Sunday, August 31, 2014

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे!!!!



काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे!!!!

"जनाब, मुंबई कि फ़ैशन और कश्मीर का मौसम, बदलने देर नही लगती". आमच्या गाडीने जवाहर टनेल ओलांडला आणि काश्मीरच्या खोऱ्यात प्रवेश केला.   तापमान ३० डिग्री वरून थेट १० डिग्री वर घसरलं होतं. काश्मीर मध्ये पोचल्याचा आनंद आमच्या चेह्ऱ्यावर पसरला आणि ड्रायवरने तो अचूक टिपला. जम्मू ते श्रीनगर प्रवास तसा लांबचा पण नेत्रसुखद. "ये हसीं वादियाँ , ये खुला आसमाँ " अक्ख्या प्रवासभर मनात वाजत असतं. नेत्रसुखद प्रवास आणि गप्पिष्ट ड्रायवर यापेक्षा अजून काय हवं. त्यातून आम्ही मुंबईचे म्हणजे बच्चन आणि खान यांच्या गावचे. त्यामुळे त्याला आमचं अप्रूप जास्त. संभाषणाची गाडी वेगवेगळ्या रुळांवरून भरधाव जात होती. "तुम्हारा समुंदर तो हमारे पहाड , तुम्हारे आम तो हमारे सेब, तुम्हारी ट्रेन तो हमारा शिकारा, तुम्हारी कटिंग चाय  तो हमारा कावा असं बोलता बोलता गाडी एका चेकपोस्टपाशी थांबली तो उद्गारला "लो आ गयी 'तुम्हारी' मिलिटरी!!!". मी चपापलो. गाडी पुढे निघाली. मिलिटरीचा विषय आला आणि त्याच्या शब्दांना धार चढली. त्याच्या लेखी मिलिटरी होती, वेळी-अवेळी गावात घुसून घरादाराची झाडाझडत घेणारी, तरण्याबांड पोरांना संशयाखाली उचलून नेणारी, त्याच्या रोजच्या जगण्यावर लक्ष ठेवून असलेली, त्याची "आझादी" संपवणारी , "तुम्हारी मिलिटरी". आपल्यासाठी हे सारं नवीन असतं. मिलिटरीचं वर्णन पण आणि त्याचं दुःक्ख पण. त्यालाही ते कळलेलं असतं तो एवढंच म्हणतो, "जनाब , आप तो कश्मीर देखनेको आते हो, कभी सुननेको आया करो".
तो पुन्हा पुन्हा भेटत राहतो काश्मीरच्या अक्ख्या प्रवासात. कधी कावा पिताना, कधी सफरचंद खाताना. 'अमन कि आशा' त्यालाही असते पण त्यामागची किंमत गेली अनेक वर्षं तो चुकवत असतो. पर्यटन वाढतं, त्याला रोजगार मिळतो, नवीन संधी मिळतात पण तरीही जुन्या, खोलवर झालेल्या जखमांचे घाव भळभळत  राहतात.
गुलमर्गच्या बर्फाच्छादित डोंगरावर उभं राहून जेव्हा तो दाखवतो "वो है पाकिस्तान दाये तरफ और बायें तरफ उस पार आझाद कश्मीर!!" आपल्याला कसनुसं होतं. पाकव्याप्त काश्मीर आपण शिकलेलो असतो ते अचानक आझाद कश्मीर बनून समोर येतं. वर्षानुवर्षं शिकलेला इतिहास, भूगोल सगळं उलटसुलट होऊन समोर येत राहतं. पोम्पोरेचं केशर घेऊन, सोपोरे ची सफरचंद खात, गुलमर्गमध्ये काढलेले बर्फाळ 'slefies' बघत आपण परतीच्या प्रवासाला लागतो. मनात मात्र त्याचं वाक्य घुमत असतं, "जनाब , आप तो कश्मीर देखनेको आते हो, कभी सुननेको आया करो". खास काश्मीरचा आवाज ऐकण्यासाठी पुन्हा यायला आपण काही दिलीप पाडगावकर नसतो. आपल्यापुरता आपण काश्मीरचा प्रश्न संपवलेला असतो. त्यासाठीच तर आपल्याला शिकवलेला असतं, "काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. दूध मंगोगे तो खीर देंगे, कश्मीर मांगोगे तो चीर देंगे"

-अभिषेक राऊत 

1 comment:

  1. कश्मीर..कभी सुननेको आया करो..ek kshan sunna vhayla hta..
    Very well written mitra...feeling nostalgic...!!

    Lokana adhi kashmir pranta hava ki tithle lok asa vicarla tr kashmir prantach nivadtil yat shanka nahi..ani hach khara masla-e-kashmir ahe...

    ReplyDelete