Wednesday, August 2, 2017

आनंदाची गुरुकिल्ली

"मला सांगा , सुख म्हणजे नक्की काय असतं , काय पुण्य केलं कि ते , घरबसल्या मिळतं " ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर समस्त मानवजात नक्कीच आभारी राहील. गंमत अशी आहे कि सुख,समाधान,आनंद ह्या काही बाजारात विकत मिळणाऱ्या गोष्टी नाहीत. सहजासहजी मिळणाऱ्या तर बिलकुलच नाही. सुखाची गंमतही अशी कि एखाद्या चंद्रमौळी झोपडीतला माणूस सुद्धा सुखी असू शकतो पण त्याच वेळेस महालात झोपणारा धनिक सुखी असेलच असं नाही.
सुखाचा शोध हा अविरत चालणारा आहे .प्रत्येकजण आपापल्या परीने शोधत राहतो आनंदाचा , सुखाचा सदरा. रामदास स्वामी म्हणतात , "जगी सर्व सुखी असा कोणty आहे,विचारे मना तूंचि शोधूनि पाहे"
सिग्मान्ड फ्रॉइड म्हणतो , "कल्पनातीत अपेक्षेच्या पूर्ततेतून येणारा भाव म्हणजे सुख." गंमत बघा, सुखाचा शोध हा असा संतांपासून ते शास्त्रज्ञांपर्यंत आपापल्या दृष्टिकोनातून घेत राहतो.
सामान्य माणसांची फार गंमत होऊन जाते बघा, एखादा सर्वसंगपरित्याग केलेला तत्त्ववेत्ता म्हणतो , "गरजा कमी कराल तर आपोआप सुखी व्हाल" त्याच वेळेस एखादा नावाजलेला उद्योगपती म्हणतो , "रिक्षात बसून रडण्यापेक्षा मर्सिडीझ मध्ये बसून रडलेलं बरं ". आजच्या व्यवहारवादी जगात जिथे गरजा कमी करणं हे अशक्यप्राय होऊन बसलंय आणि जिथे पैसे फेकून सुख मिळवता येतं हा विचार रूढ आहे अशा जगात म्हणूनच शाश्वत सुखाचा,आनंदाचा मार्ग शोधणं गरजेचं आहे.
अमेरिकेतल्या कॉर्नेल विद्यापीठात डॉ.थॉमस गिलोवीच हे मानसशास्त्रद्न्य गेली २० वर्षं संशोधन करतायेत कि सुख,आनंद नक्की कशात  असतं ? पैसे खर्च करून एखादी नवीन वस्तू घेतली कि होणारा आनंद, त्या वास्तूच्या वापरातून मिळणारं सुख असं किती दिवस टिकून राहतं ? शाश्वत आनंदासाठी काय करावं ?
त्यांच्या या संशोधनातून आलेले निष्कर्ष फार महत्तवाचे आहेत. ते म्हणतात , "अनुभूतीतून आलेला आनंद हा भौतिक वस्तूंच्या मालकीतून आलेल्या आनंदापेक्षा शाश्वत असतो,
म्हणून तुमचे पैसे अशा गोष्टीवर खर्च करा ज्यातून तुम्हाला आयुष्यभर पुरतील अशा आठवणी गोळा करता येतील."
ते पुढे म्हणतात कि भौतिक वस्तूंतून मिळणाऱ्या आनंदाचे काही तोटे आहेत जसे कि
१.नव्याचे नऊ दिवस - नवीन वस्तू दुसर्या दिवशी जुनी होते आणि तिच्याबरोबरच जुना होतो ती वस्तू घेताना मिळालेला आनंद,झालेलं समाधान. गंमत बघा , नव्याकोऱ्या आय - फोने ने ढीगभर सेल्फी काढले तरी होणारा आनंद जुन्या कपाटात सापडलेल्या रंगीत फोटोच्या तुलनेत कमीच असतो. कारण  तो असतो आठवणीतून आलेल्या  अनुभूतीचा आनंद.
२.वाढीव गरजा - ३० इंचाचा टीव्ही ५४ इंचापुढे छोटा वाटायला लागतो. काल घेतलेला मोबाईल नवीन मॉडेलपुढे निरुपयोगी वाटायला लागतो. भौतिक गरजांची हि ओढ मारुतीच्या शेपटासारखी वाढतच जाते आणि त्या गरजांच्या पूर्ततेतून होणारा आनंदही क्षणिकच ठरतो.
३."भला उसकी सारी मेरे सारी से अच्छी कैसे ?"- तुलना आणि त्यातून येणारी असूया हे मनुष्याचं व्यवच्छेदक लक्षण. आपण नव्या घेतलेल्या वस्तूचा  आनंद होण्यापेक्षा शेजार्यांकडे असलेल्या वस्तूचा जास्त हेवा वाटत असेल तर मग अशा आनंदाला,अशा सुखाला अर्थच काय.
म्हणून डॉ . गिलोवीच म्हणतात , भौतिकतेतून आलेल्या अनंदापेक्षा अनुभुतीतून आलेला आनंद दीर्घकाळ टिकतो आणि सदाबहार असतो .
अनुभूतींच्या आठवणी होतात आणि आठवणी आयुष्यभर आपल्यासोबत दरवळत राहतात . अनुभवांची गंमत पहा ,
कळत नकळत ते तुमचाच एक भाग होऊन जातात .
४ गाडया , २ घरं याच्या पलिकडे तुमची ओळख असतात , तुम्ही घेतलेले आनंदानुभव . ते फक्त तुमचे असतात . ह्या आनंदानुभवांना असूयेची किनार नसते . ते निखळ असतात, त्यांच्या  आठवणी होतात म्हणून शाश्वत असतात.
याच विषयावर संशोधन करणाऱ्या ब्रिटिश कोलंबिया  विद्यापीठाच्या प्राध्यापिका एलिझाबेथ डून म्हणतात,  "वस्तू  कदाचित अनुभवांपेक्षा जास्त काळ टिकत असतील  मात्र अनुभवांच्या आठवणी होतात आणि मनाच्या कोपर्यात रेंगाळणाऱ्या आठवणी आयुष्यभर आनंद देतात." आनंदाच्या अशा आठवणी गोळा करणं मह्त्त्वाचं . सुखाचा , समाधानाचा मार्ग त्यातूनच जातो . कदाचित म्हणूनच वेगवेगळ्या महागड्या वस्तूंनी सजलेल्या दिवाणखान्यापेक्षा अमूल्य अशा आनंदानुभवानी आणि आठवणींनी भरलेलं मन जास्त सुख देतं .
- अभिषेक राऊत.
(ट्रेव्हिस ब्रॅडबरी ने फोर्ब्स मासिकासाठी लिहिलेल्या "व्हाय यु शुड स्पेंड मनी ऑन एक्सपीरिअन्स , नॉट थिंग्स " या लेखाचा स्वैर अनुवाद.)

Tuesday, April 11, 2017

गाड्याची शर्यत - एक मुक्तचिंतन

"१२ सेकंद २५ मिली,फक्त १२ सेकंद २५ मिली. अत्यंत विक्रमी वेळेत याठिकाणी शर्यत पूर्ण केलेली आहे . ढेबेगावच्या  पाटलांच्या बैलजोडीनं ही  कमाल केलेली आहे याठिकाणी  आणि गाडामालकांचे हार्दिक अभिनंदन."

लाऊडस्पीकरवरचे हे शब्द आसमंतात घुमत जातात, गाड्याने
उडवलेला धुराळा खाली बसत जातो आणि मगाशी वाऱ्याच्या
वेगाने  धावणाऱ्या बैलजोडीला कासरा  धरून परत  आणलं जातं . गुलाल उधळून त्यांचं कौतुक करायचं असतं ना.

गावच्या जत्रेत मजा असते. मंदिरावरची  रोषणाई, जत्रेतील  बाजार,खास जत्रेसाठी  आलेल्या  माहेरवाशिणींची  लगबग, रातच्याला रंगणाऱ्या तमाशातली गाणी बतावणी,कुस्त्यांच्या  फडात शड्डू ठोकत  एकमेकांना  चीत  करणारे  पहिलवान  आणि  याउप्पर एखाद्या फॅशन  शो  मधली शो स्टॉपर  असावी अशी  गाड्यांची  शर्यत.

मंदिरासमोरच्या छोटयाश्या टेकडावर आखले जातात गाड्यांसाठीचे मार्ग. पंचक्रोशीतले गाडे जमा होतात. वर्षभर ज्यांच्यावर मेहनत घेतलीये, ज्यांना  जीव लावलाय, खुराक दिलाय असे बैल जोडले जातात त्यांना.भगवा जरीपटका घेऊन  शर्यतीचा अश्व  दौडत  पुढे जातो आणि त्याच्या मागे , गाड्याला जोडलेले बैल.काही सेकंदांचा थरार फक्त , थोड्याश्या फरकाने एखादा गाडा पडतो मागे आणि डार्विनने म्हटल्या प्रमाणे "Survival of the fittest" च्या तत्वाने  जिंकतो  कुणीतरी एक आणि मागे उरतात , फेटे उडवणारे , टोप्या नाचवणारे तुमच्या आमच्या सारखी माणसं. धुरळा विरत  जातो, जिंकलेल्यांचा आवाज घुमत जातो तेव्हा लक्षात येतं , बेभानपणे गाडा ओढत मालकाला जिंकवलेल्या बैलांना वेसण घालून परतही आणायचं असतं .

त्या तिकडे दूर. तामिळनाडूत सुद्धा असंच काहीस. मोकळे  सोडलेले धिप्पाड बैल आणि त्यांना अडवणारे , अंगावर धावून जात त्या बैलांना वेसण घालणारे तरुण.कुठे गाडयांची शर्यत तर कुठे जल्लीकट्टू.माणसानेच तयार केलेले हे शुद्ध खेळ, त्याचं समर्थन करण्यासाठी लढवलेल्या नवनवीन शकला आणि त्यात धुराळा उडवत धावणारे, भिरभिरणाऱ्या नजरेचे बैल.

इतिहासाच्या पुस्तकात वाचलेलं असतं माणसाच्या उत्क्रांती विषयी, आगीचा शोध, चाकाचा शोध,शेती,समाज,मग प्राण्यांचा वापर शेतीसाठी. या सगळ्यात माणूस समजतो, त्याच्या चालीरीती समजतात. दहावीच्या पुस्तकात वाचलेला असतो एखादा धडा, बैलावरच्या प्रेमाचा. माहीत असतं बैलपोळ्याला किती आत्मीयतेने भरवतात पुरणपोळी बैलांना आणि मग शर्यतीच्या दिवशी जिवाच्या आकांताने गाडा  ओढणाऱ्या बैलांना पाहिला कि हे सगळं झर्र्कन आठवून जातं.

सोप्पं नसतंच खरंतर शर्यतीचा बैल घडवणं . मेहनत असते,खर्च असतो . वर्षभर बैलांची  शाळा घेतली जाते, बारा सेकंदांच्या "ग्लोरी रन" साठी. डोळे उघडे ठेवून नीट पाहिलं तर लक्षात येतं कि धावतो बैल पण जिंकतो माणूस. अशावेळी  वाटतं, प्रचंड बुद्धिमान असण्याबरोबरच कमालीचा दुटप्पीये माणूस . किती सहजपणे वाकवतो तो निसर्गाला , निसर्गातल्या प्राण्यांना , फार कुशलतेने वापरून घेतो आणि मग एखादा दिवस , एखादा सण किंवा एखादी प्रथा , परंपरा माथी मारतो कृतज्ञता व्यक्त करायला. कमालीच्या धूर्तपणे स्वतःच ठरवतो कुणाला शर्यतीत धावायला लावायचं , कुणाला नांगराला जुंपायचं , कुणाला कत्तलखान्यात द्यायचं. खरंतर किती कठीण आहे दुसर्याच्या आनंदासाठी,प्रतिष्ठेसाठी
स्वतः शर्यतीत धावणं.ज्याक्षणी माणसाला कळलं असेल, आपल्या  कामासाठी प्राण्यांना वापरणं, खरंतर त्याच क्षणी   या शर्यतीची  बीजं रोवली गेली असतील. गाड्याची शर्यत बघताना हे सगळं प्रकर्षाने जाणवत राहतं.

ऊर फुटेस्तोवर धावणार्याला जिंकण्याचं सोयरसुतक नाही.
त्याला कदाचित  समजतही नसेल जिंकणं म्हणजे काय  हरणं म्हणजे  काय. वर्षभर त्याच्यावर घेतल्या जाणाऱ्या मेहनतीने बैलाला जाणवत असेल का, कि आपलं टॅलेंट वेगळं आहे, शर्यतीच्या दिवशी परफॉर्मन्सचं टेंशन त्यालाही असेल का, शर्यतीच्या अश्वाकडे बघत बेभान धावताना त्याला कळत असेल का शर्यत कधी संपली, "जिंकली रे जिंकली" म्हणत मागच्या धुराळ्यातून धावत, टोप्या उडवत येणाऱ्यांचा आनंद त्याला कळत असेल का. मग असं वाटतं ,कदाचित  इतकं सगळं जाणवून फारसा फायदा नाही. गाड्याची शर्यत एक निव्वळ खेळ आहे. माणसाला आनंद मिळावा म्हणून माणसाने , माणसांसाठी तयार केलेला. बैलांनी त्यात जीव  तोडून पण निमूटपणे धावायचं फक्त. म्हणजे लोकांना आनंद मिळेल, टोप्या उडवता येतील, गुलाल उधळता येईल आणि गाडामालकांना प्रतिष्ठेच्या गावगप्पा  सांगता येतील.

निव्वळ एक खेळ. शर्यतीचा खेळ. खेळणारे आपण सगळेच.मग जाणवत जातं आपणही आहोतच या खेळात. वर्षानुवर्षे धावत. आपापला गाडा ओढत धावणारे, तोंडाला फेस येईपर्यंत. आपापल्या शर्यतींचे आपण बैल. आपल्याला खेळवणारं तसं तर कुणीच नाही. तरीही आपण आपली शर्यत धावतो. न  थाबणारी. न संपणारी. कारण शर्यतीत गंमत आहे , थरार आहे , भाव भावना , विभ्रम आहेत , हार-जीत आहे, जीव थकेल, श्वास गुदमरेल , अंग पिळवटेल इतकी मेहनत आहे पण तरीही आपल्याला आपली शर्यत प्रिय आहे.
हे जे आपलं अविरत धावणं आहे , त्याची सुरुवात,शेवट , जिंकण्याचे आयाम, यातल्या नक्की कशाचं भान असतं का आपल्याला? जन्माला आल्यापासून कुणाच्या तरी सांगण्यावरून किंवा मग स्वतःच्या मनाने किंवा मग दुसऱ्यासाठी कुणासाठी आपण आपली शर्यत धावतो तेव्हा क्वचित कधीतरी जाणवतं का आपल्याला कि आपलाही बैल झालाय.किंवा मग आपणच समजूत घालतो  का  स्वतःची  कि शर्यत अशीच असते त्यात जीव तोडून धावताना कशाचंच भान नसतं आणि जेव्हा भान येतं तोपर्यंत शर्यत संपलेली तरी असते किंवा आपण बाहेर तरी फेकलो गेलेलो असतो.

शर्यत निरर्थक आहे का? नाही धावलो आपण आपली शर्यत तर काय?, असले मूलभूत प्रश्न आपल्याला पडतच नाहीत. किंबहुना वर्षानुवर्षे शर्यत धावणाऱ्या प्रत्येकाने हे प्रश्न नव्या भिडूला पडूच नयेत याची तजवीज केलेली असते. ब्रीदवाक्य होऊन जातं,"कीप रनिंग". थोडं थांबून सिंहावलोकन करायचं याचंसुद्धा भान राहत नाही. मॅस्लोने त्याच्या जगप्रसिद्ध "थेरी ऑफ नीड्स"मध्ये म्हटल्याप्रमाणे आधी भौतिक मग ऐहिक मग सामाजिक मग आत्मिक सुखासाठी,गरजांसाठी, अपेक्षांसाठी,ध्येयासाठी माणूस धावत जातो अविरत शर्यत.

इतकं सारं मुक्तचिंतन करूनही काय साधणार आहे. शर्यत अपरिहार्य आहे. ती सत्य आहे. मनुष्याच्या पिढ्यानपिढ्या स्वतःशी,काळाशी, तर्कांशी ,सर्वंकष सत्तांशी ही शर्यत खेळल्या आहेत आणि म्हणूनच आज उभ्या आहेत जिंकून.शर्यत अनादी आहे अनंत आहे. डार्विनच्या उत्क्रांतीचा सिद्धांत सुद्धा शर्यतीचंच रूप आहे. शर्यत असेल तर थरार आहे,जिवंतपणा आहे,चुरस आहे,स्वतःला सिद्ध करण्याची धडपड आहे आणि विजयाचा आनंद आहे. शर्यत नुसता खेळ नाही ती एक जिवंत रसरशीत भावना आहे.

जन्मापासून अविरत धावताना हि शर्यत का आहे आणि कुठवर आहे हे जोपर्यंत आपल्या ध्यानात आहे तोपर्यंत आपण माणूस म्हणून जगू. ज्याक्षणी ह्याचा विसर पडेल त्याक्षणी मग त्या बैलजोडीत आणि आपल्यात फारसा फरक उरणार नाही.

-अभिषेक राऊत