" सत्तेचे स्वयंवर "
आज तिच्या लग्नाचा दिवस. गेले पंधरा दिवस तिच्या लग्नाची तयारी सुरु होती. धावपळ, गडबड , गोंधळ आणि कार्य तडीस नेण्याची इच्छा. हे सगळं करायचं तिच्यावरच्या प्रेमापोटी. खरं तर तिचं रंगरूप इतकं खास नाही पण एकदा का हिचं लग्न झालं की आपल्या आयुष्यात आलेल्या व्यक्तीचं रंगरूप आणि बरंच काही ही बदलवून टाकते. त्यामुळे हिच्याशी लग्न करायला उत्सुक असणाऱ्यांची संख्या बरीच. "एक अनार और सौ बीमार " असं म्हणा हवं तर. अशा परिस्थितीत काय करायचं हे आमच्या पुराणांमध्ये सांगून ठेवलंय. अशा वेळी एकच उपाय आणि तो म्हणजे "स्वयंवर".
स्वयंवर म्हटलं की एकमेकांना शह-काटशह देणारे धुरंधर आले. नवनव्या युक्त्या-प्रयुक्त्यांनी तिच्यावर आणि तिच्या मायबापावर मोहिनी घालणारे जादुगार आले. या देशात मुलीचा होकार मिळवायचा असेल तर आधी तिच्या मायबापांनी तुमचा स्वीकार करणे गरजेचं असतं. त्यामुळे स्वयंवर तिचं असलं तरी तिच्या मायबापाला खुश करण्यावर प्रत्येकाचा भर. गेले पंधरा दिवस फक्त तिचा विचार करणाऱ्या साऱ्याच धुरंधर वीरांसाठी आजचा स्वयंवराचा दिवस म्हणजे फारच महत्व्वाचा.
एका भव्य मंडपात हे सगळे धुरंधर जमलेले. काही जण गुडघ्याला बाशिंग बांधूनच आलेले. काही फारच 'confident'. त्यांना म्हणे घराण्यातूनच परंपरेने स्वयंवर जिंकण्याच ट्रेनिंग मिळालेलं असतं. काही जण नुसते हौशे 'लग्न पाहावं करून' म्हणून आलेले. काही सच्चे प्रियकर ह्यांच्याकडे तिच्या मायबापांना देण्यासाठी काही नसतं पण तत्त्वांची आणि प्रेमाची ताकद असते. काही उपेक्षित पण मग त्यांना फार काळ थांबवत नाहीत त्यांचे मंडप राखीव आणि वेगळे असतात म्हणे.
गेले पंधरा दिवस त्यातल्या प्रत्येकाने दौलतजादा केलेली असते . काहींनी तिच्या मायबापाला पैसे, साडी-चोळी , खण -नारळ दिलेला असतो . काहींनी मोबाईल फोन, टी.वी. ते अगदी केबल कनेक्शन घेऊन दिलेलं असतं . काहींनी तिच्या मायबापांनाच नव्हे तर अक्ख्या भावकीत जेवणावळी आणि दारू पार्ट्या दिलेल्या असतात. काहींनी भविष्याची सुंदर चित्रं रंगवलेली असतात . काहींनी नुसतेच शब्दाचे खेळ खेळलेले असतात तर काहींनी स्वयंवराच्या धामधुमीत आपली स्वताची धन करून घेतलेली असते. प्रथेप्रमाणे सगळं घडतं. फटाक्यांच्या लडी फुटतात, दारूच्या नद्या वाहतात, गुलालाच्या रंगात आसमंत न्हाउन निघतो. प्रतिस्पर्ध्यावर मात करत तिला घरी घेऊन जाणारा एकच असतो. तिला जिंकल्याच्या उन्मादात आता तिचं कन्यादान करणाऱ्या तिच्या मायबापांचा सोयीस्कर विसर पडणार असतो.
तिचं नाव असतं सत्ता. तिच्या मायबापाला आम्ही जनता म्हणतो आणि स्वयंवराच्या या सोहळ्याला निवडणूक. राजेशाहीने घालून दिलेली स्वयंवराची ही पद्धत आम्ही गेली ६५ वर्षं पाळतोय कारण त्यामुळेच आमची लोकशाही जिवंत आहे सुद्रुढ आणि ठणठणीत नसली तरी.
- अभिषेक राऊत

No comments:
Post a Comment