Saturday, February 24, 2018

अंगारमाळ्याच्या गोष्टी

रणरणत्या उन्हात या शेतातले मोठमोठे दगड-धोंडे उचलून दूर करत असताना शरद जोशींना कुसुमाग्रजांच्या ओळी आठवल्या , " एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार" आणि मग या जागेचं नाव ठेवलं गेलं , "अंगारमळा".
अंगारमाळ्याच्या आवारातल्या बोराच्या झाडाखाली बसून विनय हर्डीकर जुन्या आठवणींना उजाळा देत असतात.
चाकण जवळच्या आंबेठाण गावात शरद जोशींनी अक्षरशः शून्यातून उभा केलेला हा पसारा. आज त्या वास्तूत ते नाहीत पण त्यांचं व्यक्तिमत्व समजेल अशा पुष्कळ गोष्टी आहेत. सोबत हर्डीकर सर असतात. ते काही आठवणी सांगतात. सध्या त्या पसार्याची काळजी घेणारे सुरेशचंद्र म्हात्रे सर असतात.
आत शिरल्या शिरल्या दिसतात गांधीजी आणि शिवाजी महाराजांचे भव्य पोर्ट्रेट. आजपर्यंत महाराजांच्या  शेजारी शाहू,फुले , आंबेडकर पाहिलेले असतात आणि गांधीजींना शक्यतो एकटं . पण आत शिरल्या शिरल्या या दोघांचे पोर्ट्रेट पाहून प्रतीकांची निवड करण्यातला हा वेगळेपणा झटकन दिसून येतो. मी विचार करतो , असा नक्की काय विचार असेल या दोघांना एकत्र समोर 'प्रोजेक्ट'करण्यात. मला  जाणवत  जातं , बघायला गेलं तर हे दोनच असे नेते ज्यांनी सामान्यांमधल्या शक्तीला जाणलं आणि बघताबघता अक्खा मावळ राजांच्या बाजूने तर गावखेड्यातला हरेक माणूस गांधीबाबाच्या मागे उभा राहिला. एका मोठ्या जनसमुदायाला 'अपील' होणारे हे दोन नेते. प्रतीकांची हि  कल्पकतेने केलेली निवड तिथल्या पोस्टर्समध्येही दिसत राहते. आंदोलनांसाठी तयार केलेले पोस्टर, त्यातली भाषा, यातलं वैविध्य, त्यातली प्रसंगोपात समयसूचकता जाणवत राहते. 'ऊसदर आंदोलन' असो, 'शरद पवारांना गावबंदी' असो किंवा मग चांदवडचा स्त्रीशक्तीचा जागर करणारा मेळावा असो. त्यासाठी बनवलेली पोस्टर्स एकाच वेळी परिणामकारक असतात आणि कल्पकही.
पुढे सरकतो तर एका मोठ्ठया भिंतीवर तितकाच मोठ्ठा
फलक असतो.त्यात शेतकरी संघटनेच्या आंदोलनात बळी  गेलेल्या आंदोलकांची नावं असतात. मी वाचत जातो. वय वर्ष २० पासून ते ६५ पर्यंत. तरुण , म्हातारे, बाया बापड्या सगळेच असतात त्यात. जास्त करून उत्तर महाराष्ट्र, विदर्भ , मराठवाडा या भागातले. संघटनेची यशस्वी झालेली मोठी आंदोलनं सुद्धा त्याच भागातली. पुणे जिल्ह्यात जन्म घेतलेल्या संघटनेला , पुणे जिल्ह्याने आपलंसं करताना मात्र हात आखाडताच घेतला. पुढे हर्डीकरांच्या बोलण्यातूनही हि खंत जाणवत राहते.
पोल्ट्रीसाठी बांधलेल्या इमारतीचं शरद जोशींनी मुख्यालय केलं . तिथून शेतकरी हिताची हाळी दिली. "कृषिप्रधान" देशात नुसता चवीपुरता ठेवलेला शेतकरी पाहता पाहता राष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवला. "रास्त  हमीभाव" आणि "सरकारी हस्तक्षेप रहित शेती" या दोन काळाच्या पुढच्या धाडसी मागण्या  केल्या. हे सगळं कुठून आलं ? सगळं जग एकुणातच शेतकरी आणि कामगार हितासाठी समाजवादाची भाषा बोलत असताना हा मनुष्य मुक्त अर्थव्यवस्थेची मागणी करतो. याची उत्तरं मिळत जातात पुढच्या वास्तूत शिरलं कि. तिकडे रांगेने मांडून ठेवलेली असते , जोशींची ग्रंथसंपदा. त्यात अक्षरशः सगळं असतं . कार्ल मार्क्स असतो, अँगल्सचे तर ते भक्तच. गॉर्की असतो. पॉल क्रुगमन असतो, जॉर्ज सोरोस असतो, फ्रेडरिक हायेक असतो. अक्षरशः प्रचंड वैविध्य. जगभरातलं जे उत्तम आहे ते कुठलाही पूर्वग्रह न ठेवता वाचायचं आणि मग सोप्प्या भाषेत ते शेतकऱ्यांसमोर मांडायचं . जे योग्य आहे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आंदोलनं करायची आणि मागण्यांना अभ्यासाचं अधिष्ठान ठेवायचं . १९८२ पासून सातत्याने शरद जोशींनी हे केलं .
तिथेच भामा आसखेडच्या प्रकल्पाची कोनशिला आहे. म्हात्रे सर सांगतात, शेतकऱ्यांच्या जमिनीचे केवळ संपादन न करता त्यांना प्रकल्प भागधारक करून घेऊन त्यायोगे प्रकल्प विकास करण्याची ती पहिली महत्वाकांक्षी सुरुवात होती. सरकारी अनास्थेमुळे ती रेंगाळली. पण आज जेव्हा मी मगरपट्टा सिटी, नांदेड सिटी सारखी उदाहरणं पाहतो, समृद्धी महामार्गात शेतकऱ्यांना प्रकल्प भागधारक करून घेण्यास अनुकूल असणारं सरकार पाहतो तेव्हा मला त्या कोनशिलेचं महत्व कळतं . जोशींच्या दूरदृष्टीचं कौतुक वाटतं . मग आम्ही
गच्चीत जातो. त्यावरून समोर नजर टाकली कि भामचंद्राचा डोंगर दिसतो. तुकारामांना याच डोंगरावर साक्षात्कार झाला. अंगरमाळ्याच्या  वाटचालीला भामचंद्राचा डोंगर साक्षी असतो.
तिथून  थोडंसं चालत जात आम्ही जोशींच्या घरी जातो. आटोपशीर घर. जोशींचे काही फॅमिली फोटोस आणि थोडंसं सामान. त्याच्याच पुढे लागून दिल्लीतून उचलून आणलेलं ऑफिस. त्या ऑफिसमध्येही पुस्तकं , खुर्ची , बसायला सोफा आणि बाजूला संघटनेचा 'आयकॉन' बनलेला शेतकर्याचा मोठ्ठा कट आउट . हर्डीकर सर मग त्या फोटोमागची स्टोरी सांगतात. एका सामान्य शेतकर्याचा सहज काढलेला फोटो बघता बघता संपूर्ण संघटनेची, आंदोलनाची आणि असंख्य शेतकऱ्यांची ओळख बनून जातो. कल्पक आणि तितकंच प्रभावी.
निघायची वेळ झालेली असते. आजवर मुलाखतीतून ऐकलेल्या शरदरावांच्या विचारांमागची बैठक कुठून पक्की झाली हे कळलेलं असतं . नेता होण्याची आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि शारीरिक अशी कुठलीही पूर्व पार्श्वभूमी नसलेला हा माणूस जवळपास पस्तीस वर्षं शेतकऱयांचं प्रेम मिळवत राहतो. अभ्यासपूर्ण आंदोलन करतो, चळवळीला दिशा देतो, संघटना बांधतो, स्थानिक नेतृत्व घडवतो आणि त्याहूनही महत्तवाचं म्हणजे शेतकऱयांचा मुद्दा बघता बघता राष्ट्रीय पटलावर सक्षमपणे घेऊन जातो. महिला प्रश्नांवर महिलांशी सहजपणे संवाद साधणारे जोशी तितक्याच सहजपणे देशातल्या मोजक्या एक्सिक्युटिव्स समोर 'मेटॅफिसिक्स ऑफ लीडरशिप " सारखा विषयही मांडतात .
"ग्यानबाच्या वृक्षाखाली " बसून विचार करताना जाणवतं , आताशा अंगरमाळ्यातला अंगार थंडावलाय कि काय . जोशींची भाषणं , त्यांचे लेख , पुस्तकं या सगळ्यांचं डॉकुमेंटेशन करायला चार पाच तरुणही मिळत नाहीत असं जेव्हा म्हात्रे सर म्हणतात तेव्हा वाईट वाटतं . बाकी काही नाही तरी "अभ्यासोनि अंदोलनावे " हि अंगरमाळ्याची खरी शिकवण आणि ती पुढच्या पिढीत झीरपावी हि खरी गरज आहे .
अभिषेक राऊत .