Saturday, May 4, 2024

ट्रेन स्लो होते तेव्हा...

 शिवडी स्टेशन वर गाडीत चढलो आणि बसायला जागा नव्हती म्हणून दरवाजातच उभा होतो. शिवडी कडून मुंबईकडे जायला ट्रेन निघाली पण सकाळी सकाळी कुठल्या तरी सिग्नल मध्ये कसला तरी बिघाड आला असावा आणि गाडी शिवडी आणि कॉटन ग्रीन च्या दरम्यान अगदीच रेंगाळल्या सारखी चालू लागली. 

महिनाभरापूर्वी मी पुन्हा एकदा मुंबईत आलो तेव्हापासून ही अशी रेंगाळण्याची माझी पहिलीच वेळ. नाहीतर एवढ्या दिवसात मुंबईच्या वेगाने मला कधी मान वर करून बघायची फुरसत दिली नाही. फार विचार करायची फुरसत दिली नाही

आणि आज गाडी जेव्हा अशी थांबली , मध्येच . माझी नजर सगळीकडे फिरली आणि विचारांना वाऱ्याचा वेग आला. 

नेहमी खरंतर गाडी जशी शिवडी स्टेशन ला येते तसं तुमच्या उजव्या बाजूला नुसत्या उंचच उंच इमारती दिसायला लागतात. 50 मजली, 60 मजली, मान वर करून बघितल्या शिवाय त्या नजरेत मावतच नाहीत. स्काय स्क्रॅपर्स म्हणायचं त्यांना. तुम्ही नवीन असाल मुंबईत तर त्यांच्या उंचीने दडपायला होऊ शकतं.

पण तेच गाडीने शिवडी सोडलं की तिच्या डाव्या बाजूला मात्र या अशा बिल्डिंग नाहीत. तिथे पडकी गोदामं आहेत, पोर्ट ट्रस्ट ची थोडीफार ऑफिसं. थोडक्यात नजर वेधून घेणारं असं फारसं नाही. 

पण आजचा दिवस वेगळा होता. गाडी रेंगाळत कॉटन ग्रीन स्टेशनात शिरली आणि डाव्या बाजूच्या एका बिल्डिंगने माझं लक्ष वेधून घेतलं. 

नुसतीच ताडमाड उंच नव्हती ती. तीन किंवा फारतर चार मजली असावी. बांधकाम बघून आणि तिची स्टाईल बघून जुनी किंवा हेरिटेज प्रकारातली वाटत होती. पण बाहेर लागलेले दोन चार एअर कँडीशनर बघून वाटलं की अजूनही वापरात असेल ही. मग मी नाव पाहिलं , "कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया" "कॉटन एक्सचेंज बिल्डिंग" . म्हणजे कापसाचा शेअर बाजार असं म्हणलं तरी चालतंय.  थेट जुन्या काळाची म्हणजे जेव्हा इंग्रजांचा अंमल अखंड हिंदुस्थानावर होता, मुंबईची ओळख "कापड गिरण्यांचं शहर" किंवा "पूर्वेकडचं मँचेस्टर" अशी होती, भारतातून परदेशात जाणारं कापूस हे महत्वाचं नगदी पीक होतं तेव्हाची आठवण करून देणारी. 

गाडीने कॉटन ग्रीन सोडलं पण ती बिल्डिंग काही मनातून जाईना. साधारणपणे दोन रस्त्यांच्या सांध्यावर , V आकारात उभी असलेली ती बिल्डिंग. ही बिल्डिंग बांधली गेली असावी साधारणपणे 1920 च्या दरम्यान. त्यामुळे हिची बांधणी तशी एकदम ग्रँड ओल्ड व्हिक्टोरियन नाही. थोडीशी नावीन्याकडे झुकणारी. "Art neauvou" या प्रकाराची. फ्रेंच आर्किटेक्चरचा हाच प्रकार पुढे जाऊन "art deco" झाला आणि मुंबईचं आर्किटेक्चर म्हणून ओळखला जाऊ लागला. Art Deco पद्धतीने बांधलेल्या अनेक बिल्डिंग चर्चगेट, फोर्ट , हाय कोर्ट या भागात दिसतात. 

तर पुन्हा येऊया या कॉटन एक्सचेंज च्या इमार्टिकडे. कधी काळी तिला दिलेल्या "पेस्टल ग्रीन" रंगाच्या खुणा तिच्या अंगावर दिसत होत्या. एखाद दुसऱ्या खिडकीची काच तुटलेली पण त्याने तिचं सौंदर्य कमी होत नव्हतं , समांतर बांधणी मुळे आत असणारे लांबच लांब कोरिडॉर्स यांचा अंदाज येत होता. उंचच उंच जाणारे पिलर्स आणि मग त्यांच्या छताशी असणारी कलाकुसर लांबूनही कळत होती. 

कापसाच्या व्यापारात मुंबईचं नाव होऊ लागलं साधारणपणे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात.  १८४४ साली जगातलं कदाचित सगळ्यात पहिलं कॉटन एक्सचेंज (कापसाचा शेअर बाजार म्हणू) सुरू झालं मुंबईत काळबादेवीत. सुरुवातीला सगळं चालायचं ब्रिटिशांच्या अखत्यारीत म्हणजे इस्ट इंडिया कॉटन असोसिएशन मार्फत.  हळूहळू कापसाच्या व्यापारातील पैसा भारतातल्या गुजराथी आणि पारशी व्यापाऱ्यांनी हेरला आणि खेतान, खटाव आणि गोकुलदास सारखे व्यापारी इथल्या कापूस व्यापाराचे सम्राट बनले.  त्यांनी कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया ही संस्था सुरू केली आणि त्या अंतर्गत कापसाच्या व्यापारासाठी ही बिल्डिंग बांधली. कापसाच्या व्यापाराने ब्रिटिशांची गरज भागली पण खरी धन झाली व्यापाऱ्यांची, गिरणी मालकांची. एकेकाळी ह्या बिल्डिंगच्या आजूबाजूची गोदामं कामगारांनी गजबजलेली होती, कापसानं आणि धान्यांनं भरलेली होती, या बिल्डिंगचे कोरिडॉर्स कापसाच्या भावाची बोली लावणाऱ्या आवाजानं दणदणत होते. ब्रिटिश व्हाइसरॉय, राणी एलिझाबेथ पासून ते अगदी नेहरू, गांधी इथपर्यंत सगळ्यांनी या बिल्डिंगला भेटी दिल्या होत्या. एकेकाळी मुंबईच्या कापड उद्योगतले मोठमोठे हस्ती मग ते गोकुलदास असोत, रुईया असोत, खटाव असोत, खेतान असोत किंवा पिरामल प्रत्येकाची इथे वर्दळ असायची. 

हळूहळू काळ बदलला. मुंबईच्या कापड व्यापराचं, गिरण्यांचं आणि गिरणी कामगारांचं काय झालं हे इतिहासाने नमूद करून ठेवलंय. गिरण्या आणि गिरणी कामगार संपले आणि व्यापार आणि व्यापारी तेवढे उरले.  

आज २०२४ . शंभर वर्षं झाली. आजही कॉटन ग्रीन स्टेशनात गाडी शिरताना डाव्या  बाजूला कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया चं ऑफिस म्हणून ही बिल्डिंग उभी आहे. पूर्वीसारखी वर्दळ नसेल कदाचित पण चहलपहल अजूनही आहे. 

हळू हळू ट्रेन पुढे सरकते आणि मग आपल्याला दिसते उजव्या बाजूला एकेकाळी पिरामल ची कापडाची गिरणी असलेल्या जमिनीवर आता बांधकाम सुरू असलेली "पिरामल आरण्या" नावाची बिल्डिंग. चकचकीत, उंच, स्क्वेअर फुटाला लाखाचा भाव असलेली.

 या डाव्या आणि उजव्या बाजूत मुंबईच्या गेल्या शंभर वर्षातली स्थित्यंतरं आहेत. सामाजिक, आर्थिक, सगळीच. थोडं निवांतपणे पहिलं तर ती दिसतात, अनुभवता येतात. पण मुंबई इतकी फास्ट आहे की ती तुम्हाला एका जागी थांबू देत नाही, इतिहासाचा फार विचार करू देत नाही आणि भविष्याची स्वप्नं दाखवताना हातातून घसरत चाललेल्या वर्तमानाची जाणीव करून देत नाही. 

मी पोचलोय आता CSMT ला आणि धावतोय बस पकडायला. पुन्हा केव्हातरी माझी गाडी रेंगाळेल आणि पुन्हा मला विचार करायला मिळेल अशी अपेक्षा मुंबईकडून ठेवत. तोपर्यंत, मुंबई झिंदाबाद !!!

-  अभिषेक राऊत







Saturday, February 24, 2024

प्रेमाची गोष्ट - मांडू, मध्य प्रदेश (डिसेंम्बर २०२३)

 मांडू ला गेलास की न चुकता रुपमती पॅलेस ला जा आणि राणी रुपमती ला माझा हाय सांग. असं भाच्याने सांगितल्याने आणि मी एक चांगला मामा असल्याने मध्य प्रदेश ची ट्रिप मांडू शिवाय करणार नव्हतोच. त्यातच आमच्या दोस्ताने एक दिवस राहण्यासाठी मांडू निवडलं होतं त्यामुळे मोकळ्यात वेळ होता. 

तर मांडू किंवा मांडव पण त्याच्याबद्दल बोलण्या आधी आपण बोलूयात माळव्याबद्दल. 

माळवा, हिंदीत म्हणतात मालवा. हा असा उभा आडवा भारत असेल तर त्याच्या थेट मध्यात पसरलेला , जवळजवळ 68 लाख वर्षांपूर्वी तयार झालेला, काळ्या बेसाल्टचा हा जवळजवळ 80 हजार किलोमीटरचा पठाराचा टापू. विंध्य पर्वताच्या उत्तरेला कुठल्याश्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला असावा आणि मग तो लाव्हा हजारो किलोमीटर पसरत जाऊन हळू हळू थंड झाला असावा. दक्खनच्या पठाराचंच एक्स्टेंशन खरं तर पण नर्मदा नदी वेगळं करते दोघांना.

 तर हा असा माळवा. महाकालच्या आशीर्वादाने पवित्र झालेला, "इंदौर के मिष्टान" खाऊन "चटोरा" झालेला, होळकर , पवार आणि सिंदिया सरदारांच्या पराक्रमाने गाजलेला, नर्मदेच्याआणि क्षीप्रेच्या पाण्याने हिरवागार फुललेला आणि राणी रुपमतीच्या प्रेमाने रोमँटिक झालेला माळवा. 

एकेकाळी या माळव्यात राजा भोज आणि कविकुलगुरु कालिदास होता.

"आषाढस्य प्रथम दिवसे" अशी सुरुवात करत त्याने साक्षात आकाशातल्या काळ्या ढगाला आपल्या प्रेमाचा संदेश घेऊन प्रेयसीकडे पाठवलं आणि त्यातून उभं राहिलं अजरामर काव्य "मेघदूत". तुम्हाला सांगतो प्रेमात पडलेल्या माणसाने एक शब्द लिहिला तरी त्याचं काव्य होतं मग इथे तर साक्षात कालिदास होता म्हटल्यावर महाकाव्य होणारच ना. पण कालिदासबद्दल, मेघदूताबद्दल पुन्हा केव्हातरी. आजचा विषय आहे मांडू किंवा मांडव कारण तिथेही प्रेमाची दास्तान आहे आणि शिवाय आमच्या रोड ट्रिप मधलं ते एक महत्वाचं ठिकाण आहे. 

मला अनेकदा प्रश्न पडतो, आदर्श प्रेम कोणतं. ते कसं असतं . प्रेमात एकमेकांकडून अपेक्षाच ठेवू नयेत असं सांगणारं प्रेम आदर्श की प्रेमात एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पार चन्द्र , सूर्य ,  तारे आणून देणारं प्रेम आदर्श!! 

म्हणजे आता बघा, दस्तुरखुद्द माळव्याचा सुलतान, शिकारीला जाताना एक मंजुळ आवाज ऐकतो काय, त्या आवाजाचा शोध घेताना त्याला त्या गाणाऱ्या तरुणीचं सौंदर्य भुरळ काय पाडतं आणि तो तिला विचारतो, मी असं काय करावं ज्याने तू माझी होशील, माझ्यासोबत माझ्या महालात येशील. 

साक्षात सुलतानाने असं विचारल्यावर कुणीही लगेच हो म्हणेल पण ती तरुणी म्हणते, "तुझं प्रेम असेल माझ्यावर पण माझं प्रेम आहे नर्मदेवर आणि रोज नर्मदेला बघून माझी सकाळ होते आणि तिच्या दर्शनाने संध्याकाळ. नर्मदा वाहते का तुझ्या मांडू मधून? बस्स तेवढं जर झालं तर मी लगेच येईन मांडू ला. "

याला म्हणायचा स्त्री हट्ट . प्रेमात हट्ट करावा तर असा. नाहीतर आमच्या बायकोने सांगितलेलं , "वाटतंय ना लग्न करावं मग स्विच कर आणि चांगल्या पगाराची नोकरी शोध". अर्थात हे करतानाही माझ्या नाकी नऊ आलेले पण ते एक असो. 

तर रुपमतीने अट घातली सुलतान बाझ बहादूरला आणि तो कामाला लागला. तिच्यासाठी स्वतःच्या महालासमोरच्या टेकडीवर भला मोठा महाल बांधला. त्या महालाच्या मनोऱ्यामधून तरी नर्मदेचं दर्शन तिला होईल म्हणून. पण मांडू पासून जवळ जवळ 50 किलोमीटर दुरून वाहणाऱ्या नर्मदेला वळवायचं तरी कसं ?? त्याने नर्मदामय्येपुढे हात जोडले. तिला म्हणाला, "प्रेमाबद्दल मी तुला काय सांगू. पण ह्या रुपमतीच्या प्रेमात मी आकंठ बुडालोय आणि ती आहे तुझ्या प्रेमात. तिला पाहिल्याशिवाय माझा दिवस सरत नाही आणि तुला पाहिल्याशिवाय तिचा दिवस सार्थ होत नाही. तू एकवेळ माझ्यासाठी येऊ नकोस पण रुपमतीसाठी ये." 

नर्मदेचं ह्रदय द्रवलं. ती म्हणाली, "मी येते. तुझ्या महालापासून थोडी दूर एक टेकडी आहे तिथं एक गोरख चिंचेचं (baobab tree) झाड आहे तिथं खणलास की जे लागेल तीच मी. रेवा. "

आणि मग बाझ बहादूर ने त्या झाडाखाली रेवा कुंड बांधलं. आणि त्या कुंडा समोरच्या टेकडीवर बांधला एक मोठ्ठासा महाल. तोच रुपमती महाल. 

त्या रुपमती महालाच्या खालच्या अंगाला सुलतान बाझ बहादूर चा महाल आहे. आधी त्याचा महाल बघायचा, मग रुपमती महाल आणि मग रेवा कुंड. 

असं म्हणतात , रुपमती रोज सकाळी आणि संध्याकाळी त्या महालाच्या सगळ्यात वरच्या चौथऱ्यावर जाऊन उभी राहायची. तिथून तिला नर्मदा दिसायची आणि त्याच वेळी बाझ बहादूर आपल्या महालाच्या चौथऱ्यावर उभा राहून नर्मदेकडे एकटक पाहणाऱ्या रुपमतीकडे मोहित होऊन पाहायचा. न चुकता रोज. 


रुपमतीच्या महालात आता तसं काही नाही. जिथं उभं राहून रुपमती डोळ्यांत प्राण आणून नर्मदा दिसतेय का म्हणून बघायची तिथं जाण्याच्या जिन्याला सरकारने कुलूप  घातलंय. कधी कधी वाटतं आपण तिथे गेलो तरी आपल्याला थोडीच दिसणारे नर्मदा तिथून . त्यासाठी प्रेम हवं, नजरेत, मनात आणि आस असावी नर्मदेला पाहण्याची जशी रुपमती ला असायची रोज, उन्हा पावसात,थंडी वाऱ्यात न चुकता. कुलूप तोडून वर पोहोचलो तरी ना आपल्याला नर्मदा दिसणार ना आपल्याला पाहण्यासाठी कुणी बाझ बहादूर दूर खाली डोळ्यांत जीव आणून आपल्या येण्याची वाट पाहणार. 

पण खैर म्हणून प्रेम करूच नये असं काही नाही. प्रेम करावं , निभवावं आपल्या आपल्या पद्धतीने. जसं पुढे जाऊन रुपमतीने निभावलं. अकबराच्या सरदाराने बाझ बहादूर ला मारलं आणि रुपमतीचं चारित्र्य भ्रष्ट होतंय की काय अशी परिस्थिती आली तेव्हा त्या पवित्र नर्मदेच्या रेवा कुंडात रुपमती ने जल समाधी घेतली. प्रेमात केलेला जौहार... नर्मदेच्या पाण्याने पवित्र झालेलं हे कुंड रुपमतीच्या प्रेमतल्या बलिदानाने अजून झळाळून निघालं. प्रेमाची महती ही अशी. आजही नर्मदेची परिक्रमा या रेवा कुंडाचं दर्शन घेतल्या शिवाय आणि रुपमती आणि बाझ बहादूर च्या प्रेमाची आठवण काढल्याशिवाय पूर्ण होत नाही. 


मला मांडू मध्ये सरलेली आमची रात्र आठवते. डोंगराच्या टोकावरचं हॉटेल, बारीकशी थंडी आणि सोबतीला निवांतपणा. आदल्या रात्रीच पौर्णिमा झाली होती. समोरच्या दरीतल्या झाडांच्या शेंड्यावर चांदण प्रकाश पडलेला, हलकासा वारा वाहत होता, जगजीत ची गझल लागलेली, "कल चौदहवी की रात थी, शब भर रहा चर्चा तेरा", 

गझल उलगडत होती आणि मित्र सांगत होता त्याच्या प्रेमाची गोष्ट. 

एकच स्वप्न दोघांनी एकत्र पाहणं, मग कित्येक वर्षं, किती उतार चढाव, खाच खळगे, केवढी जवळीक केवढा दुरावा, आणि मग शेवटी ते स्वप्नं सत्यात येणं. खरंच प्रेमात पडणं प्रत्येकाच्या नशिबी असतंच असं नाही..


मित्राची गोष्ट ऐकता ऐकता पुन्हा रुपमती आठवली. 

असं म्हणतात अजूनही रुपमती दर पौर्णिमेला तिच्या महालात येते, जिन्याला घातलेल्या कुलुपाचं तिला बंधन नाही. ती वर चढते, तिच्या आवडीच्या जागी उभं राहून डोळे भरून नर्मदेला पाहते , डोळ्यांच्या एक कोनातून तिला दिसतं की बाझ बहादूर पण आपल्याकडे बघतोय. एकमेकांवरच्या प्रेमाची खात्री झाली की दोघेही निघून जातात पुन्हा पुढच्या पौर्णिमेला परत येण्यासाठी....


एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेल्या जीवांच्या गोष्टी अशाच असतात. म्हटलं तर खऱ्या म्हटलं तर दंतकथा.  त्या ऐकायच्या असतात, ऐकवायच्या असतात, त्यांची गाणी करून गायची असतात आणि प्रेमाच्या गोष्टी चिरंतन टिकवायच्या असतात. 


म्हणून तुम्ही सुद्धा न चुकता रुपमती पॅलेस ला जा आणि राणी रुपमती ला माझा हाय सांगा.


- अभिषेक राऊत




Saturday, January 6, 2024

नर्मदापुरम (होशंगाबाद) - २५ डिसेंबर २०२३.

सकाळी उठून घाटावर जावं, नर्मदेचं पात्र पाहावं. शांत व्हावं. 

भल्याथोरल्या घाटाच्या  पायऱ्यांवर उभं राहून नर्मदेला पाहावं

घाट स्वच्छ नसतोच. 

नर्मदेचं पात्र, नजर ठरत नाही. डुबकी मारायची इच्छा होतेच. आपण थोडीच पापं धुवायला आलेलो असतो? आपण आलेलो असतो नर्मदेच्या गोष्टी ऐकायला. 

आपल्याच विचारात चालत जावं , घाटावरच्या नर्मदेच्या मंदिरात. नर्मदासूक्त लिहिलेलं असतं तिथे. प्रयत्नपूर्वक वाचावं ते. "त्वदीय पाद पंकज , नममि देवी नर्मदे"

पुजाऱ्याच्या पुढ्यातल्या ताटात पैसे टाकले की पुजारी बोलता होतो. 

तो सांगतो, नर्मदा मैया पवित्र. साक्षात भगवान शंकराच्या घामापासून तयार झालेली. ,"बात ये है की पाप धोने के लिये गंगा जी में डुबकी लगानी पडती हैं , लेकीन नर्मदा जी के तो दर्शन ही काफी हैं"

आपण आपला पाप पुण्याचा हिशोब मांडायला लागतो आणि वाटतं, इतरांचं नुसत्या दर्शनाने काम होईल पण आपल्याला मात्र पाप धुण्यासाठी इथेही डुबकीच मारायला लागेल. 

मग घाटाच्या पायऱ्या उतरताना मग एक बाबा दिसतो. त्याच्या बाजूला बसून नुसतं "नर्मदे हर" म्हणायचं अवकाश की गप्पाच सुरू होतात.

तो सांगतो, ही इतकी शांत, निवांत नर्मदा इथली होशंगाबाद (आता नर्मदापुरम) ची. खरी नर्मदा अवखळ,  एखादी टीनऐजर मुलगी जशी असते ना , उत्साहाने खळखळणारी, अल्लड, अवखळ अगदी एखाद्या प्रेमकथेत शोभेल अशी.  अमरकंटक च्या पहाडांमधली. नुसती खळखळणारी , आपला मार्ग शोधणारी आणि उपजतच आवेगाने वाहणारी, सतत प्रवाही. म्हणून तिला म्हणायचं रेवा. आणि मग तिचा जीव जडतो सोनभद्र वर. लोक म्हणतात अल्लड वयात झालेलं प्रेम थिल्लर असतं पण आमच्या नर्मदेचं, लाडक्या रेवाचं तसं नाही. तिचं प्रेम अगदी खरं. म्हणून तर सोनभद्र मिलन नावाचं ठिकाण आहे अमरकंटक जवळ. तर ही रेवाची गोष्ट. रेवाच्या सोनभद्र वरच्या प्रेमाची. पण हे प्रेम स्वीकारता आलं नाही सोनभद्र ला. रेवाशी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या खऱ्या पण सोनभद्रचा जीव जडलेला जोहीला वर (ही सुद्धा एक नदीच बरं का). आणि मग एक दिवस रेवाला कळलं ना हे सगळंच. ती तशीच वळली, मागे फिरली वेगाने धावू लागली, दूर दूर उलट्या दिशेने, सोनभद्र पासून दूर, अमरकंटक पासून दूर, भेडाघाटातून मार्ग काढत , मागे वळून पाहिलंच नाही तिने. वाहत वाहत तिची नदी झाली, ती नर्मदा झाली. आज तिच्या आजूबाजूच्या सगळ्या नद्या बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात पण आमची रेवा, प्रेमात खाल्लेल्या धोक्याने जी मागे वळली, मार्गच बदलला तिने.  ती थेट अरबी समुद्रालाच जाऊन मिळाली. ती एकटीच अशी. 

ही अशी नर्मदेची गोष्ट. ती गोष्ट ऐकून मग नर्मदा अजून जवळची वाटायला लागते. बाबा तर निघून जातो आपल्याला घाटावर एकटं सोडून. 

आयुष्यात धोके, धक्के आपण खाल्लेलेच असतात की सगळ्यांनी. असं वाटतं रेवाच्या पाण्यात आता खरंच उतरावं. पाप धुवायला म्हणून नाही तर तिला सांगावं,  मला तुझी गोष्ट कळते, समजते आणि म्हणून तू मला जवळची वाटतेस. 

अशा या घाटावरच्या गोष्टी.. नदी, तिच्या गोष्टी, तिच्या गप्पा आणि तिच्याभोवती नकळत विणली जाणारी संस्कृती. 

आता जायलाच हवं पाण्यात असं म्हणत निग्रहाने पाण्यात पाय ठेवला की लक्षात येतं प्रचंड थंड आहे पाणी. तरीही दोन डुबक्या घेतोच. मग प्रचंड भूक लागते. पुढे चालत आलात की एका ठिकाणी रस्त्याच्या चौकात गर्दी असते तिथे नक्की कचोरी आणि समोसा मिळतो.

कचोरी खावी छोले आणि चटणी मिक्स करून

चवीचा कल्लोळ होतो जिभेवर

समोसा खावा. अजून विचारावं ," भैयाजी और क्या खिलाओगे"

तो म्हणतो ," हाव गुलाबजाम में रबडी मिला के खावो"

मग ते घ्यावं, पहिल्याच घासात तृप्त व्हावं.

दिवसाची सुरुवात छान आहे. नर्मदापुरम छान आहे. 

असं वाटतं नदीकिनारीच राहावं, नदीच्या गोष्टी ऐकत राहाव्यात . पण मग लक्षात येतं अरे पुढचा प्रवास करायचाय. आता निघायला हवं. नर्मदेचं पाणी मनाच्या कप्प्यात जपून ठेवत पुढचा प्रवास सुरु होतो. त्याबद्दल पुन्हा कधीतरी.


- अभिषेक राऊत