सुर्य झुकतो पश्चिमेला , रंग लाल आभाळभर
संपतो दिवस आणि , आठवण तुझीच रात्रभर
पक्ष्यांचे रेखीव थवे, लागती घरट्यांच्या वाटेला
पावले माझी तरीही का पडती तुझ्याच दिशेला
क्षितिजाच्या पल्याड सूर्य , सरकू लागतो कलेकलेने
अन ओठांवर हळूच येते, तुझ्या माझ्या विरहाचे गाणे
सांज अशी विरघळते , निळ्याशार नदीच्या पल्याड
वाहत जात्या नदीला केवळ पाहत राहते एकाकी झाड
आशा सांज वेळी सुटे गार वारा, अंगभर तुझा शहारा
आवरुनी ऊरला पसारा, मी शोधतो एकाकी निवारा
तुझ्याच डोळ्यांतली माझी स्वप्नं, या वाऱ्यात वितळली
शपथ आपल्या सोबतीची , संधिप्रकाशात धूसरली…
असे काही ठाम, पक्के आता तुझे माझे उरले नाही
आणि तरीही तुझेच नाव , का माझ्या कवितेत येत राही
- अभिषेक राऊत
No comments:
Post a Comment