Saturday, November 7, 2015

लेबर चौक, IT , स्किल्स वगैरे वगैरे ….



लेबर चौक, IT , स्किल्स वगैरे वगैरे ….


cubicle
एका मोठ्या शहरात मी राहतो. माझ्या आजूबाजूला जिकडे नजर जाइल तिकडे फक्त बांधकाम सुरु असतं. १०-१५ मजल्यांच्या उंच इमारती. इमारतींच्या मध्ये गार्डन, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रक, त्याच्या बाजूने कृत्रिम झाडांची हिरवळ, त्या झाडांच्या अंगावरून सोडलेल्या लाईटच्या माळा, काडेपेटीसारखी चौकोनी घरं आणि त्या चौकोनी घरांत राहणारी समाधानी चार लोकं. शहराच्या कुठल्याही भागातून मला हेच दिसतं.
मी ह्या शहरात आलो तेव्हा लहान होतो लहान म्हणजे वयाने नाही अनुभवाने. माझ्याच सोबत कधीतरी तो सुद्धा ह्या शहरात रहायला आला असावा. शहराच्या एका कोपऱ्यात रांगेने बांधून ठेवलेल्या वेगवेगळ्या नावांच्या खूप सुंदर इमारती होत्या. मी रोज तिथे जायचो. काम करायला. माझ्याचसारखे काही हजार लोक तिकडे यायचे. वेगवेगळ्या वयाचे, अनुभवाचे, स्किल्सचे आणि वेगवेगळ्या विचारांचे लोक. रोज अशा बिल्डीन्गीमध्ये बसून काम करायचे. त्यांना प्रत्येक शहरांच्या कोपऱ्यात जाउन गोळा केलेलं.त्यांना विचारलेलं तुमची स्किल्स काय? त्या स्किल्सची किंमत ठरायची आणि मग वर्षाला त्या हजारो लोकांना त्यांच्या कुवतीनुसार “पगार” मिळायचा. त्यांच्या मधलाच एक मी. ……. आणि तो? तो रोज बघायचा ह्या शहरातले लोक सकाळी एका छोट्या चौकोनात चौकोनात काम करतात आणि संध्याकाळी मोठ्या चौकोनात येउन आराम करतात. मोठ्या चौकोनाना म्हणायचं घर आणि छोट्यांना म्हणायचं “क्युबिकल”. मोठे चौकोन बांधण्याचं काम करणारे शहराच्या एका कोपऱ्यातून “स्किल”बघून लोक उचलायचे. त्यालाहि तसंच उचललेलं. तासाच्या हिशोबाने त्याला दर महिना पैसे मिळायचे. माझंही तसंच.………
हळूहळू आम्ही दोघेही मोठे होत गेलो. आधी मी स्वतःच्या कामाचा विचार करायचो, आता “प्रोजेक्ट”चा करायला लागलो. अजून थोडा मोठा झालो. आता माझ्यासाठी काम फक्त काम न राहता “बिझनेस” झालं होतं. मोठ्या मोठ्या “प्रोजेक्ट”वर मी लोक लावायला लागलो. झटझट प्रमोशन घेत पुढे गेलो. तो सुद्धा एकेक पायऱ्या चढत गेला. कामगार होता, ठेकेदार झाला, पुढे पुढे जात राहीला. स्वतःचे स्किल्स विकता विकता तो स्किल्ड लोक विकू लागला.
परवा एका मोठ्या पार्टीमध्ये तो भेटला. मला विचारलं “काय करता साहेब तुम्ही?” मी म्हटलं “IT मध्ये आहे.” तो म्हणाला,”म्हणजे नक्की करता काय?” माझ्या डोळ्यांसमोरून झपझप सगळं सरकलं software, skills , business वगैरे वगैरे. क्षणभर विचार केला म्हटलं……. “वैसे तो हम…” त्याने मध्येच मला थांबवलं आणि म्हणाला, “वैसे तो हम बंदे लगाते है…… हेच ना???” मी म्हटलं, “but it is not bodyshopping………It is knowledge……” मग मी आपणहूनच गप्प बसलो.
Engineering colleges मला शहरातल्या लेबर चौकांसारखे दिसायला लागले. त्यातला प्रत्येक विद्यार्थी केवळ एक “Resource” दिसू लागला.
Consultants म्हणजे ठेकेदार वाटू लागले.मला स्वतःलाच मी लोकांचे “स्किल्स”विकून मधल्या मध्ये माल खाणारा व्यापारी वाटू लागलो. शहराच्या कोपऱ्यात “विशेष आर्थिक क्षेत्रात” बांधलेल्या त्या सुंदर सुंदर बिल्डिंगी मला APMC मार्केटसारख्या वाटू लागल्या.……मी त्याच्याकडे पाहिलं “Information Technology” च्या ह्या धंद्याला मनोमन नमस्कार केला. माझ्यासारखाच “बंदोका बिझनेस करणाऱ्या “त्या”च्यासोबत बसून मी पुढचा पेग ओठांना लावला.
– अभिषेक राऊत

Saturday, August 1, 2015

काही नाती काही रात्री



मागच्या एका तासात कॉफी पिता पिता त्याने तीन वेगवेगळ्या कॅटलाॅग मधल्या किमान शंभर मुलींचे फोटो नजरेसमोरून घातले होते. फोटो, त्यापुढे नाव , त्याखाली वय , खाली उंची, त्याखाली पगार. अगदी ते लहानपणी W W E चे कार्ड्स कसे यायचे त्यावर कसे ते फोटो आणि मग त्या खाली बाकी आकडेवारी अगदी तसंच. अर्थात त्या खाली ज्या आकडेवाऱ्या द्यायचे, चेस्ट, बायसेप्स वगैरे त्या इथे दिल्या तर… असा एक तद्दन अॅडल्ट विचार त्याच्या मनात आलाच. कॉफी संपली, त्याने आळस दिला आणि सुट्टा मारायला म्हणून निघाला. एकंदरच हे लग्नासाठी मुलगी शोधणे प्रकरण फारच डोक्यात जायला लागलं होतं. सिगरेटच्या धुरासोबत त्याचे विचार हलके हलके होत भूतकाळात जायला लागले. आपले क्रश, प्रेम , आकर्षण असे वेगवेगळे ‘tags’ दिलेल्या मुली त्याला आठवू लागल्या. आज इतक्या वर्षांत मुलगी निवडण्यासाठीचे आपले निकष बदललेत याची त्याला जाणीव झाली.
तो घरी आला. घरात आल्या आल्या आईने नवीन एका वधू-वर सूचक संस्थेचा फॉर्म त्याच्याकडे दिला. सवयीने त्याने फॉर्म भरायला सुरुवात केली. एका प्रश्नापाशी येउन तो थांबला. “Did you have any past relationship?” “Are you virgin ?” चायला इतके प्रश्न तर जनगणनावाले, आधारवाले , गेला बाजार रेशन कार्डवाले सुद्धा विचारत नाहीत. बरं हे दोन्ही प्रश्न एकमेकांना लागून. म्हणजे relationship आणि virginity यांचा इतका जवळचा संबंध आहे असं वाटतं कि काय ह्यांना.
त्या प्रशानंभोवती तो फिरत राहिला. तिचे निरोपाचे काही शब्द आठवले त्याला. ती म्हणालेली “कसंय सुजय, There is a difference in liking someone, loving someone and marrying someone. तुला हे जितक्या लवकर कळेल तितक्या लवकर आपण एकमेकांतून मोकळे होऊ.” बस्स. इतकंच बोलून आणि MS करण्यासाठी USA ला जाण्याचा निर्णय सांगून तिची आवडती कॉफी तशीच अर्धवट सोडून ती निघून गेली होती. इतक्या सहज?? इतक्या सहज निघून जावं तिने? तो एकटाच कॉफी शॉप मध्ये बसून राहिला. त्याला आठवलं बरोब्बर एक वर्षापूर्वी ह्याच मुलीसोबत त्याने आयुष्यातलं पहिलं स्मूच केलं होतं. त्याला नेहमी वाटायचं की स्मूच म्हणजे फटाक्यांच्या लडीतल्या सगळ्यात पहिल्या फटाक्यासारखं आहे. एकदा तो पेटला कि मग अक्खी लड धगधगत फुटते. ‘uncontrolled events’ सारखी. त्या रात्री ते त्याला पटलं.  काही रात्रींमध्ये अख्खं नातं घडवण्याची ताकद असते.  पण मग एक वर्षात सारेच अंदाज आणि प्रत्येक हिशोब चुकत गेला. एकमेकांसोबत आयुष्यभर राहण्याच्या शपथा हवेत विरल्या आणि ती US ला निघून गेली.
त्या गोष्टीलाही आता ४ वर्षं होतील. या चार वर्षांत तो सेटल झाला. २ ‘onsite’ ट्रीप, ७ आकडी पगार आणि नुकताच बुक केलेला नवीन flat. आणि आता लग्नासाठी मुली शोधायची गडबड. ती गेल्यानंतर काय बदललं काय नाही याचा धांडोळा त्याने कधी घेतला नाही. पण तिच्यासोबतच्या त्या पॅशनेट रात्रीनंतर त्या दोन प्रश्नांची उत्तरं त्याच्यासाठी कायमची बदलली होती.
“Did you have any past relationship?” – YES
“Are you virgin ?” – NO
त्याने फॉर्म पूर्ण भरून लिफाफ्यात बंद केला. लिफाफा आईला देत म्हणाला,,”हे घे, उद्या जाउन त्या वधू-वर सूचक केंद्रात देऊन ये.”
“तुम्ही वेगवेगळ्या ccd मध्ये एकाच व्यक्तीसोबत जाउन कॉफी पीत असाल तर तुम्ही प्रेमात असता पण जर तुम्ही एकाच ccd मध्ये वेगवेगळ्या व्यक्तींसोबत जाउन कॉफी पीत असाल तर नक्कीच तुम्ही लग्नाळू आहात असं समजायला हरकत नाही…”  आज ज्याला पाहणार तो बाविसावा मुलगा. काहीना आपण नाकारलं काहींनी आपल्याला. ह्या सगळ्या  प्रवासाचा साक्षीदार एकच. चांदणी चौकातल ccd.
संध्याकाळी ६ ची हिंजवडीहून निघालेली बस पावणेसात ला बरोब्बर ccd च्या मागच्या अंगाला सोडते. तिथून चालत ५ मिनिट बस्स. ७ ची वेळ व्यवस्थित पाळता येते. कंपनीच्या पार्किंगमधून तिने बस पकडली. कानात हेडफोन्स घातले आणि एकाच वेळी तिच्या कानात गाणं आणि डोक्यात विचार घुमू लागले.
तुमचा भूतकाळ तुमची पाठ सोडत नाही. तुम्ही त्यात गुंतून राहिलात तर वर्तमान आणि भविष्य या दोन्ही काळांचे L लागतात. हे वाक्य आयुष्याच्या व्याकरणाला अगदी योग्य दिसतं. भूतकाळातून बाहेर पडण्यासाठी तिने २ अफ़ेअर केली आणि मग वैतागून विवाह संस्थेचा अर्ज भरला आणि एकवीस लोकांना reject करून आज बाविसाव्याला भेटायला निघाली होती.
देवांग तिच्या आयुष्यातला पहिला पुरुष. चार वर्षं सोबत राहून मग ते वेगळे झाले. कारणं तशी बरीच. तिला वाटायचं त्यांचं प्रेम सगळ्याला पुरून उरेल. तसं काही झालं नाही. त्यानंतर गेल्या तीन वर्षात २ पुरुष येउन गेले. तापलेल्या जमिनीला शांत करायला पाउस येतो ना… अगदी तसेच. प्रेम, कमीटमेंट यावरचा तिचा विश्वास पाचोळ्यासारखा उडून गेला मागच्या तीन पावसाळ्यांत. इतका कि ज्या नात्यात प्रेम हा शब्द नसेल ते कुठलही नातं स्वीकारायला ती तयार होती. तिलाही तिच्यासारखाच कुणीतरी हवा होता. बस थांबली. ती उतरली आणि ccd पर्यंतच्या पाच मिनिटात सारे प्रश्न आणि उत्तरं यांची रिविजन झाली. मनातच. बाविसावा जे काही विचारेल ते “एकवीस अपेक्षित” मधूनच असणार याची तिला खात्री होती.
बरोब्बर सातच्या ठोक्याला ते समोरासमोर बसले.
” मी सुजय.”
” मी सानिका”
“वाह. सुजय सानिका शुभविवाह छान वाटेल न ऐकायला”
ती हसली आणि म्हणाली “शुभविवाह या शब्दात छान वाटेल असं काय आहे मित्रा…”
त्याने चमकून वर पाहिलं. तिच्या नजरेला नजर मिळवली. इतक्या स्पष्ट शब्दांमागच्या नजरेतली व्याकुळता त्याने सहज टिपली.
“मला म्हणायचं होतं आपली नावं छान वाटतील. शुभविवाह वगैरे बघू  नंतर.”
ती हसली. हा “एकवीस अपेक्षित” वाटत नाही  तिच्या मनाने हे टिपलं आणि त्यांच्या गप्पा खुलल्या. दीड तासांनी दोघेही उठले. तो म्हणाला, ” चल, तुला तुझ्या रूमपर्यंत सोडतो.
ती कारमध्ये बसली. दीड तास प्रचंड गप्पा मारणारे दोघे आता प्रचंड शांत होते. तिच्या रुमजवळ कार थांबली. ती उतरली दरवाज्याजवळ थांबली. त्याने काच खाली केली. ती म्हणाली,”Thanks.…  क्षणभर थांबली आणि त्याच्या नजरेला नजर देऊन म्हणाली, “प्रेमावर विश्वास आहे  तुझा? ” तो क्षणभर थांबला आणि म्हणाला,” माझा फक्त विश्वास आहे आजच्या क्षणावर. बस्स.” त्या क्षणात त्याच्या नजरेत दाटलेली व्याकुळता तिने सहजपणे टीपली. “चल येते” इतकं म्हणून ती निघाली.
रूमवर पोहोचली आणि आईला फोन केला. “आई, त्या ‘शुभमंगल’च्या ब्रोशर मधल्या आठव्या पानावरच्या खालून दुसर्या मुलाशी मी लग्न करतेय”
फोन ठेवून ती गच्चीत आली. आणि मोठ्ठ्या मोठ्ठ्या थेंबांचा पाउस तापलेल्या जमिनीवर आसुस्ल्यागत कोसळू  लागला.
तिच्याकडून होकार आला तेव्हा तो जरा हडबडलाच. प्रेम, शुभविवाह या गोष्टींवर विश्वास नसलेली मुलगी एका भेटीत होकार देईल कशी अशी साधी सरळ शंका त्याच्या मनाला स्पर्शून गेलीच. त्याला वाटलं या शंकेचं निरसन करून घ्यावंच पण मग त्याला जाणवलं, अनेकदा प्रश्न विचारून, उत्तरं शोधून आणि नको इतकी 'Clarity'घेऊनही शेवटी नाती तुटतातच. त्यापेक्षा काही प्रश्नांची उत्तरं, ते न विचारताच मिळालेली चांगली. तिच्या होकारात त्याने हो मिळवला आणि दोन्ही घरं तयारीला लागली.

लग्न ही कन्सेप्ट अजूनही तिच्या पचनी पडत नव्हतीच. नाइलाज म्हणा किंवा गरज म्हणा किंवा पहिल्या भेटीत मिळालेली आश्वस्तता म्हणा तिघांपैकी काहीतरी एक असावं ज्यामुळे तिने लग्नाला होकार दिलेला. तिचं तिलाच अजूनही काळात नव्हतं कि नक्की कुठल्या कारणाने तिच्या होकाराला ठामपणा आला. ''Wedding Planner"ने सुहागरात्रीसाठी सजवलेल्या बेड वर बसून तिच्या मनात असे असंख्य विचार येत होते. आपण लग्न का केलं याचं ठोस उत्तर तिला अजूनही मिळत नव्हतं. जगरहाटी नाकारण्याची हिंमत नव्हती म्हणून? निव्वळ एक मानसिक आणि कौटुंबिक गरज म्हणून ? की फक्त "Marriage is legitimate form of sex" इतका प्रक्टिकल विचार करून. तिला प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती आणि आज न उद्या तो हे प्रश्न विचारणारच याचीही तिला खात्री होती.

विचारांचा असा खेळ तिच्या मनात चाललेला असतानाच तो आत आला. सजवलेल्या बेडवर तिच्या बाजूला येउन बसला. काही क्षण प्रचंड शांततेत गेले. त्या शांततेचा भंग करत त्याने विचारलं, "मग, आता काय ? " निर्विकार चेहऱ्याने ती म्हणाली, "पुन्हा, तेच…" तो हसला. म्हणाला, "लग्नाची सोय त्यासाठीच तर केलेली असते." तिला काही सुचेना. ती म्हणाली, "म्हणजे तू पण फक्त त्याच गरजेसाठी लग्न केलंस?" तो शांतपणे म्हणाला, "नाही. Marriage is legitimate form of sex इतकं भयंकर मत नाहीये माझं." ती जराशी चपापली आणि जराशी हसली, म्हणाली, "पण मग तू काही माझं पहिल प्रेम वगैरेसुद्धा नाहीयेस". तो जरासा गंभीर झाला आणि म्हणाला,"हो ते ही खरंच. आपण काही एकमेकांचं पहिलं प्रेम वगैरे नाही. खरंतर दुसरं किंवा तीसरही नाही. पण आपलं लग्न तर पहिलं आहे ना". ती हसली म्हणाली "ते ही खरंच." "आणि प्रत्येक नवीन गोष्ट करून बघायचीच हा अट्टाहास आपल्या दोघांमध्ये आधीपासून आहेच." या त्याच्या वाक्यावर आणि त्यातल्या गर्भितार्थावर ती मनापासून हसली.

त्या रात्री फार प्रश्न न विचारता त्या दोघानाही बरीच उत्तरं मिळाली. फारशी 'Clean' नसली तरी त्यांच्या नात्याची सुरुवात तर नक्कीच झाली होती. कारण काही रात्रींमध्ये नाती घडवण्याची ताकद असते.

 
काही नाती काही रात्री (भाग तिसरा)



तिच्याकडून होकार आला तेव्हा तो जरा हडबडलाच. प्रेम, शुभविवाह या गोष्टींवर विश्वास नसलेली मुलगी एका भेटीत होकार देईल कशी अशी साधी सरळ शंका त्याच्या मनाला स्पर्शून गेलीच. त्याला वाटलं या शंकेचं निरसन करून घ्यावंच पण मग त्याला जाणवलं, अनेकदा प्रश्न विचारून, उत्तरं शोधून आणि नको इतकी 'Clarity'घेऊनही शेवटी नाती तुटतातच. त्यापेक्षा काही प्रश्नांची उत्तरं, ते न विचारताच मिळालेली चांगली. तिच्या होकारात त्याने हो मिळवला आणि दोन्ही घरं तयारीला लागली.

लग्न ही कन्सेप्ट अजूनही तिच्या पचनी पडत नव्हतीच. नाइलाज म्हणा किंवा गरज म्हणा किंवा पहिल्या भेटीत मिळालेली आश्वस्तता म्हणा तिघांपैकी काहीतरी एक असावं ज्यामुळे तिने लग्नाला होकार दिलेला. तिचं तिलाच अजूनही काळात नव्हतं कि नक्की कुठल्या कारणाने तिच्या होकाराला ठामपणा आला. ''Wedding Planner"ने सुहागरात्रीसाठी सजवलेल्या बेड वर बसून तिच्या मनात असे असंख्य विचार येत होते. आपण लग्न का केलं याचं ठोस उत्तर तिला अजूनही मिळत नव्हतं. जगरहाटी नाकारण्याची हिंमत नव्हती म्हणून? निव्वळ एक मानसिक आणि कौटुंबिक गरज म्हणून ? की फक्त "Marriage is legitimate form of sex" इतका प्रक्टिकल विचार करून. तिला प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती आणि आज न उद्या तो हे प्रश्न विचारणारच याचीही तिला खात्री होती.

विचारांचा असा खेळ तिच्या मनात चाललेला असतानाच तो आत आला. सजवलेल्या बेडवर तिच्या बाजूला येउन बसला. काही क्षण प्रचंड शांततेत गेले. त्या शांततेचा भंग करत त्याने विचारलं, "मग, आता काय ? " निर्विकार चेहऱ्याने ती म्हणाली, "पुन्हा, तेच…" तो हसला. म्हणाला, "लग्नाची सोय त्यासाठीच तर केलेली असते." तिला काही सुचेना. ती म्हणाली, "म्हणजे तू पण फक्त त्याच गरजेसाठी लग्न केलंस?" तो शांतपणे म्हणाला, "नाही. Marriage is legitimate form of sex इतकं भयंकर मत नाहीये माझं." ती जराशी चपापली आणि जराशी हसली, म्हणाली, "पण मग तू काही माझं पहिल प्रेम वगैरेसुद्धा नाहीयेस". तो जरासा गंभीर झाला आणि म्हणाला,"हो ते ही खरंच. आपण काही एकमेकांचं पहिलं प्रेम वगैरे नाही. खरंतर दुसरं किंवा तीसरही नाही. पण आपलं लग्न तर पहिलं आहे ना". ती हसली म्हणाली "ते ही खरंच." "आणि प्रत्येक नवीन गोष्ट करून बघायचीच हा अट्टाहास आपल्या दोघांमध्ये आधीपासून आहेच." या त्याच्या वाक्यावर आणि त्यातल्या गर्भितार्थावर ती मनापासून हसली.

त्या रात्री फार प्रश्न न विचारता त्या दोघानाही बरीच उत्तरं मिळाली. फारशी 'Clean' नसली तरी त्यांच्या नात्याची सुरुवात तर नक्कीच झाली होती. कारण काही रात्रींमध्ये नाती घडवण्याची ताकद असते.



(समाप्त)



-अभिषेक राउत.

Tuesday, November 4, 2014

Diwali to Diwali via Halloween



या दिवाळीलासुद्धा तो घरी यावा अशी त्यांची अपेक्षा नव्हतीच मुळी. त्याला तिकडे पाठवलं तेव्हा ज्या बऱ्याच तडजोडी कराव्या लागतात त्यातलीच ही एक तडजोड होती. त्याच्या आयुष्यातले पुढचे अनेक दिवाळसण सुखात जावे म्हणून आपल्या आयुष्यातले काही दिवाळसण त्याच्याशिवाय साजरे करण्याला त्यांची हरकत नव्हतीच. शिवाय आता इतकं काही अंतर जाणवत नाही. स्काइप, whatsapp , facebook सगळं बुडाशी असतं. पूर्वी रोज गप्पा व्हायच्या आता पंधरा दिवसांनी होतात.  त्याला  तिकडे जाउन आत्ताशी कुठे तीन वर्षं झालीयेत. स्थिरस्थावर झाला की आपणच जायचं तिकडे. पहिल्या फेरीत अमेरिका बघून घ्यायची. मग तोच इकडे येईल तेव्हा लग्न उरकून घ्यायचं. नंतर सुनेच्या डिलीवरी ला पुन्हा काही महिने जायचं. नंतर मग दर दोन वर्षांनी इकडून तिकडे , तिकडून इकडे करत रहायचं. भविष्याचं इतकं चोख प्लानिंग त्या अमेरिकन्सना सुद्धा जमणार नाही. लोक म्हणतात एकटेपणा येतो. कशाला येईल? आपणही स्वतःला कशात तरी गुंतवून घ्यायला हवं. मुलं जवळच हवीत हा हट्ट कशाला. भले दिवाळीत जमणार नाही पण जेव्हा भेटू तेव्हा दिवाळसण करू. "चिरंजीव येती घरा तोचि दिवाळी दसरा". स्वताशीच हसता हसता अचानक भरून का आलं ते मात्र त्यांना कळलं नाही.

चला नेहमीची वेळ झाली. त्याने laptop उघडून skype सुरु केलं. आज दिवाळी म्हणजे अख्खं 'गृहदर्शन' घडणार. दारातल्या रांगोळीपासून ते गॅलरीतल्या कंदिलापर्यंत. मग आपणही इकडच्या गंमती जमती सांगायच्या. गेले तीन वर्ष दिवाळी अशीच साजरी होते.M S झालं आता Ph D करायला घेतलीये म्हणजे सवय करून घ्यावीच लागणार. सणासुदीच्या दिवसात घरी जावसं वाटलंच तरी तिकिटांच्या किंमती आणि 'Advisor' या दोन गोष्टी पाय खेचून धरतात.    'FedEx' च्या कृपेने फराळ वेळेत पोहोचतो. सोबत सगळे भारतीयच मग पणत्यांची आरास, कंदील, सजावट इतकंच काय दिवाळी पहाटचे कार्यक्रम  सुद्धा होतात. सगळं निवांत मजेत असतं. तरीही काहीतरी 'missing ' वाटत राहतं. ते काही त्याला कळत नाही आणि तो समजून घेण्याच्या फंदात पडत नाही. चांगलं अर्धा तास तो मम्मी-पप्पांशी बोलतो त्यांचे आनंदी चेहरे त्याला नवीन उत्साह देउन जातात.

"This year we are celebrating halloween with granny" याला मेसेज आला. काय गंमत आहे ह्यांची 'सर्वपित्री' आणि आपली दिवाळी अशी पुढेमागे. तेवढंच अजून एक सेलिब्रेशन. विश्वाचे नागरिक असण्याचा फायदा.

ग्रॅनीचा  उत्साह ओसंडून वाहत होता. शेवटचा भोपळा कोरून झाला. छोटीशी बाहुली त्याच्या बाजूला उभी राहिली. आता छोटीशी पार्टी आणि मग डिनर. अख्खा दिवस ग्रॅनीची धावपळ चाललेली. या सगळ्यांच्या बरोबरीने. ग्रॅनी म्हणजे याच्या मित्राची  'host mother '. साठीचं प्रसन्न व्यक्तिमत्त्व. उत्साह, आस्था, प्रेम आणि आसोशी यांचं जिवंत उदाहरण.ग्रॅनीसोबत सगळ्यांनाच धमाल यायची. गोष्टी,किस्से आणि गप्पा. दोन मुलं नोकरी निमित्ताने बाहेर आणि मुलगी लग्न होऊन सासरी गेलेली. ग्रॅनी एकटी निवांत रहायची. आपल्या प्रेमळ स्वभावाने ती या सगळ्याच मुलांच्या जिव्हाळ्याचा विषय झाली होती.

'' Yo  ग्रॅनी, let's click a pic !!!" म्हणत त्याने छानशी पोझ दिली. ग्रॅनीच्या हसण्याने अख्खी फ्रेम भरून गेली. त्याने फोटो ग्रॅनीला दाखवला. ती खुश झाली. कुठल्याशा कृतार्थतेने तिने त्याला जवळ घेतलं आणि म्हणाली "such a sweet pic my boy". त्याने फोटो पुन्हा पहिला. तिचं हसणं फोटोभर पसरलेलं पण म्हणून पापणीआडचा इवलासा थेंब लपत नव्हता. त्याच्या मनात विचार आला, काय वाटत असेल ग्रॅनीला असं एकटं राहताना, मुलांसोबत निवांत गप्पा माराव्यात, नातवंडासोबत भोपळा 'carve' करावा असं तिलाही वाटत असणारच की आणि अचानक त्याला मम्मी-पप्पा आठवले. ऐन दिवाळीत उजळून गेलेलं पण तरीही रिकामं घर आठवलं. त्याने तडक घरी फोन लावला. पलीकडे मम्मी होती. "काय झालं रे, ही तर नेहमीची वेळ नाही तुझी, आज अचानक फोन?". याला काय बोलावं सुचेना. इतक्यात पप्पाने फोन घेतला हातात "काय रे काही प्रॉब्लेम?". हा अजूनही शांतच. पप्पा हसला आणि म्हणाला, " अरे आमची काळजी नको करूस. इतक्या आवेगाने फोन केला आहेस त्यातूनच कळतंय, दूरदेशी आहेस खरा पण अजून दूर नाही गेलायेस आमच्यापासून."

त्याला क्षणार्धात हायसं वाटलं. तो ग्रॅनीकडे गेला. तिला नमस्कार केला आणि म्हणाला "दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ."

 - अभिषेक राऊत 

Wednesday, October 22, 2014

अॅश-ट्रे


उनकलत्या दुपारची वेळ असते. उजव्या बाजूच्या खिडकीतून येणारी उन्हाची तिरीप टेबलावर विखुरलेल्या कागदांशी खेळत असते. सकाळपासून काहीतरी लिहिण्याचा चाललेला प्रयत्न, विखुरलेल्या कागदांतून, थंड झालेल्या कॉफी मधून आणि भरत चाललेल्या अॅश-ट्रे मधून जाणवत राहतो. काहीच सुचत नसतं. विचारांची आवर्तनं मुक्तछंदात फिरत राहतात पण कागदावर उमटत नाहीत. वाफाळत्या कॉफीचं कधीच गोमूत्र झालेलं असतं. आता लिहायचंच या निश्चयाने  एक कोरा करकरीत कागद ओढून तुम्ही सुरुवात तर करता पण विचार आणि शब्द हातात हात गुंफून येतच नाहीत. दिवसभर चाललेला त्यांचा लपाछपीचा खेळ तसाच चालू राहतो. तुम्ही वैतागता. उजव्या हातातलं पेन तसंच ठेवून डाव्या हाताने सिगरेटचं पाकीट शोधता. आज काही सुचतच नाहीये या तरमरीत तुम्ही ती शिलगवता. दोन तीन लांबलचक कश घेता. तिच्या टोकाशी आता  अॅश जमा होते. अस्ताव्यस्त टेबलावर कोपऱ्यात गेलेला अॅश-ट्रे तुम्ही खेचून जवळ घेता, आणि तुमच्या लक्षात येतं, कागद रिकामे राहिलेत पण दिवसभरात अॅश-ट्रे मात्र भरून गेलाय.

अक्ख्या अॅश-ट्रे मध्ये विखुरलेली सिगारेटची थोटकं, राख आणि मगाशी विझवलेल्या सिगारेटचा धुगधुगणारा धूर. किती काय काय असतं त्या भरलेल्या अॅश-ट्रे मध्ये. काही सिगारेटी पूर्ण अगदी फिल्टरपर्यंत ओढून ओठाला चटका लागल्यावर विझवलेल्या. काही अर्धवट मध्येच खुडून टाकलेल्या. काही घाईघाईत संपवलेल्या. काही दुसऱ्या ब्रान्डच्या, न झेपलेल्या आणि म्हणून लगेचच विझवलेल्या. काही महागड्या तर काही सध्या. शेवटी धूर होऊन राखेत झोपून राहिलेल्या. विखुरलेल्या थोटकांनी भरलेल्या  अॅश-ट्रे वरून निघून तुमची नजर टेबलवर स्थिरावते.

टेबलावरही विखुरलेल्या कागदांचा पसारा. एकेक कागद म्हणजे जणू एकेक विचार. काही अर्धवट सोडून  चुरगाळून टाकलेले. काही अगदी शेवटपर्यंत लिहिलेले पण शेवट मनासारखा होईना म्हणून ठेवून दिलेले. काही घाईघाईत खरडायचे म्हणून खरडलेले आणि मग मनासारखे झाले नाहीत म्हणून फेकून दिलेले. काही विचार नुसते क्षणभर आलेले म्हणून कागदावर उतरवलेले आणि मग पुन्हा विस्कटून गेलेले. काही न झेपणारे विचार वेगळ्याच ब्रांडच्या सिगारेटीसारखे त्यांचाही चुराडा करून फेकलेला. बघता बघता अक्खा टेबल म्हणजे विचारांचा अॅश-ट्रे होऊन जातो. सगळे विचार शब्दांचा धूर करून कागदांच्या राखेत झोपून गेल्यागत दिसू लागतात.

विचारांच्या त्या अॅश-ट्रे वरून तुमची नजर हटते आणि डाव्या बाजूच्या हातभार उंचीच्या आरशाकडे जाते. तुमची नजर असे अनेक अॅश-ट्रे शोधत राहते. आयुष्यात येणारे लोक. असेच विखुरलेले. काही तुमच्या 'loyal' ब्रांड सारखे शेवटपर्यंत सोबत देणारे. प्रत्येक कश सोबत रंगतदार होत जाणारे. काही तुम्ही मध्येच खुडून टाकलेले. काही नुसतेच क्षणभर आलेले पण कायमची 'kick ' देऊन गेलेले. काहींसोबत जमलंच नाही तुमचं जणू काही तुमच्या ब्रान्डचे नव्हतेच ते. असे अनेक तुमच्या आयुष्यभर विखुरलेले. आयुष्याच्या भव्य अॅश-ट्रे मध्ये त्यांच्या आठवणींची राख उरलेली असते आणि तुम्ही त्यांच्यासोबत घालवलेले क्षण कधीच धुरासारखे दूर दूर गेलेले असतात.

अजून एक दिवस संपलेला असतो आणि अजून एक अॅश-ट्रे  भरून गेलेला असतो.

-अभिषेक राऊत. 

Tuesday, October 14, 2014

" सत्तेचे स्वयंवर "


" सत्तेचे स्वयंवर "


आज तिच्या लग्नाचा दिवस. गेले पंधरा दिवस तिच्या लग्नाची तयारी सुरु होती. धावपळ, गडबड , गोंधळ आणि कार्य तडीस नेण्याची इच्छा. हे सगळं करायचं तिच्यावरच्या प्रेमापोटी. खरं तर तिचं रंगरूप इतकं खास नाही पण एकदा का हिचं लग्न झालं की आपल्या आयुष्यात आलेल्या  व्यक्तीचं रंगरूप आणि बरंच काही ही बदलवून टाकते. त्यामुळे हिच्याशी लग्न करायला उत्सुक असणाऱ्यांची संख्या बरीच. "एक अनार और सौ बीमार " असं म्हणा हवं तर. अशा परिस्थितीत काय करायचं हे आमच्या पुराणांमध्ये सांगून ठेवलंय. अशा वेळी एकच उपाय आणि तो म्हणजे "स्वयंवर".

स्वयंवर म्हटलं की एकमेकांना शह-काटशह देणारे धुरंधर आले. नवनव्या युक्त्या-प्रयुक्त्यांनी तिच्यावर आणि तिच्या मायबापावर मोहिनी घालणारे जादुगार आले. या देशात मुलीचा होकार मिळवायचा असेल तर आधी तिच्या मायबापांनी तुमचा स्वीकार करणे गरजेचं असतं. त्यामुळे स्वयंवर तिचं असलं तरी तिच्या मायबापाला खुश करण्यावर प्रत्येकाचा भर. गेले पंधरा दिवस फक्त तिचा विचार करणाऱ्या साऱ्याच धुरंधर वीरांसाठी आजचा स्वयंवराचा दिवस म्हणजे फारच महत्व्वाचा.

एका भव्य मंडपात हे सगळे धुरंधर जमलेले. काही जण गुडघ्याला बाशिंग बांधूनच आलेले. काही फारच 'confident'. त्यांना म्हणे घराण्यातूनच परंपरेने स्वयंवर जिंकण्याच ट्रेनिंग मिळालेलं असतं. काही जण नुसते हौशे 'लग्न पाहावं करून' म्हणून आलेले. काही सच्चे प्रियकर ह्यांच्याकडे तिच्या मायबापांना देण्यासाठी काही नसतं पण तत्त्वांची आणि प्रेमाची ताकद असते. काही उपेक्षित पण मग त्यांना फार काळ थांबवत नाहीत त्यांचे मंडप राखीव आणि वेगळे असतात म्हणे.

 गेले पंधरा दिवस त्यातल्या प्रत्येकाने दौलतजादा केलेली असते . काहींनी तिच्या मायबापाला पैसे, साडी-चोळी , खण -नारळ दिलेला असतो . काहींनी मोबाईल फोन, टी.वी. ते अगदी केबल कनेक्शन घेऊन दिलेलं असतं . काहींनी तिच्या मायबापांनाच नव्हे तर अक्ख्या भावकीत जेवणावळी आणि दारू पार्ट्या दिलेल्या असतात. काहींनी भविष्याची सुंदर चित्रं रंगवलेली असतात . काहींनी नुसतेच शब्दाचे खेळ खेळलेले असतात तर काहींनी स्वयंवराच्या धामधुमीत आपली स्वताची धन करून घेतलेली असते. प्रथेप्रमाणे सगळं घडतं. फटाक्यांच्या लडी फुटतात, दारूच्या नद्या वाहतात, गुलालाच्या रंगात आसमंत न्हाउन निघतो. प्रतिस्पर्ध्यावर मात करत तिला घरी घेऊन जाणारा एकच असतो. तिला जिंकल्याच्या उन्मादात आता तिचं कन्यादान करणाऱ्या तिच्या  मायबापांचा सोयीस्कर विसर पडणार असतो.

तिचं नाव असतं सत्ता. तिच्या मायबापाला आम्ही जनता म्हणतो आणि स्वयंवराच्या या सोहळ्याला निवडणूक. राजेशाहीने घालून दिलेली स्वयंवराची ही पद्धत आम्ही गेली ६५ वर्षं पाळतोय कारण त्यामुळेच आमची लोकशाही जिवंत आहे सुद्रुढ आणि ठणठणीत नसली तरी.

- अभिषेक राऊत 

Tuesday, September 30, 2014

तिची ओळख




तिची ओळख


"वैनी , नमस्कार.!!!" म्हणत ५-१० कार्यकर्त्यांचा घोळका दिवाणखान्यात येउन स्थिरावला. वहिनींनी सुद्धा हसून नमस्कार केला. "दादा येताहेत, चहा आणि नाश्ता केल्याशिवाय निघू नका" असं म्हणत त्यांची पावलं स्वैपाकघराकडे वळली. चहा आणि नाश्ता दिवाणखान्यात न्यायला सांगून त्या दादांच्या बेडरूमकडे निघाल्या. दादांची तयारी पूर्ण होत होती. नेहरू जाकीटाचं शेवटचं बटन लावून त्यांनी हात पुढे केला. वाहिनी लगबगीने पुढे सरसावल्या. खणातून काढलेल्या पांढऱ्याशुभ्र रुमालावर अत्तराचे दोन थेंब लावून त्यांनी तो दादांच्या हातात दिला. "बाहेर कार्यकर्ते…. " वाहिनीचं वाक्य पूर्ण होण्याआधीच दादा बेडरूमबाहेर पडले होते. दोन क्षण वाहिनी बेडवर बसल्या, आणि कालची संध्याकाळ त्यांच्या डोळ्यांसमोर तरळली.

महाराष्ट्रातल्या अग्रगण्य 'management college' च्या माजी विद्यार्थ्यांचा भेट सोहळा. पंचतारांकित वातावरण, जवळपास १० वर्षानंतर भेटताना असलेलं कुतूहल, उत्सुकता आणि आपण साधलेल्या आर्थिक आणि भौतिक प्रगतीच्या गप्पा आणि तयार केलेल्या स्वताच्या ओळखीचं कौतुक. अशी भरगच्च संध्याकाळ. काल आपल्या 'batchmates'ना भेटताना, त्यांचे 'visiting cards' घेताना वहिनींना जाणवलं, आपणही काही वर्षांपूर्वी ह्यांच्यातलेच होतो मग आपली ओळख हरवलीये का? आणि त्यांना जाणवलं, आपण इथे आलो तेव्हाही 'कुणाचीतरी मुलगी' होतो आणि आज 'कुणाचीतरी बायको' आहोत. मुलगी ते वाहिनी या प्रवासात आपल्यातली 'ती' कुठेतरी हरवलीये.

 ह्याला सुरुवात कदाचित त्या दिवसापासून झाली असावी.  त्यांना लक्ख्पणे तो दिवस आठवला. गणपतराव देशमुख म्हणजे तिचे डॅडी. त्या दिवशी विधानसभेत 'स्त्री सबलीकरण' या विषयावर घणाघाती भाषण देऊन आले होते. ती सुद्धा कमालीची खुश होती. लवकरच नामांकित कंपनीत नोकरीचं स्वप्न तिने पाहिलेलं. त्याच दिवशी गणपतरावांनी तिच्या समोर लग्नाचा विषय काढला आणि तिच्या आयुष्यात दादांची एन्ट्री झाली. युवराजदादा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील साखरसम्राट शंकरराव मोहित्यांचे सुपुत्र. कर्तृत्व शून्य असलं तरी वडिलांची पुण्याई आणि पैसा यामुळे त्यांचं राजकीय भवितव्य उज्ज्वल होतं.
गणपतारावांसाठी हे लग्न म्हणजे एक राजकीय सोय होती. विधानसभेतून लोकसभेत जाण्याच्या तयारीसाठीची सोय. तिने विरोध केला पण पप्पांपुढे तो टिकला नाही. कुणाला किती स्वातंत्र्य कसं द्यावं हे घरातला कर्ता 'पुरुष' या नात्याने गणपतरावांनीच ठरवलं. आता तिची ओळख बदलली. ती वैनी झाली. 'दादांची बायको' म्हणून तिला लोक ओळखायला लागले. महिला दिनाच्या समारंभात दादांच्या बाजूला बसून ती स्त्री स्वातंत्र्यावर दोन शब्द दरवर्षी  बोलायची. नव्या ओळखीला ती सरावली होती. तिची विरोधाची धार बोथट झाली होती
पण कालच्या त्या सोहळ्याने तिला हलवून हलवून जागं केलं. कुठल्यातरी निश्चयाने ती उठली आणि बेडरूममधलं आपलं कपाट उघडलं. पार आत ठेवलेली एक बॅग काढली. तिच्यावरची धूळ झटकली. जणू त्या बॅगेत ती स्वतालाच पाहात होती. त्यामध्ये होत्या तिच्या 'achievements'. एक गोल्ड मेडल, 'Best Leader 'ची ट्रॉफी आणि सगळ्यात आत तिचं 'degree certificate '.  गोल्डन इम्बोसिंग केलेल्या नावावरून तिने हात फिरवला आणि मनाशी एक निश्चय केला.

आता तिला स्वतःचा प्रवास स्वतः करायचा होता. स्वतःची ओळख स्वतः निर्माण करायची होती. कुणाच्याही विरोधाला न जुमानता. दोन वर्षाच्या M B A  मध्ये शिकवलेल्या बऱ्याचशा गोष्टी आता तिला 'apply' करायला लागणार होत्या. कुठल्याशा निर्धाराने तिने लॅपटाॅप काढला आणि रेझ्युमे बनवायला घेतला. घरातल्या विरोधाचं 'SWOT Analysis ' ही तिची पुढची स्टेप असणार होती. मुलगी आणि वाहिनी या पलीकडे जाऊन स्वतःची ओळख तयार करण्याच्या मार्गावर तिचा प्रवास सुरु झाला होता.

-अभिषेक राऊत