Wednesday, October 22, 2014

अॅश-ट्रे


उनकलत्या दुपारची वेळ असते. उजव्या बाजूच्या खिडकीतून येणारी उन्हाची तिरीप टेबलावर विखुरलेल्या कागदांशी खेळत असते. सकाळपासून काहीतरी लिहिण्याचा चाललेला प्रयत्न, विखुरलेल्या कागदांतून, थंड झालेल्या कॉफी मधून आणि भरत चाललेल्या अॅश-ट्रे मधून जाणवत राहतो. काहीच सुचत नसतं. विचारांची आवर्तनं मुक्तछंदात फिरत राहतात पण कागदावर उमटत नाहीत. वाफाळत्या कॉफीचं कधीच गोमूत्र झालेलं असतं. आता लिहायचंच या निश्चयाने  एक कोरा करकरीत कागद ओढून तुम्ही सुरुवात तर करता पण विचार आणि शब्द हातात हात गुंफून येतच नाहीत. दिवसभर चाललेला त्यांचा लपाछपीचा खेळ तसाच चालू राहतो. तुम्ही वैतागता. उजव्या हातातलं पेन तसंच ठेवून डाव्या हाताने सिगरेटचं पाकीट शोधता. आज काही सुचतच नाहीये या तरमरीत तुम्ही ती शिलगवता. दोन तीन लांबलचक कश घेता. तिच्या टोकाशी आता  अॅश जमा होते. अस्ताव्यस्त टेबलावर कोपऱ्यात गेलेला अॅश-ट्रे तुम्ही खेचून जवळ घेता, आणि तुमच्या लक्षात येतं, कागद रिकामे राहिलेत पण दिवसभरात अॅश-ट्रे मात्र भरून गेलाय.

अक्ख्या अॅश-ट्रे मध्ये विखुरलेली सिगारेटची थोटकं, राख आणि मगाशी विझवलेल्या सिगारेटचा धुगधुगणारा धूर. किती काय काय असतं त्या भरलेल्या अॅश-ट्रे मध्ये. काही सिगारेटी पूर्ण अगदी फिल्टरपर्यंत ओढून ओठाला चटका लागल्यावर विझवलेल्या. काही अर्धवट मध्येच खुडून टाकलेल्या. काही घाईघाईत संपवलेल्या. काही दुसऱ्या ब्रान्डच्या, न झेपलेल्या आणि म्हणून लगेचच विझवलेल्या. काही महागड्या तर काही सध्या. शेवटी धूर होऊन राखेत झोपून राहिलेल्या. विखुरलेल्या थोटकांनी भरलेल्या  अॅश-ट्रे वरून निघून तुमची नजर टेबलवर स्थिरावते.

टेबलावरही विखुरलेल्या कागदांचा पसारा. एकेक कागद म्हणजे जणू एकेक विचार. काही अर्धवट सोडून  चुरगाळून टाकलेले. काही अगदी शेवटपर्यंत लिहिलेले पण शेवट मनासारखा होईना म्हणून ठेवून दिलेले. काही घाईघाईत खरडायचे म्हणून खरडलेले आणि मग मनासारखे झाले नाहीत म्हणून फेकून दिलेले. काही विचार नुसते क्षणभर आलेले म्हणून कागदावर उतरवलेले आणि मग पुन्हा विस्कटून गेलेले. काही न झेपणारे विचार वेगळ्याच ब्रांडच्या सिगारेटीसारखे त्यांचाही चुराडा करून फेकलेला. बघता बघता अक्खा टेबल म्हणजे विचारांचा अॅश-ट्रे होऊन जातो. सगळे विचार शब्दांचा धूर करून कागदांच्या राखेत झोपून गेल्यागत दिसू लागतात.

विचारांच्या त्या अॅश-ट्रे वरून तुमची नजर हटते आणि डाव्या बाजूच्या हातभार उंचीच्या आरशाकडे जाते. तुमची नजर असे अनेक अॅश-ट्रे शोधत राहते. आयुष्यात येणारे लोक. असेच विखुरलेले. काही तुमच्या 'loyal' ब्रांड सारखे शेवटपर्यंत सोबत देणारे. प्रत्येक कश सोबत रंगतदार होत जाणारे. काही तुम्ही मध्येच खुडून टाकलेले. काही नुसतेच क्षणभर आलेले पण कायमची 'kick ' देऊन गेलेले. काहींसोबत जमलंच नाही तुमचं जणू काही तुमच्या ब्रान्डचे नव्हतेच ते. असे अनेक तुमच्या आयुष्यभर विखुरलेले. आयुष्याच्या भव्य अॅश-ट्रे मध्ये त्यांच्या आठवणींची राख उरलेली असते आणि तुम्ही त्यांच्यासोबत घालवलेले क्षण कधीच धुरासारखे दूर दूर गेलेले असतात.

अजून एक दिवस संपलेला असतो आणि अजून एक अॅश-ट्रे  भरून गेलेला असतो.

-अभिषेक राऊत. 

Tuesday, October 14, 2014

" सत्तेचे स्वयंवर "


" सत्तेचे स्वयंवर "


आज तिच्या लग्नाचा दिवस. गेले पंधरा दिवस तिच्या लग्नाची तयारी सुरु होती. धावपळ, गडबड , गोंधळ आणि कार्य तडीस नेण्याची इच्छा. हे सगळं करायचं तिच्यावरच्या प्रेमापोटी. खरं तर तिचं रंगरूप इतकं खास नाही पण एकदा का हिचं लग्न झालं की आपल्या आयुष्यात आलेल्या  व्यक्तीचं रंगरूप आणि बरंच काही ही बदलवून टाकते. त्यामुळे हिच्याशी लग्न करायला उत्सुक असणाऱ्यांची संख्या बरीच. "एक अनार और सौ बीमार " असं म्हणा हवं तर. अशा परिस्थितीत काय करायचं हे आमच्या पुराणांमध्ये सांगून ठेवलंय. अशा वेळी एकच उपाय आणि तो म्हणजे "स्वयंवर".

स्वयंवर म्हटलं की एकमेकांना शह-काटशह देणारे धुरंधर आले. नवनव्या युक्त्या-प्रयुक्त्यांनी तिच्यावर आणि तिच्या मायबापावर मोहिनी घालणारे जादुगार आले. या देशात मुलीचा होकार मिळवायचा असेल तर आधी तिच्या मायबापांनी तुमचा स्वीकार करणे गरजेचं असतं. त्यामुळे स्वयंवर तिचं असलं तरी तिच्या मायबापाला खुश करण्यावर प्रत्येकाचा भर. गेले पंधरा दिवस फक्त तिचा विचार करणाऱ्या साऱ्याच धुरंधर वीरांसाठी आजचा स्वयंवराचा दिवस म्हणजे फारच महत्व्वाचा.

एका भव्य मंडपात हे सगळे धुरंधर जमलेले. काही जण गुडघ्याला बाशिंग बांधूनच आलेले. काही फारच 'confident'. त्यांना म्हणे घराण्यातूनच परंपरेने स्वयंवर जिंकण्याच ट्रेनिंग मिळालेलं असतं. काही जण नुसते हौशे 'लग्न पाहावं करून' म्हणून आलेले. काही सच्चे प्रियकर ह्यांच्याकडे तिच्या मायबापांना देण्यासाठी काही नसतं पण तत्त्वांची आणि प्रेमाची ताकद असते. काही उपेक्षित पण मग त्यांना फार काळ थांबवत नाहीत त्यांचे मंडप राखीव आणि वेगळे असतात म्हणे.

 गेले पंधरा दिवस त्यातल्या प्रत्येकाने दौलतजादा केलेली असते . काहींनी तिच्या मायबापाला पैसे, साडी-चोळी , खण -नारळ दिलेला असतो . काहींनी मोबाईल फोन, टी.वी. ते अगदी केबल कनेक्शन घेऊन दिलेलं असतं . काहींनी तिच्या मायबापांनाच नव्हे तर अक्ख्या भावकीत जेवणावळी आणि दारू पार्ट्या दिलेल्या असतात. काहींनी भविष्याची सुंदर चित्रं रंगवलेली असतात . काहींनी नुसतेच शब्दाचे खेळ खेळलेले असतात तर काहींनी स्वयंवराच्या धामधुमीत आपली स्वताची धन करून घेतलेली असते. प्रथेप्रमाणे सगळं घडतं. फटाक्यांच्या लडी फुटतात, दारूच्या नद्या वाहतात, गुलालाच्या रंगात आसमंत न्हाउन निघतो. प्रतिस्पर्ध्यावर मात करत तिला घरी घेऊन जाणारा एकच असतो. तिला जिंकल्याच्या उन्मादात आता तिचं कन्यादान करणाऱ्या तिच्या  मायबापांचा सोयीस्कर विसर पडणार असतो.

तिचं नाव असतं सत्ता. तिच्या मायबापाला आम्ही जनता म्हणतो आणि स्वयंवराच्या या सोहळ्याला निवडणूक. राजेशाहीने घालून दिलेली स्वयंवराची ही पद्धत आम्ही गेली ६५ वर्षं पाळतोय कारण त्यामुळेच आमची लोकशाही जिवंत आहे सुद्रुढ आणि ठणठणीत नसली तरी.

- अभिषेक राऊत