Friday, March 13, 2026

मृत्यूची वाट , मणिकर्णिका घाट आणि ब्लू लस्सी वाला

हळू हळू सूर्य पश्चिमेला कलू लागतो. संध्याकाळ होते . दशाश्वमेध घाटावर गंगा आरतीची तयारी सुरू होते. काशी विश्वेश्वराच्या देवळातला घंटानाद आसमंत भारून टाकू लागतो. मंदिराबाहेरच्या मणिकर्णिका घाटावर चिता पेटलेली असते. 

गंगा आरती संपते. घाट गजबजून उठतात. आकाशातली चंद्राची कोर हळू हळू ठळक होऊ लागते. आकाश निरभ्र असेल तर चांदण्या गंगेच्या पाण्यावर उतरतात. एक एक घाट ओलांडून मणिकर्णिका घाटाजवळ जायचं. गडद काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर पिवळ्याकंच केशरी रंगाच्या ज्वाळा उठून दिसतात. अविरत चालू असतं त्या ज्वाळांचं आभाळाला भिडणं. 

रात्र अजून गहिरी होते. घाटांवरचा कोलाहल थांबतो. दिवसभर गंगेच्या पात्रात असणाऱ्या होड्या घाटाकडेला बांधल्या जातात. एखाद दुसरा बाबा चिलीम ओढत घाटाच्या पायऱ्यांवर पथारी पसरतो. दोन चार अघोरी साधू साधना करत असतात. एक स्तब्धता येते वातावरणात. चालू असते फक्त मणिकर्णिका घाटावरची अविरत चिता. 


आणि मग काल मावळलेला सूर्य अस्सी घाटाच्या समोरून हळू हळू परत वर येऊ लागतो. सारस पक्ष्यांचे थवे गंगेच्या पाण्यावरून उडू लागतात. एखादा कलाकार घाटाच्या पायऱ्यांवर बसून बासरीचे सूर छेडू लागतो. काल-चक्र पुन्हा सुरू होतं आणि तिथे मणिकर्णिका घाटावर मृत्युचक्र सुरूच असतं अविरत. 


मी वाचलं की मणिकर्णिका घाटाचं सुशोभीकरण करण्यासाठी काही मंदिरे तोडली गेली वगैरे. 


किती किती बारकी बारकी मंदिरे आहेत हो काशीत. नजर जाईल तिकडे मंदिर आणि हात लागेल त्या दगडाला शेंदूर फासलेला. आणि हे आज नाही , पुरातन काळापासून तसंच. 


साक्षात विश्वेश्वराच्या मंदिराचं सुशोभीकरण करून कॉरिडोर बांधला तेव्हा अनेकांची घरं, दुकान तोडली आहेत . 

तर मणिकर्णिका घाटासाठी तोडली आजूबाजूची दोन चार मंदिरे तर काय एवढं.  लोक उगाच म्हणतात , बनारस की रूह छीन ली वगैरे. 


तर मणिकर्णिका घाट. सगळ्यांना वाटतं मरण यावं तर काशीत आणि अंत्यसंस्कार व्हावेत तर मणिकर्णिका घाटावर. मोक्ष मिळतो म्हणे. सदैव सुरू असतात तिथे चिता. 


घाटाच्या बाजूचा रस्ता अगदी चिंचोळा आहे. त्या रस्त्यावरून सदैव प्रेतांची रीघ लागलेली असते. बाकी गर्दी सुद्धा असतेच. लोक कुठून कुठून येतात मोक्ष प्राप्ती साठी काशी मध्ये शेवटचा श्वास घ्यायला. 


मृत्यू यायच्या आधी ते असतात माणसं आणि मृत्यू आला की एका क्षणात त्यांची होते “बॉडी” . मग चार पैसे देऊन चौघांच्या खांद्यावर ती बॉडी जाते मणिकर्णिका घाटाच्या पायऱ्यांवर. तिथे होतात सौदे तिथल्या “डोम” राजासोबत. 

बॉडीला फासलं जातं तूप , बाजूच्या गाळ्यांमध्ये रचलेली चंदनाची लाकडं जमवून रचली जाते चिता. डोंब उसळतो आगीचा. 

मृताला मिळतो मोक्ष. त्याच्या नातेवाईकांना मिळतं समाधान , पिढ्यान पिढ्या प्रेतं जाळणाऱ्या हातांना मिळतात पैसे आणि गंगेच्या विशाल पात्राला मिळते कधी राख तर कधी अर्धवट जळलेले बॉडीचे तुकडे. 

गंगामाई सगळं तिच्या पोटात घेऊन वाहत राहते. 

मसान चित्रपट पाहिला असेल तुम्ही त्यात आहेच हे सगळं दाखवलेलं….


मणिकर्णिका घाटाच्या त्या बारक्या गल्लीतून गंगेकडे जाताना अनेक विचार मनात येतात. अंगाला घासून जाणाऱ्या तिरड्या आणि त्यावर निश्चल पडलेले देह. निव्वळ व्यवसाय म्हणून पिढ्यान पिढ्या चितेला डोंब लावण्याचं काम करणारे लोक , चंदनाच्या लाकडांचा नाकात जाणारा वास, एकच वेळी जळणाऱ्या चार , चार , पाच पाच चिता, धूर आणि एक चिता विझण्या आधीच दुसरी चिता रचायची घाई. सगळं बघून एक रितेपणा येतो 


दोनच उपाय उरतात. एकतर घाटावरून गंगेकडे जावं आणि होडीत बसून दूर दूर जावं किंवा ….

बिन चेहऱ्याच्या गर्दीला , “हे राम जयराम” च्या आवाजाला , सजवलेल्या तिरड्यांना भिडावं आणि त्याच बारीकशा गल्लीतून वरच्या अंगाला जावं - तिथं जगात भारी लस्सीचं दुकान आहे - ब्लू लस्सी वाला. त्या ब्लू लस्सी वाल्याकडे बसावं, मस्त लस्सी प्यावी , खुश व्हावं कारण मरणाला बघितल्यावर जगण्याला भिडायला जास्त मजा येते. 


- अभिषेक राऊत 

Thursday, February 26, 2026

मराठी भाषा दिन…

केशरी रंगाचं रेशनच कार्ड होतं घरी. एकदा झेरॉक्स काढायला गेलेलो. तेव्हा मागच्या पानावर कुसुमाग्रजांची कविता लिहिलेली- “स्वातंत्र्यदेवतेची विनवणी” - “पन्नाशीची उमर गाठली , अभिवादन मज करू नका . मीच विनवते हात जोडुनी वाट वाकडी धरू नका “. 

भारताच्या स्वातंत्र्याला ५० वर्षं झाल्याबद्दल त्यांनी लिहिलेली कविता. १०-१२ वर्षांचा असेन मी. त्या दिवशीपासून कुसुमाग्रजांशी ओळख झाली. 


मग आठवीत असताना मराठीच्या पुस्तकातली “कणा” कविता वाचली . कुसुमाग्रजांचीच. “पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा” . त्याच्या आधी केव्हातरी अशीच मराठीच्या पुस्तकात वाचलेली , “कोलंबसाचे गर्वगीत” - “अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा , किनारा तुला पामराला” . थेट समुद्राला सांगणारा कोलंबस. समुद्र म्हटला की न चुकता आठवतात सावरकर. सातवी किंवा नववीच्या पुस्तकात होती त्यांची कविता - “ने मजसी ने , परत मातृभूमीला , सागरा , प्राण तळमळला”. 

समुद्र आठवला की गोवा आठवतो आणि गोवा आठवलं की आठवतात बोरकर. पाचवीत की सहावीत केव्हातरी वाचलेले - “माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा” किंवा मग आठवीच्या पुस्तकातले मर्ढेकर आठवतात. सकाळच्या मुंबईचं वर्णन करणारे “न्हालेल्या जणू गर्भवतीच्या सोज्वळ मोहकतेने बंदर, मुंबापुरीचे उधळत येई माघामधली प्रभात सुंदर” 

मुंबई आठवली की साहजिक नारायण सुर्वे आठवतात. दहावीच्या पुस्तकात होती त्यांची कविता - “कामगार आहे मी , तळपती तलवार आहे . सरस्वतानो थोडा गुन्हा घडणार आहे”. 


थोडं अजून मागे जाऊन बुद्धीला ताण दिला की लहानपणापासून वाचलेले समर्थांचे मनाचे श्लोक आठवतात. रोज म्हणायचो शाळेत. “मना सज्जना भक्ती पंथेची जावे” आणि मग “पसायदान” व्हायचं- “आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे”. मराठीला विश्वाच्या पटलावर उभं करून “माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेही पैजा जिंके “ असं म्हणणारे सांग ज्ञानेश्वर आठवतात. चालता बोलता “भले ते देऊ कासेंची लंगोटी, नाठाळआंचे माथा हाणो काठी” म्हणणारे तुकाराम आठवतात. गाथेची पहिली ओळख आम्हाला मराठीच्या पुस्तकातून शाळेतूनच झाली. 


तिसरी चौथीची मराठीची पुस्तकं आठवतात. इंदिरा संत आठवतात, चौथीत असताना वगैरे त्यांची कविता असेल - “नको नको रे पावसा , असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली” . बहिणाबाईंची साधी सोपी कविता आठवते, “मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर. किती हाकला हाकला फिरी येत पिकावर” . शांताबाई शेळक्यांनी लिहिलेली “पैठणी” आठवते. सहावीत होती वाटतं . “कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवटाळून, मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून. मधली वर्षं गळून पडतात , काळपटाचा जुळतो धागा , पैठणीच्या चौकड्यांनो- आजीला माझे कुशल सांगा” 

 

मराठी भाषा दिन आला की असं सगळं आठवतं. असं वाटतं आपण मराठी नाही शिकलो . मराठीने आपल्याला शिकवलं. या सगळ्या कविता पुन्हा वाचाव्यात वाटतात. असं वाटतं आपल्या लहान मुलाला या सगळ्या कविता ऐकवाव्यात. 


मग लक्षात येतं, अरे आपण तर त्याला इंग्रजी शाळेत घातलंय. आजकाल तो आपल्याशी इंग्रजी + हिंदी + मराठी अशा त्रिसूत्री भाषेत बोलतो.  “मैं खुद हा होमवर्क केलाय “ असलं काहीतरी त्याच्या तोंडून ऐकलं की स्वतःचा फार मोठा पराभव झाल्यासारखं वाटतं. 


पण ठीक आहे. आपण हरायचं नाही . रोज एखादा वाक्प्रचार , एखादी म्हण , एखादा नवीन शब्द नव्या पिढीला शिकवायचा. मराठी दिन नव्या पिढीसोबत रोज साजरा करायचा. मग एक दिवस आपोआपच इंग्रजी शिकणारी ही पिढी सहजपणे तुकोबाचे अभंग समजून घेईल आणि कुसुमाग्रजांच्या कविता सुद्धा. तोवर म्हणत रहायचं , “अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा , किनारा तुला पामराला” 


मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा. 


  • अभिषेक राऊत 

Friday, January 2, 2026

गुडगांव, भरतपूर आणि जाट डोंट केअर



 पूरी बाबे दी आ मेहेर, जाट डोंट केअर ओ बेबी, जाट डोंट केअर. 

साऊथ दिल्लीमधल्या एका अत्यंत महागड्या पब मध्ये रॅपर सुलतानचं हे गाणं वाजत असतं आणि एकच वेळी अनेक जण या गाण्यावर थिरकत असतात . 


दिल्ली - गुडगाव - भरतपूर हा प्रवास एकूण ४ राज्यांतून होत असला ( दिल्ली - एनसीआर , हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान ) तरी या प्रवासाला जोडणारा दुवा म्हणजे    भारतातील एक सधन, संपन्न आणि जमीनदार असणारा जात समूह - जाट 


राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या बॉर्डरवर भरतपूर आहे. म्हणायला राजस्थान मध्ये पण बऱ्यापैकी इन्फ्लुएन्स उत्तर प्रदेश, हरियाणा इथला. त्याचं कारण इथे राज्य होतं जाट लोकांचं.  सूरजमल जाट हा भरतपूर संस्थानातला सगळ्यात प्रसिद्ध राजा . 


राजस्थानची गंमत अशी की , बऱ्याचशा राजस्थानवर राजपुतांचं राज्य होतं. पण जसं जसं आपण राजस्थान कडून हरियाणा , उत्तर प्रदेश कडे येत जातो तसं तसं जाट लोकांचा इन्फ्लूअन्स वाढत जातो. 


जाट हा मुळात एक जात समूह. अखंड हिंदुस्थानात (फाळणीपूर्वीच हिंदुस्थान) , पूर्व पंजाब , पंजाब , आणि काही प्रमाणात सिंध प्रांतात मोठ्या प्रमाणावर जाट होते आणि आहेत. काळाच्या ओघात काही जाटांनी इस्लाम धर्म स्वीकारला , काहीनी शीख धर्म स्वीकारला तर काहीनी हिंदू. 


तर भरतपूर. हे संस्थान जाटांचं. गंमत अशी की एक काळ होता जेव्हा राजपूत आणि जाट यांच्यातून विस्तवसुद्धा जायचा नाही . पिढ्यान पिढ्यांची दुश्मनी वगैरे. अजूनही या दोघांत रोटी बेटी व्यवहार होणं कठीणच. कदाचित वर्णव्यवस्थेच्या उतरंडीत , राजपूत क्षत्रिय आणि जाट मात्र वैश्य किंवा शूद्र त्यामुळे असावं. पण शेती करणारा जात समूह असल्याने जाट नेहमीच सधन आणि जमीनदार होते. महाराष्ट्रातल्या मराठ्यांसारखे. राजपूत आणि मुघलांच्या उतरत्या काळात काही जाट सरदारांनी स्वतःची राज्यं स्थापली आणि वाढवली. भरतपूर त्यातलंच एक. 


भरतपूरच्या मध्यभागी किल्ला आहे. किल्ला आणि महाल.  चौबुर्जा च्या चौकात उतरायचं, देवरामची फेमस कचोरी खायची आणि बैटरी रिक्षात बसून किल्ल्याकडे जायचं. किल्ल्याच्या चारो बाजूने “नहर” आहे. जणू काही पाण्याची तटबंदी असावी असं. एकेकाळी यातलं पाणी स्वच्छ असावं. आता अर्थातच ते खराब असतं.


नहर वर बांधलेला छोटासा पूल ओलांडला की भला थोरला दरवाजा लागतो. तो ओलांडून किल्ल्याच्या रस्त्याला लागायचं. किल्ल्याकडे जाण्याच्या रस्त्यात अग्रवाल, गोयल यांची मोठमोठो घरं. कधी काळी राजांनी या जमिनी तिथल्या बनिया लोकांना विकल्या असाव्यात. रिक्षावाला सांगतो , “किला जाटोंका लेकीन इलाका बनियोंका” . 


भरतपूरच्या राजांचं साहजिक मुघलांशी वैर. अनेक मुघल आक्रमणांना आणि नंतर ब्रिटिश आक्रमणांना या किल्ल्याने आणि जाट राजांनी परतवून लावलं. 

असं म्हणतात की ब्रिटिशांनी तब्बल १३ वेळा हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला. शेवटी १८२६ साली भरतपूर ब्रिटिशांनी जिंकून घेतलं. 


राजस्थानात जाट राजांची संस्थानं फार नाहीत. भरतपूर त्यातलं सगळ्यात महत्वाचं आणि मोठं. दिल्ली आणि आग्र्याच्या जवळ असल्याने मुघलांशी अनेकदा संघर्ष केलेलं. जवळपास शंभर वर्षं टिकून राहिलेलं संस्थान. किल्ल्याच्या आतल्या भागात आता या राजांच्या शस्त्रांची प्रदर्शनं आहेत. त्यांचे फोटोज आहेत आणि संस्थानचा इतिहास आहे. 


परतीच्या प्रवासात , भरतपूरहून दिल्लीकडे जाणारा रस्ता गुरगाव मधून जातो. गुडगाव म्हणजे उत्तर भारतातलं मोठं IT आणि औद्योगिक शहर. मुख्य रस्त्याने गेलात तर सायबर हब , गोल्फ सिटी , IT पार्क बघून डोळे गरगरतात. 

पण एखादा रिक्षावाला तुम्हाला आतल्या रस्त्याने घेऊन जातो आणि ज्या जुन्या गावांच्या छातीवर गुडगाव उभं राहिलं त्या गावांच्या खुणा दिसतात. 

आक्रसून गेलेली जुनी घरं आणि त्या घरांच्या व्हरांड्यात गुडगुड करत हुक्का पिणारा एखादा म्हातारा “ताऊ”जी दिसतो. धुळीने, खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्याच्या बाजूला एखाद दुसरं मंदिर असतं. त्यावर लिहिलेलं असतं- “महादेव मंदिर , गांव- झरसा “. 


मला हिंजवडी आठवतं. मोठमोठ्या फेज १,२,३ बांधल्या तरी जरा आतल्या रस्त्यांवर गावातली जुनी घरं, जुनी माणसं , जुने रस्ते , शेंदूर फासलेल्या गावदेवतांची मंदिरे तशीच असतात. जणू काही विकासाच्या रंगरंगोटी मध्ये राहून गेलेले एखाद दुसरे कोपरे. 


मी आय टी मध्ये काम करतो . मला विकासाशी प्रॉब्लेम नाही. शेतकऱ्यांच्या जमिनीवर देशात कुठेही आय टी पार्क उभे राहिले तरी विकासाचं “मॉडेल” एकच असतं हे मला माहितीये.  माझ्या मनात मी महाराष्ट्रातले सरंजामदार मराठे आणि उत्तरेतले जाट यांच्यातली साम्यस्थळं शोधू लागतो. 

आणि मग सॅटरडे नाईट ला पुण्यात एखाद्या पब मध्ये “पाटलाचा बैलगाडा त्यानं घाटात केलाय राडा” हे ऐकलं की मला साऊथ दिल्लीतल्या , 

“पूरी बाबे दी आ मेहेर, जट डोंट केअर ओ बेबी, जट डोंट केअर.” गाण्याची आठवण येते आणि माझी भरतपूर - गुडगाव ची ट्रिप आठवते. 


- अभिषेक राऊत