Tuesday, September 30, 2014

तिची ओळख




तिची ओळख


"वैनी , नमस्कार.!!!" म्हणत ५-१० कार्यकर्त्यांचा घोळका दिवाणखान्यात येउन स्थिरावला. वहिनींनी सुद्धा हसून नमस्कार केला. "दादा येताहेत, चहा आणि नाश्ता केल्याशिवाय निघू नका" असं म्हणत त्यांची पावलं स्वैपाकघराकडे वळली. चहा आणि नाश्ता दिवाणखान्यात न्यायला सांगून त्या दादांच्या बेडरूमकडे निघाल्या. दादांची तयारी पूर्ण होत होती. नेहरू जाकीटाचं शेवटचं बटन लावून त्यांनी हात पुढे केला. वाहिनी लगबगीने पुढे सरसावल्या. खणातून काढलेल्या पांढऱ्याशुभ्र रुमालावर अत्तराचे दोन थेंब लावून त्यांनी तो दादांच्या हातात दिला. "बाहेर कार्यकर्ते…. " वाहिनीचं वाक्य पूर्ण होण्याआधीच दादा बेडरूमबाहेर पडले होते. दोन क्षण वाहिनी बेडवर बसल्या, आणि कालची संध्याकाळ त्यांच्या डोळ्यांसमोर तरळली.

महाराष्ट्रातल्या अग्रगण्य 'management college' च्या माजी विद्यार्थ्यांचा भेट सोहळा. पंचतारांकित वातावरण, जवळपास १० वर्षानंतर भेटताना असलेलं कुतूहल, उत्सुकता आणि आपण साधलेल्या आर्थिक आणि भौतिक प्रगतीच्या गप्पा आणि तयार केलेल्या स्वताच्या ओळखीचं कौतुक. अशी भरगच्च संध्याकाळ. काल आपल्या 'batchmates'ना भेटताना, त्यांचे 'visiting cards' घेताना वहिनींना जाणवलं, आपणही काही वर्षांपूर्वी ह्यांच्यातलेच होतो मग आपली ओळख हरवलीये का? आणि त्यांना जाणवलं, आपण इथे आलो तेव्हाही 'कुणाचीतरी मुलगी' होतो आणि आज 'कुणाचीतरी बायको' आहोत. मुलगी ते वाहिनी या प्रवासात आपल्यातली 'ती' कुठेतरी हरवलीये.

 ह्याला सुरुवात कदाचित त्या दिवसापासून झाली असावी.  त्यांना लक्ख्पणे तो दिवस आठवला. गणपतराव देशमुख म्हणजे तिचे डॅडी. त्या दिवशी विधानसभेत 'स्त्री सबलीकरण' या विषयावर घणाघाती भाषण देऊन आले होते. ती सुद्धा कमालीची खुश होती. लवकरच नामांकित कंपनीत नोकरीचं स्वप्न तिने पाहिलेलं. त्याच दिवशी गणपतरावांनी तिच्या समोर लग्नाचा विषय काढला आणि तिच्या आयुष्यात दादांची एन्ट्री झाली. युवराजदादा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील साखरसम्राट शंकरराव मोहित्यांचे सुपुत्र. कर्तृत्व शून्य असलं तरी वडिलांची पुण्याई आणि पैसा यामुळे त्यांचं राजकीय भवितव्य उज्ज्वल होतं.
गणपतारावांसाठी हे लग्न म्हणजे एक राजकीय सोय होती. विधानसभेतून लोकसभेत जाण्याच्या तयारीसाठीची सोय. तिने विरोध केला पण पप्पांपुढे तो टिकला नाही. कुणाला किती स्वातंत्र्य कसं द्यावं हे घरातला कर्ता 'पुरुष' या नात्याने गणपतरावांनीच ठरवलं. आता तिची ओळख बदलली. ती वैनी झाली. 'दादांची बायको' म्हणून तिला लोक ओळखायला लागले. महिला दिनाच्या समारंभात दादांच्या बाजूला बसून ती स्त्री स्वातंत्र्यावर दोन शब्द दरवर्षी  बोलायची. नव्या ओळखीला ती सरावली होती. तिची विरोधाची धार बोथट झाली होती
पण कालच्या त्या सोहळ्याने तिला हलवून हलवून जागं केलं. कुठल्यातरी निश्चयाने ती उठली आणि बेडरूममधलं आपलं कपाट उघडलं. पार आत ठेवलेली एक बॅग काढली. तिच्यावरची धूळ झटकली. जणू त्या बॅगेत ती स्वतालाच पाहात होती. त्यामध्ये होत्या तिच्या 'achievements'. एक गोल्ड मेडल, 'Best Leader 'ची ट्रॉफी आणि सगळ्यात आत तिचं 'degree certificate '.  गोल्डन इम्बोसिंग केलेल्या नावावरून तिने हात फिरवला आणि मनाशी एक निश्चय केला.

आता तिला स्वतःचा प्रवास स्वतः करायचा होता. स्वतःची ओळख स्वतः निर्माण करायची होती. कुणाच्याही विरोधाला न जुमानता. दोन वर्षाच्या M B A  मध्ये शिकवलेल्या बऱ्याचशा गोष्टी आता तिला 'apply' करायला लागणार होत्या. कुठल्याशा निर्धाराने तिने लॅपटाॅप काढला आणि रेझ्युमे बनवायला घेतला. घरातल्या विरोधाचं 'SWOT Analysis ' ही तिची पुढची स्टेप असणार होती. मुलगी आणि वाहिनी या पलीकडे जाऊन स्वतःची ओळख तयार करण्याच्या मार्गावर तिचा प्रवास सुरु झाला होता.

-अभिषेक राऊत 

Thursday, September 25, 2014

तिच्या स्तनांची गोष्ट !!!!




तिच्या स्तनांची गोष्ट !!!!


मला खात्री आहे की आजच्या लेखाचं नाव वाचून पुरुष आणि स्त्रियांच्या प्रतिक्रिया  पुढीलप्रमाणे असतील.
पुरुष
१) बरेचसे पुरुष नाव वाचून दुर्लक्ष केल्यासारखे करतील  त्याच वेळी लिंक मात्र सेव  करून ठेवतील,  सवडीने वाचायला.
२) काही पुरुष नाव वाचतील, इकडेतिकडे पाहतील , फारसं कुणाचं लक्ष नाही पाहून लेख वाचायला घेतील.
३) काही पुरुष नाव वाचूनच इतके उल्हसित होतील कि ते आजूबाजूच्या चार पुरुषांना  बोलावतील  आणि मग पाच जण मिळून लेख वाचतील.

स्त्रिया
१) काही स्त्रिया नाव वाचूनच शक्यतो नाक मुरडतील आणि पुढच्या लेखाची वाट पाहतील.
२) काही स्त्रिया लेखाच्या नावावरून मत बनवतील आणि वाचतील.
३) काही स्त्रिया एकूणच विषय फार बूर्झ्वा असल्याचे भासवतील.

किंवा कदाचित यापैकी काहीही होणार नाही आणि फारच 'maturity'ने माझा हा लेख वाचला जाईल. अर्थात काहीही असलं तरी इतर लेखांपेक्षा पाचपन्नास वाचक या लेखाला जास्तच लाभतील. असो. हे सगळं आठवायचं कारण एका आघाडीच्या इंग्रजी वृत्तपत्राने छापलेला फोटो, त्यावर आघाडीच्या अभिनेत्रीची प्रतिक्रिया  आणि एकूणातच स्त्रीस्वातंत्र्य, स्तन आणि प्रसारमाध्यमे यांची झालेली बाचाबाची.

मुळात आपल्याकडे जी गोष्ट नाही त्याचं आकर्षण असणं हे मनुष्यस्वभावाचं एक लक्षण. जी गोष्ट आपल्याकडे आहे पण इतरांकडे नाही ती सर्वांना दाखवणं हे मनुष्यस्वभावाचं दुसरं लक्षण. आता ह्या लक्षणांची अवलक्षण होऊ न देणं हे एक सामाजिक प्राणी म्हणून मनुष्याचं काम. समाज म्हटलं कि बंधनं आली, बंधनं  आली की ती झुगारून देण्याची वृत्ती आली आणि त्या पाठोपाठ स्वातंत्र्याची  आरोळी सुद्धा आली. अर्थात बंधनांची सुद्धा गंमतच आहे. शक्यतोवर आपण सोडून सर्वांनी बंधनं पाळावीत असं आपल्याला वाटतं. म्हणून  मग वृत्तपत्राने 'cleavage' चे फोटो न छापून  बंधन पाळावं, अभिनेत्रीने 'cleavage' न दाखवून बंधन पाळावं, पण आम्ही मात्र आमच्या नजरांवर बंधनं घालणार नाही कारण काय पाहावं याचं आम्हाला स्वातंत्र्य आहे. हाच विचार त्या अभिनेत्रीनेही केला. माझ्या शरीराचा कुठला भाग कुठे , केव्हा आणि कसा दाखवावा याचा अधिकार माझा आहे. इतकं स्पष्ट मत मांडून समाजाची बंधनं झुगारणं तसं एखाद्या स्त्रीसाठी अवघडंच. साहजिकच या एका कृतीने तिने जणू काही स्त्रीस्वातंत्र्याला वाचाच फोडली. साहजिकच आमच्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे फक्त बंधनातून मुक्तता. प्रसारमाध्यमानीही स्पष्टपणे सांगितलं, उघड्या डोळ्यांना जे दिसलं ते आम्ही फोटोत दाखवलं. आणि तसंही स्वातंत्र्याचा मक्ता ह्या स्वयंघोषित माध्यमांनी फार पूर्वीच घेऊन ठेवलाय. तर असं हे सगळं दोन स्तनंभोवती फिरता फिरता वैयक्तिक, सामाजिक आणि व्यावसायिक स्वातंत्र्यापर्यंत येउन पोचलं. कदाचित बंधनांतून मुक्तता म्हणजे स्वातंत्र्य नाहीच. मला कधीकधी वाटतं स्वातंत्र्याची आमची व्याख्याच चुकीची आहे. जबाबदारीची जाणीव म्हणजे खरं स्वातंत्र्य आहे. मुक्तपणे चालत राहणं हे स्वातंत्र्य नसून कुठे थांबायचं हे कळणं हे स्वातंत्र्य आहे. अर्थातच हे आपल्याला कळत नाही आणि मग अशा गोष्टी घडतात.

आदिशक्तीच्या महोत्सवाला सुरुवात होत असताना, स्वातंत्र्याचा हा नवा अर्थ  माध्यमांना, पुरुषांना आणि अर्थातच स्त्रियांनाही गवसला तरच तिच्या स्तनांची गोष्ट सुफळ संपूर्ण ठरेल असं म्हणायला हरकत नाही.

-अभिषेक राऊत 

Thursday, September 18, 2014

जॉनी वॉकर!!!


जॉनी वॉकर!!!

काळ्या स्क्रीनवर शेवटची कमांड लिहून त्याने एंटर दाबलंगेले दीड तास चाललेला प्रॉब्लेम सुटला. आता 'appreciation mail ' येईल. "Weekly Achievers" मध्ये नाव आणि फोटो येईल आणि बाकी सर्व मागच्या पानावरून पुढे सुरु राहील. त्याने डोळे मिटले आणि आळस दिला. मागची काही वर्ष झरझर त्याच्या डोळ्यांसमोर आली. आपल्याला काय करायचंय या प्रश्नाचं उत्तर सापडेपर्यंत एका IT कंपनीत येउन तो स्थिरावला होता. वेगवेगळ्या शिफ्ट्स मध्ये येउन क्लायंटच्या नेटवर्कची देखभाल करायची हे त्याचं काम. नक्की काय करायचंय हे माहीत नसणं आणि जे करत आहोत ते आवडत नसणं हे ऐन पंचविशीतले दोन प्रॉब्लेम्स त्यालाही सतावत होते. आणि या साऱ्याच्या मध्यात आज बऱ्याच दिवसांनी आपल्यासाठी "appreciation mail" येणार ही गोष्ट सुखावणारी होती.

त्याने डोळे उघडले, आळस झटकला इतक्यात समोरून मॅनेजर आला. म्हणाला चल, कॉफी प्यायला जाऊ. याने कॉफी मग उचलला आणि दोघे कॅफेटेरिया कडे निघाले.
वाफाळत्या कॉफीचा एक घोट घेत  मॅनेजरने विचारलं, "नक्की काय करायचंय मग तुला ?" याला काही सुचेना. काही क्षणभर शांतता. "काय करायचंय ते माहीत नाही पण जे करतोय ते करायचं नाहीये आयुष्यभर." आपोआपच याच्या तोंडून निघालं.
मॅनेजरच्या चेहऱ्यावर किंचित हास्य. "बरं, पण जे करतोयेस त्यात वाईट काय आहे ?" पुन्हा काही क्षण शांतता. "कारण हे सगळं खूप रुटीन आहे. तेच तेच काम, शिफ्ट्स, सामान्य आहे फार. मला काहीतरी वेगळं करायचंय."
 "वाह, छानच !!!" हातातला मग टेबलावर ठेवत मॅनेजर म्हणाला , "छान वाटतंय ऐकायला. काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असावीच. खरंय. पण त्याआधी  जे सामान्य आहे, रुटीन आहे ते सुद्धा अव्याहतपणे, तक्रारी करता जमायला हवं. जे काम आपण करतोय ते आवडत नाही की जमत नाही याचा शोध घ्यायला हवा. आवडीचं काम करायला मिळणं हा नशीबाचा भाग असू शकतो पण कामाची आवड जोपासणं आपल्या हातात असतं."
" ऐकायला बरं  वाटतंय , पण ही तर सरळसरळ तडजोड झाली."  याचा सडेतोड प्रश्न आला.
 काही क्षण शांततेत गेले मग  मॅनेजर म्हणाला, " कसंय, काही लोकांना आपलं 'destination , काय आहे याची माहिती असते आणि त्यानुसार ते आपला मार्ग निवडतात. त्यांना आपण असामान्य म्हणतो. काही लोक असे असतात ज्यांना आपलं 'destination' माहीत नसतं पण असलेल्या मार्गावर चालत राहणं माहीत असतं आणि चालता चालता त्यांना आपलं 'destination' गवसतंहे लोक अव्याहतपणे चालून आपल्या 'destination' पर्यंत पोहोचतात. यांना आपण 'यशस्वी' असं म्हणतो. बरेचसे लोक 'सामान्य'असतात ज्यांना 'destination' सुद्धा माहीत नसतं आणि हाती असलेल्या मार्गावर चालायचंही नसतं. आत्ता ह्या घडीला तू सामान्यच आहेस आणि कदाचित आज जो मार्ग तुला रुटीन आणि सामान्य वाटतोय, कदाचित त्याच मार्गावर तुझ्या यशाची बीजं असतील."
"म्हणजे नक्की मी काय करायला हवं??" याचा प्रश्न. मॅनेजरने कॉफी संपवली आणि जाता जाता हसत हसत म्हणाला," जॉनी वॉकर!!!"

टेबलावर एकटाच बसून विचार करताना याला आठवलं, "Keep Walking". चालत रहा. सामान्य ते असामान्य हा खरंतर एक प्रवासच आहे.


- अभिषेक राऊत

Saturday, September 6, 2014

"कुणीच नाही."


"कुणीच नाही."

त्याच्या कुशीत तिने डोकं ठेवलं . मान तिरपी करून विचारलं, "कोण आहोत आपण एकमेकांचे"? तो म्हणाला, "कुणीच नाही." ती हसली. डोळे मिटले आणि झोपेच्या आधीन झाली. त्याच्या डोळ्यांसमोर गेल्या अनेक वर्षांचा पट तरळला.

आपलं एकमेकांशी नातं काय हे शोधण्याचा प्रयत्न त्यांनी अनेकदा केलेला. पण त्यात त्यांना कधी फारसं यश आलं नाही. त्याला नेहमी असं वाटायचं की नात्यांना नावं देऊन आपण व्यक्तींना एखाद्या बंधनात अडकवतो. आयुष्यात येणारे  लोक फक्त आपली सोबत करतात  आपण त्या सोबतीला नात्यांचं लेबल लावतो आणि मग हळूहळू सगळं complicate होऊन बसतं.

सोबती वरून आठवलं, दोघानाही एकमेकांची सोबत आवडायची. पण या सोबतीला काही नाव द्यावं असं त्यांना कधी वाटलं नाही. आपल्याकडे  नावं देण्याच्या आणि नावं ठेवण्याच्या बाबतीत आजूबाजूचे लोकच  माहीर असतात. काही म्हणले, मित्र आहेत एकमेकांचे. काही म्हणाले, अफ़ेअर वाले आहेत. काही म्हणाले, थातुरमातुर आहेत हो. अर्थातच ह्यांनी लोकांना फारसं मनावर घेतलं नाही. त्यांना एकमेकांची सोबत जास्त महत्वाची वाटत होती, त्या सोबतीला कुठलंही नाव देण्यापेक्षा.

एक दिवस हाच प्रश्न त्यालाही पडला. नात्यांची एक एक नावं घेऊन त्याने तो सोडवायचा प्रयत्न केला. छान पटतं एकमेकांशी, चर्चा, वादविवाद होतात, भावनांचं शेअरिंग होतं. म्हणजे मैत्री असावी. पण मग शारीरिक आकर्षण, ते सुद्धा आहेच. म्हणजे मग मैत्रीच्या पुढचं काहीतरी असावं. पण 'commitment' नाहीये. म्हणजे फक्त 'फ्रेंड्स विथ बेनिफिट्स' झालं. पण मग सोबतीत जर दुरावा आला तरी मनाची इतकी घालमेल का होते. म्हणजे नुसतं शरीरच नाही तर कुठेतरी मनही 'involve' आहे. त्याला वाटलं मनही involve आहे तर झटकन लग्न करून मोकळं व्हावं की पण मग जाणवलं, खरंच आपण नवरा आणि बायको या नात्याला न्याय देऊ शकू का ? आता तो पुरता blank झाला. वर्षानुवर्षांच्या त्यांच्या सोबतीला त्याला एखाद्या नात्याचं लेबलच सुचेना. मग त्याने ठरवलं आपण सोबत रहायचं, नात्याशिवाय. आज त्यांच्या सोबतीला बारा वर्षं झालीत.

त्यांच्या या मुक्तछंदी जगण्याला कुठलंही नाव नाही. नावासोबत येणाऱ्या आशा-अपेक्षा नाहीत. नात्यांची बंधनं नाहीत आणि उपकारांची ओझी नाहीत. कदाचित, कुठलंही नाव नाही म्हणून त्यांचं  असणं अधिक सहज सोप्पं झालंय. लोकांना उत्तर देण्याच्या फंदात ते पडत नाहीत. त्यांच्यापुरता उत्तर त्यांना सापडलंय, "आम्ही एकमेकांचे कुणीच नाही. "

- अभिषेक राऊत