Sunday, August 31, 2014

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे!!!!



काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे!!!!

"जनाब, मुंबई कि फ़ैशन और कश्मीर का मौसम, बदलने देर नही लगती". आमच्या गाडीने जवाहर टनेल ओलांडला आणि काश्मीरच्या खोऱ्यात प्रवेश केला.   तापमान ३० डिग्री वरून थेट १० डिग्री वर घसरलं होतं. काश्मीर मध्ये पोचल्याचा आनंद आमच्या चेह्ऱ्यावर पसरला आणि ड्रायवरने तो अचूक टिपला. जम्मू ते श्रीनगर प्रवास तसा लांबचा पण नेत्रसुखद. "ये हसीं वादियाँ , ये खुला आसमाँ " अक्ख्या प्रवासभर मनात वाजत असतं. नेत्रसुखद प्रवास आणि गप्पिष्ट ड्रायवर यापेक्षा अजून काय हवं. त्यातून आम्ही मुंबईचे म्हणजे बच्चन आणि खान यांच्या गावचे. त्यामुळे त्याला आमचं अप्रूप जास्त. संभाषणाची गाडी वेगवेगळ्या रुळांवरून भरधाव जात होती. "तुम्हारा समुंदर तो हमारे पहाड , तुम्हारे आम तो हमारे सेब, तुम्हारी ट्रेन तो हमारा शिकारा, तुम्हारी कटिंग चाय  तो हमारा कावा असं बोलता बोलता गाडी एका चेकपोस्टपाशी थांबली तो उद्गारला "लो आ गयी 'तुम्हारी' मिलिटरी!!!". मी चपापलो. गाडी पुढे निघाली. मिलिटरीचा विषय आला आणि त्याच्या शब्दांना धार चढली. त्याच्या लेखी मिलिटरी होती, वेळी-अवेळी गावात घुसून घरादाराची झाडाझडत घेणारी, तरण्याबांड पोरांना संशयाखाली उचलून नेणारी, त्याच्या रोजच्या जगण्यावर लक्ष ठेवून असलेली, त्याची "आझादी" संपवणारी , "तुम्हारी मिलिटरी". आपल्यासाठी हे सारं नवीन असतं. मिलिटरीचं वर्णन पण आणि त्याचं दुःक्ख पण. त्यालाही ते कळलेलं असतं तो एवढंच म्हणतो, "जनाब , आप तो कश्मीर देखनेको आते हो, कभी सुननेको आया करो".
तो पुन्हा पुन्हा भेटत राहतो काश्मीरच्या अक्ख्या प्रवासात. कधी कावा पिताना, कधी सफरचंद खाताना. 'अमन कि आशा' त्यालाही असते पण त्यामागची किंमत गेली अनेक वर्षं तो चुकवत असतो. पर्यटन वाढतं, त्याला रोजगार मिळतो, नवीन संधी मिळतात पण तरीही जुन्या, खोलवर झालेल्या जखमांचे घाव भळभळत  राहतात.
गुलमर्गच्या बर्फाच्छादित डोंगरावर उभं राहून जेव्हा तो दाखवतो "वो है पाकिस्तान दाये तरफ और बायें तरफ उस पार आझाद कश्मीर!!" आपल्याला कसनुसं होतं. पाकव्याप्त काश्मीर आपण शिकलेलो असतो ते अचानक आझाद कश्मीर बनून समोर येतं. वर्षानुवर्षं शिकलेला इतिहास, भूगोल सगळं उलटसुलट होऊन समोर येत राहतं. पोम्पोरेचं केशर घेऊन, सोपोरे ची सफरचंद खात, गुलमर्गमध्ये काढलेले बर्फाळ 'slefies' बघत आपण परतीच्या प्रवासाला लागतो. मनात मात्र त्याचं वाक्य घुमत असतं, "जनाब , आप तो कश्मीर देखनेको आते हो, कभी सुननेको आया करो". खास काश्मीरचा आवाज ऐकण्यासाठी पुन्हा यायला आपण काही दिलीप पाडगावकर नसतो. आपल्यापुरता आपण काश्मीरचा प्रश्न संपवलेला असतो. त्यासाठीच तर आपल्याला शिकवलेला असतं, "काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. दूध मंगोगे तो खीर देंगे, कश्मीर मांगोगे तो चीर देंगे"

-अभिषेक राऊत 

Thursday, August 28, 2014

अफूची गोळी



अफूची गोळी 

तो दरवर्षी येतो. न चुकता. ठरलेल्या वेळेला , ठरलेल्या दिवसांसाठी. आजकाल DJ  च्या आवाजात त्याच्या नावाची ललकारी नीट ऐकूही येत नाही. सोन्या-चांदीच्या अलंकारांत त्याचं लंबोदर कधी झाकलं जातं कळत नाही. मैलभर पसरलेल्या रांगांमधून VIP पास असल्याशिवाय त्याचं दर्शनही होत नाही, उंचच उंच मूर्त्यांच्या स्पर्धेतून याच्या भक्तांचं खुजेपण समोर येतं.  पण तरीही तो येतो. मला आश्चर्य वाटतं दरवर्षी इतक्या स्थितप्रज्ञतेने येणं जाणं कसं काय जमतं याला? कदाचित म्हणूनच याला देव म्हणत असावेत.

शेवटी परवा त्याला गाठलंच म्हटलं, "बस जरासा , थोडं बोलायचंय." जगन्नियंता तो, माझ्या मनातली घालमेल ओळखली असणारच, बसला बाजूला म्हणाला, "विचार, काय विचारायचं ते." का येतोस रे म्हटलं तू ? काय ठेवलाय आम्ही इथे तुझ्यासाठी? कानठळ्या बसवणारे आवाज, खड्ड्यात बुडालेले रस्ते, मंडपातच जुगार खेळणारे "युवक कार्यकर्ते", तुझ्या निर्जीव मूर्तीवर किलोकिलोने सोने चढवणारे तुझे भक्त, तुझ्या उत्सवाचा 'इव्हेण्ट' करून त्याला 'प्राईम टाईम ' वर विकणारे नेते यातलं नक्की काय आहे जे तुला इकडे खेचून आणत दरवर्षी?

बरं तू येतोस थेट एका वर्षाने. त्यात बरंच काही घडलेलं असतं. निसर्गाचा प्रकोप, दंगलींचा उद्रेक, पैशांचे घोटाळे, निवडणुकांचे निकाल आणि सामान्यांची परवड . दरवर्षी तसंच, तेच मागील पानावरून पुढे सुरु. तुझ्या येण्याने ना काही थांबतं ना काही सुरु होतं. मग का येतोस तू?

तो हसला. गजमुख हलवलं आणि म्हणाला,"माझ्या येण्याने आजूबाजूचा माहोल बदलायला मी काही पंतप्रधान नाही. सगळं तसंच असतं, पण मी येतो म्हणून तुम्ही ते विसरता. रोजच्या जगण्यातली दुःक्ख माझ्या येण्याने दूर होत नाहीतच फक्त ती विसरली जातात. दहा दिवस माझ्या असण्याचा असर तुमच्यावर असतो."

मी विचारात पडलो म्हणजे तू दुखहर्ता नाहीस तर केवळ दुःक्ख विसरायला लावणारा आहेस. ते ही क्षणिक. पण मग हे काम तर 'अफूची गोळी' सुद्धा करते. आणि क्षणार्धात मला कार्ल मार्क्स आठवला तो तर फार पूर्वीच म्हणून गेला होता "धर्म ही अफूची गोळी आहे!!!". मी चमकून त्याच्याकडे पाहिलं. तो अर्थपूर्ण हसला माझ्या मनातलं ओळख्ल्यासारखा. मी त्याच्या हातातला मोदक घेतला, घशाखाली ढकलला, मला तरतरी आली आणि बेंबीच्या देठापासून मी ओरडलो , "गणपती बाप्पा मोरया , मंगलमूर्ती मोरया !!!!"

-अभिषेक राऊत 

Tuesday, August 26, 2014

स्वप्नं विकणारा माणूस


स्वप्नं  विकणारा माणूस 

स्वप्नं  बघण्याचं वेड प्रत्येकालाच असतं. माणसामधलं हे वेड त्याने हेरलं होतं आणि ठरवलं होतं, आपण स्वप्नं विकायची. छोटी , मोठी , लोभस , गोंडस , कधी अतर्क्य तर कधी आवाक्यातली अशी सगळी स्वप्नं विकायची. स्वप्नं पाहणं खरंतर सोप्पं असतं. कधी झोपेत तर कधी जागेपणी आपण स्वप्नं पाहिलेली असतातच. पण आपल्याला पडलेलं प्रत्येक स्वप्न आपल्या आवाक्यातल असेलच असं नाही. ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार स्वप्नं दाखवणं आणि विकणं तसं जिकिरिचच काम, पण ते त्याला जमायचं. 

लोकांची स्वप्नं म्हणजे त्याच्यासाठी रंगीबेरंगी फुगे होते. लाल ,गुलाबी , हिरवा , पिवळा अशा रंगांचे. ज्याच्या त्याच्या स्वप्नानुसार त्या त्या रंगाचा फुगा  
त्याच्याकडे आलेल्या प्रत्येकाला तो हे पटवून द्यायचा कि या रंगीबेरंगी फुग्यांतल्या एकात हवा भरून तो वर वर जाणं म्हणजेच तुझं स्वप्न पूर्ण होणं आहे. कारण शेवटी माणूस नेहमीच उन्नतीचीच  स्वप्नं तर पाहात असतो ना. 

ही स्वप्नं विकताना तो माणसांशी एकरूप व्हायचा. त्यांचं स्वप्न जणू आपलंच आहे इतक्या सहजतेने त्यांना समजवायचा. माणूस बघूनच स्वप्नं विकायचा तो. हाताबाहेरच स्वप्न विकायचाच नाही फारसं. मोजून मापून पूर्ण होतील अशीच स्वप्नं विकायचा आणि मग एक स्वप्न पूर्ण झालं  कि लोक पुन्हा दुसऱ्या स्वप्नासाठी त्याच्याकडेच यायचे. कुणाला कुठलं स्वप्न कसं विकायचं हे बरोब्बर माहीत असायचं त्याला. 

काही लोकांना प्रश्न पाडायचा , "याच्या स्वप्नांचं काय ?" कदाचित त्याला त्याची स्वप्नं विकणारा दुसरा कुणीतरी असावा. तसा कधीकधी हा सुद्धा दुःखी  असायचा, म्हणायचा , "स्वप्नं विकली जातायेत पण स्वप्न पूर्ण होत नाहीये". 

कळायचं नाही हा नक्की कोण आहे. गूढ होता थोडासा पण बोलका होता. बोलता बोलता लोकांच्या अधुऱ्या स्वप्नांबद्दल जाणून घ्यायचा आणि मग त्याच  अपूर्ण स्वप्नाला एखाद्या रंगीत फुग्याच्या टोकाशी बांधायचा आणि सहजपणे तो स्वप्नांचा फुगा समोरच्याला विकायचा. 
एकदा एकाने त्याला विचारलं, "हे सगळं इतक्या सहजपणे कसं काय जमतं रे तुला"? तो एवढंच म्हणाला , "मी marketing मध्ये M B A  केलंय  अरे!!!"

--अभिषेक राऊत 

पृथ्वी - एक अनुभव





मध्यमवर्गीय मराठी घरात वाढलेला असल्याने साहित्य, नाटक, कला यांची आवड असतेच. कळत्या नकळत्या वयात खांडेकर, फडके ते पार शिवाजी सावंत असं सर्व काही वाचलेलं असतं.
पुढे जाउन गुलजार , बच्चन , महाश्वेता देवी , टागोर भेटलेले असतात. हिंदी थिएटर आणि ड्रामा यांबद्दल वाचलेल असताना बर्याचदा पृथ्वीचं नाव ऐकलेल असतं. पृथ्वी मागची 'Concept ' ; शशी आणि संजना कपूर ची मेहनत , "फिरता रंगमंच" ते "पृथ्वी अड्डा"पर्यंतचा प्रवास, सिने, नाट्य कलावंताची तिथली उठबस , पृथ्वी कॅफे मधली  "आयरिश कॉफी " , "कटिंग चहा " हे सगळ काही वाचलेल असत, ऐकलेलं असत आणि एखाद्या पावसाळी संध्याकाळी आपण स्वतःच जाउन पृथ्वीच्या समोर उभे  राहतो.

पाऊल टाकल्या टाकल्या आपल्याला जाणवतं, इथला महोलच वेगळा आहे.नाटक , ड्रामा ,प्ले , स्क्रिप्ट , डायलोग्स , बेक्स्टेज , नेपथ्य , संवाद , रंगमंच , रंगभूषा , व्यक्तिचित्रण , कला , अभिनय या साऱ्या शब्दांनी पृथ्वीचा आसमंत नेहमीच व्यापलेला असतो नाट्यवेडाचा गंध इथल्या प्रत्येक वस्तूला आहे. इथे येणाऱ्या प्रत्येकाचं 'passion ' आहे ड्रामा. म्हणूनच एखादी षोडशवर्षीय कन्या "मन्तो की कहानियां " वाचत असते तेव्हा चकित व्हायला होत नाही. बुकशॉप चालवणारा युवक फावल्या वेळात नाटकातली स्वगतं  भूमिकेच्या गाभ्यात शिरून म्हणत असतो तेव्हा डोळे विस्फारत नाहीत.

इथल्या कॅफेने अनेक व्यक्तिरेखांना  जन्म दिला , अनेक नवीन 'फॉर्म्स ' आणि पटकथा इथल्या कॉफीच्या गंधाने घडत गेल्या. आजही इथे परवलीचा प्रश्न असतो "so , what's new ?". नावीन्याची ही आस पृथ्वीने अजूनही जपली आहे. आजही इथल्या टेबलांवर नाटकांना आकार मिळतो , भूमिकांना व्यक्ती मिळतात , धडपडणार्यांना व्यासपीठ मिळतं आणि रंगभूमीला नवीन विचार मिळतात .

नाविन्य आणि वेविध्य हे पृथ्वीचं वेशिष्टय. एखाद्या संध्याकाळी तुम्हाला नाटकांच्या चार्चेसोबत बासरीचे सूर ऐकू येतील , मधूनच एखाद्या गिटारच्या तारांनी छेडलेली जिंगल तुमची संध्याकाळ प्रसन्न करेल.
पृथ्वीच्या "aura"  बाहेर पडताना विचार येतो , पृथ्वी नक्की काय आहे ? एक चळवळ , एक विचार , एक व्यासपीठ ,  कि   फक्त एक थिएटर? पृथ्वी या सगळ्याच्या पलिकडे आहे. त्याला एकाच 'form' मध्ये बांधताच येत नाही … येणार नाही. प्रत्येकाला जसं आवडेल जसं भावेल तसं ते असतं आणि त्याच्या तशा असण्यातच त्याचं 'पृथ्वी'पण सामावलेलं आहे.