Thursday, September 25, 2014

तिच्या स्तनांची गोष्ट !!!!




तिच्या स्तनांची गोष्ट !!!!


मला खात्री आहे की आजच्या लेखाचं नाव वाचून पुरुष आणि स्त्रियांच्या प्रतिक्रिया  पुढीलप्रमाणे असतील.
पुरुष
१) बरेचसे पुरुष नाव वाचून दुर्लक्ष केल्यासारखे करतील  त्याच वेळी लिंक मात्र सेव  करून ठेवतील,  सवडीने वाचायला.
२) काही पुरुष नाव वाचतील, इकडेतिकडे पाहतील , फारसं कुणाचं लक्ष नाही पाहून लेख वाचायला घेतील.
३) काही पुरुष नाव वाचूनच इतके उल्हसित होतील कि ते आजूबाजूच्या चार पुरुषांना  बोलावतील  आणि मग पाच जण मिळून लेख वाचतील.

स्त्रिया
१) काही स्त्रिया नाव वाचूनच शक्यतो नाक मुरडतील आणि पुढच्या लेखाची वाट पाहतील.
२) काही स्त्रिया लेखाच्या नावावरून मत बनवतील आणि वाचतील.
३) काही स्त्रिया एकूणच विषय फार बूर्झ्वा असल्याचे भासवतील.

किंवा कदाचित यापैकी काहीही होणार नाही आणि फारच 'maturity'ने माझा हा लेख वाचला जाईल. अर्थात काहीही असलं तरी इतर लेखांपेक्षा पाचपन्नास वाचक या लेखाला जास्तच लाभतील. असो. हे सगळं आठवायचं कारण एका आघाडीच्या इंग्रजी वृत्तपत्राने छापलेला फोटो, त्यावर आघाडीच्या अभिनेत्रीची प्रतिक्रिया  आणि एकूणातच स्त्रीस्वातंत्र्य, स्तन आणि प्रसारमाध्यमे यांची झालेली बाचाबाची.

मुळात आपल्याकडे जी गोष्ट नाही त्याचं आकर्षण असणं हे मनुष्यस्वभावाचं एक लक्षण. जी गोष्ट आपल्याकडे आहे पण इतरांकडे नाही ती सर्वांना दाखवणं हे मनुष्यस्वभावाचं दुसरं लक्षण. आता ह्या लक्षणांची अवलक्षण होऊ न देणं हे एक सामाजिक प्राणी म्हणून मनुष्याचं काम. समाज म्हटलं कि बंधनं आली, बंधनं  आली की ती झुगारून देण्याची वृत्ती आली आणि त्या पाठोपाठ स्वातंत्र्याची  आरोळी सुद्धा आली. अर्थात बंधनांची सुद्धा गंमतच आहे. शक्यतोवर आपण सोडून सर्वांनी बंधनं पाळावीत असं आपल्याला वाटतं. म्हणून  मग वृत्तपत्राने 'cleavage' चे फोटो न छापून  बंधन पाळावं, अभिनेत्रीने 'cleavage' न दाखवून बंधन पाळावं, पण आम्ही मात्र आमच्या नजरांवर बंधनं घालणार नाही कारण काय पाहावं याचं आम्हाला स्वातंत्र्य आहे. हाच विचार त्या अभिनेत्रीनेही केला. माझ्या शरीराचा कुठला भाग कुठे , केव्हा आणि कसा दाखवावा याचा अधिकार माझा आहे. इतकं स्पष्ट मत मांडून समाजाची बंधनं झुगारणं तसं एखाद्या स्त्रीसाठी अवघडंच. साहजिकच या एका कृतीने तिने जणू काही स्त्रीस्वातंत्र्याला वाचाच फोडली. साहजिकच आमच्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे फक्त बंधनातून मुक्तता. प्रसारमाध्यमानीही स्पष्टपणे सांगितलं, उघड्या डोळ्यांना जे दिसलं ते आम्ही फोटोत दाखवलं. आणि तसंही स्वातंत्र्याचा मक्ता ह्या स्वयंघोषित माध्यमांनी फार पूर्वीच घेऊन ठेवलाय. तर असं हे सगळं दोन स्तनंभोवती फिरता फिरता वैयक्तिक, सामाजिक आणि व्यावसायिक स्वातंत्र्यापर्यंत येउन पोचलं. कदाचित बंधनांतून मुक्तता म्हणजे स्वातंत्र्य नाहीच. मला कधीकधी वाटतं स्वातंत्र्याची आमची व्याख्याच चुकीची आहे. जबाबदारीची जाणीव म्हणजे खरं स्वातंत्र्य आहे. मुक्तपणे चालत राहणं हे स्वातंत्र्य नसून कुठे थांबायचं हे कळणं हे स्वातंत्र्य आहे. अर्थातच हे आपल्याला कळत नाही आणि मग अशा गोष्टी घडतात.

आदिशक्तीच्या महोत्सवाला सुरुवात होत असताना, स्वातंत्र्याचा हा नवा अर्थ  माध्यमांना, पुरुषांना आणि अर्थातच स्त्रियांनाही गवसला तरच तिच्या स्तनांची गोष्ट सुफळ संपूर्ण ठरेल असं म्हणायला हरकत नाही.

-अभिषेक राऊत 

No comments:

Post a Comment