कविता छंदोबद्ध, गेय अशी होती . मर्ढेकरांच्या कवितेतील रचनेचं वेगळेपण या कवितेत दिसतं ते पहिल्या कडव्यातच. 

तर अशी ही कविता पहाटेच्या मुंबई शहराचं वर्णन करणारी आणि मग शेवटच्या कडव्यात कवी म्हणतो ,

या सृष्टीच्या निवांत पोटी, परंतु लपली सैरावैरा

अजस्त्र धांदल क्षणात देई , जिवंततेचे अर्घ्य भास्करा. 

साधारण १९४०-४५ च्या दरम्यान टिपलेली मुंबईच्या पोटातली ही धांदल , मुंबईचं हे स्पिरिट , मुंबईची धावपळ आजही तशीच आहे. मर्ढेकर आज नाहीत, १९४०-५० ची मुंबई आज नाही पण मुंबईची धांदल मात्र आजही आहे आणि उद्याही राहील आणि उगवत्या सूर्याला जिवंततेचे अर्घ्य देत राहील.


- अभिषेक राऊत 

Sunday, April 5, 2020

मलानाच्या गोष्टी - भाग 2










पहिला भाग इथे वाचा.

https://abhishsays.blogspot.com/2019/02/blog-post.html?m=1


मलानाच्या गोष्टी - भाग  2


मलाना गांव मे आपका स्वागत हैं असं लिहिलेल्या बोर्डखाली उभं राहून सभोवार नजर टाकली तर गाव काही नजरेच्या टप्प्यात येत नाही. ते लपलेलं असतं टेकडीच्या कुशीत. मग आजूबाजूचा निसर्ग डोळ्यांत साठवत चालत राहायचं. वाटेत पार्वती नदीचा खळाळणारा अल्लडपणा असतोच. या पार्वती नदीची फार  रंजक गोष्ट आहे. मलाना आणि त्याच्या आसपासचा पार्वती वॅलीचा भाग शंकराच्या फार आवडीचा. (याचं कारण इथलं निसर्ग सौंदर्य असावं की उच्च प्रतीचा गांजा??,  तुम्हाला खरं सांगतो, गाडी थांबवून रस्त्याकडेला उगवलेल्या गांजाच्या रोपट्याचं हिरवंकंच पान आणून हातात दिलेलं ड्राइवरने, म्हणजे इतकी मुबलकता हो.) तर शंकर थेट इथं तपश्चर्याच  करायला आले. बरीच वर्षं तपश्चर्या केल्यावर त्यांनी डोळे उघडले आणि या खळाळत्या नदीच्या आणि तिच्या नितांत सुंदर  खोऱ्याचा  नजारा बघून त्यांना आपल्या बायकोच्या सौंदर्याची  आठवण आली. (म्हणजे एवढी वर्षं तपश्चर्या करून माणसाला विरक्ती वगैरे येईल तर तसलं काही नाही डोळे उघडल्या उघडल्या आठवलं काय तर बायकोचं सौंदर्य !!) आणि मग त्या नदीचं नाव पडलं पार्वती. हिमालयातल्या हिमनदीतून उगम पावणारी ही पार्वती कुठल्याश्या असीम ओढीने आणि वेगाने बियास नदीला मिळते. तिच्या थंडगार फेसाळत्या पाण्यात पाय बुडवून बसायचं क्षणभर. बरं वाटतं. मलानाच्या वेशीपाशी थंडगार असणारं हे पाणी पुढे पवित्र माणिकरणला पोहोचतं तेव्हा वाफाळतं आणि गरम असतं. इतकं गरम की तिथल्या शंकराच्या मंदिरात भाविक लोक कापडी पिशवीत डाळ नेतात आणि त्या उकळत्या पाण्यात ती शिजली की तोच प्रसाद महादेवाला चढवतात. माणिकरण साहिब गुरुद्वाराच्या समोरून जेव्हा ही पार्वती जात असते, तेव्हा ती अक्षरशः "hot & wild" म्हणावी अशी असते. जणु काही कधी एकदा जाऊन बियास नदीच्या खांद्यावर हात ठेवतेय आणि प्रवासातल्या सगळ्या गप्पा सांगतेय असंच वाटत असावं तिला.
पार्वतीच्या थंडगार पाण्यात पाय बुडवून बसल्याचं समाधान  मिळालं की मग उठायचं,  मलाना  लांब असतंय अजून. एक छोटासा पूल ओलांडून पार्वतीला निरोप द्यायचा. तुम्ही तुमच्या वाटेनं जायचं आणि ती तिच्या वाटेनं जाते. अरुंद, बऱ्यापैकी चढाची पायवाट चालताना दम लागलाच तर कडेच्या दगडावर जरासं टेकायचं. चालता चालता तुम्हाला सामान वाहून नेणाऱ्या गावातल्या बायका दिसू शकतात.
गावच्या दिशेने जाईस्तोवर रस्त्यात 3-4 टपऱ्या असतायेत. ते लोक मॅगी, मोमोस, कोल्ड ड्रिंक, सिगरेट वगैरे असलं काही विकतात. सोबत त्या टपऱ्यांमध्ये सतत ट्रान्स चालू असतं. गांजा पण मिळू शकत असावा कदाचित. आताशा मलाना बऱ्यापैकी फेमस झालेलंय त्यामुळे सोलो ट्रेकर्स असतात,  काही 3-4 जणांचे ग्रुप्स असतात त्यांची सोबत होतेच वर पोहोचेपर्यंत.
गाव नजरेच्या टप्प्यात येतं तेव्हा दिसतात रस्त्याकडेला खेळणाऱ्या छोट्या मुली. किंवा मग त्याच अरुंद रस्त्यांवर धावत धावत पकडापकडी खेळणारी छोटी मुलं. आताशा बऱ्यापैकी जवळ आलेलो असतो आपण गावाच्या. अर्धा पाऊण तासाच्या या ट्रेक मध्ये बायकोची सॅंडल तुटलेली असते. गावात गेल्यावर घेऊ असं तुम्ही म्हणता पण मलाना मध्ये सॅंडल मिळते का,  जीवनावश्यक वस्तू मिळतात का याबद्दल कुठल्याच ट्रॅव्हल ब्लॉग वाल्यानं लिहिलेलं नसतंय. विचार करत करत तुम्ही चालत राहता आणि एका क्षणी पायवाट संपते. रस्ता थोडासा निमुळता होतो आणि तुम्हाला,  डाव्या बाजूला सार्वजनिक संडास दिसतं.   त्यावरच गांधीजींचा चष्मा काढून स्वच्छ भारत लिहिलेलं असतं. शेजारीच एका छोटासा चर असतो त्यातून त्यातलं सांडपाणी वाहत असतं. गावातले लोक स्वतःला इतर भारतीयांपेक्षा  कितीही उच्च समजो,  हे गाव भारतातलं आहे याचा यापेक्षा ढळढळीत स्टॅम्प दुसरा कुठला असणार. अजून अजून आत शिरतो तसं तसं मलाना उलगडत जातं. लाकडाची एक वखार लागते उजव्या हाताला. त्यात बसलेले असतात विशी पंचविशीचे तरुण, गांजा मळत. थोडंसं पुढे गेलं की डाव्या हाताला एक मंदिर असतं.  त्यावर स्पष्टपणे या मंदिराला बाहेरच्यांनी हात लावू नये असं लिहिलेलं असतं. मग थोडीशी घरं असतात दोन्ही बाजूला. काथकुनी पद्धतीने बांधलेली. एक मजली. वरच्या मजल्याच्या लाकडी खिडक्यांतून लहान लहान मुलं,  मुली हसत,  खिदळत बघत असतात तुमच्याकडे. थोडंसं अजून चाललं की मग तुम्ही पोहोचता एका प्रशस्त मोकळ्या जागी. गावची चावडी असं म्हणायला काही हरकत नाही. तिथेच जमदग्नींच मंदिर आहे एका चौथऱ्यावर. मलानावासियांचा जमलू ऋषी.  साहजिकच, बाहेरच्यांना त्या चौथऱ्यावर जायलाही मनाई असते. डाव्या बाजूच्या चौथऱ्यावर बसलेले असतात गावातले ज्येष्ठ नागरिक. हवापाण्याच्या गप्पा मारत असावेत किंवा आमच्या वेळी इतके बाहेरचे लोक नव्हते हो येत बघायला असं म्हणत असावेत. असा अंदाज बांधायचा कारण त्यांची भाषा तर काही कळत नाही आपल्याला. पुढं चालत जायचं. एखादा म्हातारा मागनं हाक मारतो, गांजा हवाय का विचारतोच इशाऱ्यानेच . पुढच्या कोपऱ्यात अधिकृत शिधावाटप दुकान असतंय.  एक वयस्कर व्यक्ती बसलेली असते गल्ल्यावर. आणि त्याच्या समोर जरा स्टेशनरी, इकड तिकडचं सामान मिळणारं दुकान. बायको इतक्या वेळ अनवाणी चालतेय याची जाणीव होते आणि मग विचार करतो,  चला बघूयात सॅन्डल मिळेल का. दुकान ज्या चौथऱ्यावर असतं तिथून साधारण अर्धा हात लांब उभं राहायला सांगतो दुकानदार. पायाची साईझ सांगितल्यावर तो एकच कम्पनीच्या दोन रंगांच्या (लाल आणि निळा. केवढी ती व्हरायटी!!!) सॅंडल काढून दाखवतो. तिथे सापडते सॅन्डल, आणि मग ती वेळ येते,  जेव्हा दुकानदार ती सॅन्डल पॅक करतो, बाजूला ठेवलेल्या एका चार -पाच  फुटी काठीने ते पॅकेट सरकवत अगदीच चौथऱ्याच्या बाहेर ढकलतो. मग तुम्ही तिथेच चौथऱ्यावर पैसे ठेवायचे. त्याच काठीने तो पुन्हा ते  आपल्याकडे ओढून घेतो. बाहेरच्यांना हात लावायचा नाही ही समजूत जपत एक 'ट्रेड' पूर्ण होतो. खरंतर तुम्ही अगदी प्रत्येक ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये वाचलेलं असतं, अशी वागणूक मिळणारे हे माहित असतं तुम्हाला तरीही लागतंच कुठेतरी आत. एका क्षणात, या देशातल्या एका विशिष्ट समाजाने जातीभेदापायी काय काय भोगलं असेल हे अगदी स्पष्ट जाणवून जातं. अर्थातच फार काळ गावात रेंगाळून चालणार नसतं,  एकतर कुठल्याच चौथऱ्यावर बसायची परवानगी नसते, राहायची बंदी असते, चावडीवरचे म्हातारे फार काही सलगी दाखवणार नसतात,  दिवस उतरणीला लागलेला असतो, ड्रायवर वाट बघत असतो.
आज मी जेव्हा मलानाची भेट आठवतो तेव्हा मला स्पष्टपणे  हे सगळं आठवतं. गावात शिरल्यानंतर जाणवलेलं एक गूढ वातावरण आठवतं. एक थबकलेपण असावं त्या गावातच असं वाटलेलं मला. जणु काही जगातली सगळ्यात जुनी लोकशाही वगैरे त्याच जुन्या काळात थांबून राहिली असावी.
थोडक्यात,  "मलाना गांव में आपका स्वागत हैं" असं फक्त कमानीवर लिहिलेलंय बाकी स्वागताच्या व्हाइब्स कुणाकडूनच मिळत नाहीत. ना गावकऱ्यांकडून ना गावाकडून.

अभिषेक राऊत 

Monday, December 9, 2019

डायना मावशी आणि शनिवारची दुपार.

 डायना मावशी अर्थात प्रिन्सेस डायना हिच्या बद्दल मला सगळ्यात पहिले ज्या पद्धतीने कळलं तो दिवस हा खरंतर तिच्या अपघाती मृत्यूचा होता. मी आणि आई हॉल मध्ये गप्पा मारत बसलो होतो. संध्याकाळची वेळ होती आणि घरचा दरवाजा उघडाच होता. (त्या काळी फ्लॅट मध्ये राहणाऱ्या शेजार्यांचे एकमेकांशी चांगले संबंध असायचे आणि शक्यतो संध्याकाळी सगळ्यांचेच दरवाजे उघडेच असायचे. ) आमच्या शेजारचा दादा धावत आमच्या घरी आला आणि म्हणाला, "अहो काकू,  डायना मावशी गेली. या ना टीव्ही वर दाखवतायेत..".  त्या क्षणाला माझ्या डोक्यात दोन - तीन  प्रश्न आले ते मला स्पष्टपणे आठवतायत. एक म्हणजे, पाटील आडनाव असलेल्या महाराष्ट्रीयन माणसाच्या मावशीचं नाव डायना कसं काय असू शकतं??  आणि समजा असलंच तरी मावशी गेल्याचं कोणी हसत,  धावत येऊन कसं काय सांगेल?? आणि त्या ही पलीकडे ही मावशी इतकी फेमस आहे की ती गेल्याचं टीव्हीवर दाखवतायेत???
नंतर लक्षात आलं की ही डायना म्हणजे इंग्लंडच्या राणीची सून, युवराज चार्ल्सची बायको. तिचा मृत्यू झाला,  अपघातात.  सौदीच्या उद्योगपतीसोबत गाडीत असताना मागावर असणाऱ्या "पापाराझीं" पासून बचाव करताना. अर्थात पापाराझीं चा अर्थ मला दुसऱ्या दिवशी मराठी वृत्तपत्रांतून कळला.
नंतर जवळजवळ आठवडाभर सगळ्या वृत्तपत्रांमध्ये  डायनाबद्दल लिहून येत होतं. ते कळण्याइतका मोठा मी नव्हतो तेव्हा.  पण  अर्थातच डायना बद्दलचं कुतूहल संपलं नव्हतं. नंतर काही वर्षांनी मी डायना बद्दल,  तिच्या आयुष्याबद्दल,  तिच्या चार्ल्स सोबत बिघडलेल्या संबंधांबद्दल वाचलं. तिचा अपघात,  त्या मागच्या थिअरी वाचल्या. तिचे निळे डोळे, गळ्यातली मोत्यांची माळ आणि देखणं हसू यात काहीतरी मेस्मराइजिंग वाटायचं. प्रसारमाध्यमांनी तिची उभी केलेली "आहे मनोहर तरी  गमते उदास " ही प्रतिमा मनात रुतून बसलेली.
शनिवारच्या निवांत दुपारी हाईड पार्कच्या हिरवळी वरून चालताना हे आठवत होतं. डायना मेमोरियल फौंटन बघायचं होतं. या मेमोरियल कडे जाण्याचा रस्ता फार सुरेख आहे. त्याचं नावच मुळात "द डायना,  प्रिन्सेस ऑफ वेल्स मेमोरियल वॉक "
एका बाजूला हाईड पार्कची हिरवळ आणि दुसऱ्या बाजूला सर्पेंटिने तळ्याचा काठ. निवांत दुपारी नौकाविहार करणारे टुरिस्ट,  तळ्याकाठने डौलात विहरणारे राजहंस बघत बघत चालत राहायचं. मेमोरियल कडे जाणाऱ्या मार्गात दर दीडशे मीटरवर,  पंचधातूचं गुलाबाचं फूल कोरलंय. चालता चालता त्या गुलाबाच्या फुलाकडे नजर जातेच. एल्टन जॉनने डायनाच्या अंत्यविधीला गायलेलं,  "गुडबाय इंग्लंडस रोज, मे यु एव्हर ग्रो इन  आवर हार्ट्स" हे गाणं नकळत कानात वाजायला लागतं. जगभरात अंदाजे अडीचशे कोटी लोकांनी तिच्या अंतिम निरोपाचा प्रसंग पाहिला. आज सुद्धा तिच्या मेमोरियल फौंटनला वर्षाला आठ लाख लोक भेट देतात. बावीस वर्षांनंतरही डायनाचं गारुड कमी होत नाही.
‌मेमोरियल फाऊंटनच्या दरवाजातच तिचा हसरा फोटो लावलाय. आत शिरताच लक्षात येतं हे "This is not a regular fountain".   हाईड पार्कच्या नैसर्गिक उताराचा उपयोग करत, कॉर्निश ग्रॅनाईट मध्ये बांधलेले हे कारंजे रूढार्थाने कारंजासारखे नाहीच मुळी. या कारंज्याचं पाणी थुईथुई नाचत नाही. यातलं पाणी वाहतं. खळाळतं. आजूबाजूला हिरवाई आणि मध्येही  हिरवाई. त्यामध्ये बांधलेल्या ग्रॅनाइटच्या घळीतून पाण्याचा हा प्रवाह अखंड सुरु राहतो. इतर कारंज्यांसारखं नुसतं कडेकडेने फिरायचं आणि चार हात लांबून सौंदर्य बघायचं असं इथं नाही.  एक छोटीशी पायवाट तुम्हाला थेट कारंज्याच्या मध्यात असलेल्या हिरवळीवर आणून सोडते. सभोवार नजर टाकली की दिसतात वाहणाऱ्या पाण्यात खेळणारी लहान मुलं. एकमेकांच्या अंगावर कारंज्याचं पाणी उडवणारं तरुण जोडपं किंवा मग नुसतंच पाण्यात पाय सोडून बसलेली इंग्लिश आज्जी. कारंज्याच्या मध्यातून पुन्हा त्याच्या कडेला यावं आणि खळाळत्या पाण्याच्या सोबतीने एक चक्कर मारावी. मी काही जगातले प्रसिद्ध फाऊंटन्स पाहिलेले नाहीत. उंचच उंच उडणाऱ्या पाण्याचं,  त्याच्या तुषारांचं, संगीताच्या तालावर नाचणाऱ्या रंगीबेरंगी कारंज्यांचं मला आकर्षण आहेच. तरीसुद्धा, हा वाहणारा,  पाण्याला उंचावर, अधिक लांबवर न नेता जवळ आणणारा आणि सहजपणे ज्याच्या अवतीभवती बागडता यावं, गाभ्यात शिरता यावं असा वेगळासा कारंजा मनात घर करून राहिलाय.
बकिंगहॅम पॅलेसच्या समोरच्या व्हिक्टोरिया मेमोरियलचा ग्रँडपणा या मेमोरियल मध्ये नाही. पण डायनाच्या मेमोरियल मध्ये आपलेपणा,  सहजपणा आहे. मेमोरियलच्या डिझाईन मध्ये,  त्या मागच्या थॉट मध्ये आणि त्याच्या एक्सिक्युशन मध्ये सुद्धा.  प्रिन्सेस  डायनाच्या सामाजिक आयुष्यातही तो होताच. म्हणून तर ती नुसती प्रिन्सेस न राहता "People's Princess" ठरली.  डायनाच्या हसऱ्या फोटोकडे पाहत मी तिथून निघालो. शनिवारची दुपार समाधानकारक होती.





- Abhishek Raut

Wednesday, July 3, 2019

अपूर्ण इच्छांचा उत्सव



काळ्या स्क्रीनवर शेवटची कमांड लिहून त्याने एंटर दाबलं.  गेले दीड तास चाललेला प्रॉब्लेम सुटला. आता 'appreciation mail ' येईल. "Weekly Achievers" मध्ये नाव आणि फोटो येईल आणि बाकी सर्व मागच्या पानावरून पुढे सुरु राहील. त्याने डोळे मिटले आणि आळस दिला. मागची काही वर्ष झरझर त्याच्या डोळ्यांसमोर आली. आपल्याला काय करायचंय या प्रश्नाचं उत्तर सापडेपर्यंत एका IT कंपनीत येउन तो स्थिरावला होता. वेगवेगळ्या शिफ्ट्स मध्ये येउन क्लायंटच्या नेटवर्कची देखभाल करायची हे त्याचं काम. नक्की काय करायचंय हे माहीत नसणं किंवा माहित असूनही करता न येणं आणि जे करत आहोत ते आवडत नसणं हे ऐन पंचविशीतले दोन प्रॉब्लेम्स त्यालाही सतावत होते. आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय. आपल्याला काहीतरी वेगळं करायचं होतं. झपाट्यानं त्याचं मन भूतकाळात जायला लागलं. खूप लहान असताना त्याला पायलट व्हायचं होतं. पप्पा त्यांचा कॅमेरा घेऊन फोटोग्राफी करायचे तेव्हा त्याला वाटायचं मॉडेल व्हावं. थोडासा मोठा झाला तेव्हा त्याला गिटार सापडली. पप्पांचे मित्र यायचे; त्यांच्यातलाच एक गिटार वाजवायचा. आपण गिटारिस्ट व्हायचं हे त्याने मनोमन ठरवलं. त्याला आठवलं , त्यानं ठरवलं तसं काही झालंच नाही. एक दिवशी अचानक पप्पानं स्वतःच्या बॅग्स उचलल्या कॅमेरा घेतला आणि कुठेतरी निघून गेला. जाताना त्याचा गालगुच्चा घेऊन आणि त्याच्यासाठी नवीकोरी गिटार ठेवून गेला. काही महिने त्याने मम्मीला विचारलं पप्पा कुठे गेला, असं न सांगता कुणी जातं का. त्याला वाटायचं कि मम्मी पप्पावर खूप चिडलीये पण कारण कळायचं नाही. ह्याला कधी पप्पाचा फारसा राग आला नाही. पप्पाचा राग. त्याला आठवली ती रात्र. बारावीच्या निकालानंतर काय करायचं असं मम्मीने विचारल्यावर तो म्हणालेला, "मला म्युझिकमध्ये करिअर करायचंय. गिटारिस्ट व्हायचंय. गिटार वाजवणं माझं पॅशन आहे." मम्मीने मला दोन कानाखाली मारल्या आणि म्हणाली, "पॅशनच्या गप्पा मला नको सांगूस." त्या क्षणी त्याला पप्पाची खूप आठवण आली. पप्पा असता तर त्याने बरोब्बर मम्मीला समजावलं असतं. का नव्हता तो त्या वेळेला. पप्पानेच दिलेली ना ती गिटार मग आता मम्मी खेचून घेत होती तेव्हा पप्पा इकडे हवा होता. त्याने काळजी घ्यायला हवी होती गिटारची. आणि अचानक त्याला जाणवलं कि ती काळजी असती तर तो असं अचानक त्याला आणि मम्मीला सोडून गेलाच नसता. त्या दिवशी रात्री मम्मीला गिटार कुलूपबंद कपाटात ठेवताना पाहून आणि स्वतः उशीत डोकं खुपसून रडताना त्याला पप्पाचा खूप जास्त राग आलेला... खूप जास्त.  आणि मग दिवसागणिक, वर्षागणिक तो राग साचत गेला, वाढत गेला.


मोबाईलच्या रिंगटोनने तो भानावर आला. "नमस्कार मी विसावा वृद्धाश्रमातून बोलतेय. येत्या रविवारी आम्ही एक कार्यक्रम ठेवलाय त्यात तुमच्या वडिलांनी काढलेल्या फोटोसचं प्रदर्शन सुद्धा आहे. तुम्हाला यायला आवडेल का?"

 "अं... हां म्हणजे मी कळवतो तुम्हाला तसं तुम्ही मला वेळ मेल करून ठेवा"

याच फोटोसने, कॅमेऱ्याने या माणसाच्या संसाराची, आयुष्याची धूळधाण केली, ह्याला वृद्धाश्रमात आणून सोडलं तरीही ह्याची फोटोग्राफी काही जात नाही आणि आपण इतक्या सहजपणे तेव्हा गिटार सोडली. आजही गिटार, म्युझिक आपल्याला बोलवत असतं पण ही हातातली नोकरी सरळसोट सोडून देता येत नाही आणि मनात आपण विचार करत राहतो कि आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय, त्याने रागात कॉम्पुटर बंद केला आणि सिगरेट मारायला स्मोकिंग झोन कडे निघाला. येत्या रविवारी बाकीचे सगळे कार्यक्रम रद्द करून वृद्धाश्रमात जायचं त्याने ठरवलं. इतके वर्ष साचलेल्या रागाला वाट मोकळी करून द्यायला.


गाडी पार्क करून तो हॉलमध्ये आला. तिकडे त्याच्या पप्पाने 'क्लिक' केलेले काही फोटोग्राफ्स मांडून ठेवले होते. त्याच्या पप्पाचे काही तिथलेच वृद्ध मित्र, दोन चार महाविद्यालयीन तरुण होते तिकडे. तो पप्पाजवळ आला. त्याला जाणवलं वयापेक्षा फार लवकर म्हातारा झालाय पप्पा. "हा माझा मुलगा." पप्पाने सोबतच्या दोन वृद्धांना त्याची ओळख करून दिली. त्यांच्या डोळ्यांत त्याला एकाच वेळी त्याच्याबद्दलचं प्रेम आणि पप्पांबद्दलचा हेवा दिसला. त्यांच्या इतक्या जवळचं, इतक्या रक्ताच्या नात्याचं कुणी तिथे येत नसावं बहुदा. तितक्यात ते दोन तीन तरुण तिथे आले आणि पप्पा बोलू लागला, "मी तसा कॅमेरा आजकाल ठेवूनच दिलाय रे बाजूला. हे पोरं इथे येत असतात आमच्याशी गप्पा मारायला.  ह्यांच्या हातात लागला ; तर म्हणे आपण प्रदर्शन भरवूयात. आता काय म्हणत होते कि तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये या फोटोग्राफीचं वर्कशॉप घ्यायला. बाकी तू येशील असं वाटलं नव्हतं."

 "हं .. कधी कधी आपल्याला वाटत नसतं तसंच वागतात लोक" तो जरा घुश्श्यातच म्हणाला.

"हं ते ही खरंच. चल जरा फिरून येऊ."

तो पप्पांसोबत फिरायला निघाला आणि बोलता बोलता दोघं त्यांच्या खोलीजवळ आले. "ये. ही माझी खोली. सवय झालीये आता एकटं राहायची."

"एकटं राहण्याबद्दल तुम्ही मला नका सांगू पप्पा. तुम्ही गेल्यापासून आम्ही एकटंच राहतोय."

"हं.. मी परत आलो नाही हे खरंच. फोटोग्राफी माझं जगणं झालं होतं. ती  असाइनमेंट म्हणजे एक खूप मोठी संधी होती. हातातली नोकरी, तुम्ही दोघं, सगळं सोडून मी गेलो." त्यांना मध्येच तोडत तो म्हणाला, "हो तू गेलास. 'तुझ्या'  पॅशनसाठी पण त्या अनुभवाने मम्मी इतकी कडवट झाली कि मला माझी गिटार, म्युझिक सारं काही सोडून द्यावं लागलं. केवळ तुझ्यामुळे. बरं गेलास ते गेलास आणि परत आलास तर ते सुद्धा एक अयशस्वी फोटोग्राफर म्हणून"?

 "अच्छा म्हणजे मी यशस्वी झालो असतो तर माझ्या नावाचा उपयोग करून मी तुला एक गिटारिस्ट म्हणून 'सेटल' केलं असतं असं होय"?

"होय. इतके वर्षं तुझं नाव लावल्याचा काहीतरी फायदा झाला असता."

"हं खरंय. ना मी एक चांगला बाप झालो ना एक चांगला फोटोग्राफर."

पप्पाला मध्येच तोडत तो पुन्हा म्हणाला "तुझ्या या अशा बेजबाबदार वागण्यामुळे मलाही गिटारिस्ट नाही होता आलं. मी गिटार सोडली, नोकरी करतोय, दर महिन्याला या वृद्धाश्रमाचे पैसे भरतोय आणि तू मात्र अजूनही तुला आयुष्यभरासाठी फेल करणारी फोटोग्राफी सोडत नाहीयेस. तुला काहीच कसं वाटत नाही रे पप्पा"?

इतका वेळ आपल्या पोराच्या डोळ्याला डोळा न देणाऱ्या पप्पाने वर पाहिलं, नजर रोखली आणि म्हणाला, "माझ्या नावाखाली स्वतःचा पळपुटेपणा लपवू नकोस. माझ्यामुळे कदाचित एकदा तुझ्यापासून गिटार दुरावली असेल पण निर्णायक क्षणी तू स्वतःतरी अशी कितीदा तिला स्वीकारलीयेस"?

 पप्पाच्या त्या वाक्याने त्याला आठवलं, कॉलेजच्या लास्ट इयरला असताना म्युझिक बँड बनवण्याची हाताने घालवलेली संधी, नंतर नोकरी लागल्यावर कमी झालेली प्रॅक्टिस, काहीतरी वेगळं करायचंय असं ऑफिसमध्ये म्हणायचं आणि वेळ आली कि 'म्युझिक गिग' सोडून ओव्हरटाईम करायचा. पप्पाला दोष देता देता त्याची पॅशन वयाच्या पंचवी-तिशीतच मरू लागली होती. बराच वेळ तो शांत राहिला.

पप्पा त्याला म्हणाला, "फार विचार करू नकोस. मी पॅशनेट म्हणून मरेन आणि तू असाच जगत राहिलास तर प्रॅक्टिकल म्हणून मरशील. तोवर तुला जसा वेळ मिळेल तसा इथे येत राहा".

 पप्पा अंथरुणातून उठला. सहजपणे त्याने हात पुढे केला. त्याचा हात धरून पप्पा कपाटाजवळ आला त्याने कपाट उघडलं आणि आत ठेवलेली नवी कोरी गिटार त्याला दिली, म्हणाला, "हे घे. मला माहित होतं तू आज येशील. लगेच सगळं सोडून गिटारिस्ट हो असं नाही म्हणणार मी. तितपत प्रॅक्टिकल मी सुद्धा झालोय आता, पण वाजवत राहा सोडू नकोस".

आताशा दर पंधरा दिवसांनी तो वृद्धाश्रमात जातो. पप्पांना एक ट्रायपॉडसुद्धा घेऊन दिलाय त्याने. दर पंधरा दिवसांनी ते भेटतात. कधी नुसते फोटोच काढतात, कधी गप्पाच मारतात, तर कधी गिटारच वाजवत बसतात. एकमेकांसोबत वेळ घालवतात. इतके वर्षं अपूर्ण राहिलेल्या एकमेकांच्या इच्छांचा उत्सव साजरा करतात.
-अभिषेक राऊत