Monday, December 9, 2019

डायना मावशी आणि शनिवारची दुपार.

 डायना मावशी अर्थात प्रिन्सेस डायना हिच्या बद्दल मला सगळ्यात पहिले ज्या पद्धतीने कळलं तो दिवस हा खरंतर तिच्या अपघाती मृत्यूचा होता. मी आणि आई हॉल मध्ये गप्पा मारत बसलो होतो. संध्याकाळची वेळ होती आणि घरचा दरवाजा उघडाच होता. (त्या काळी फ्लॅट मध्ये राहणाऱ्या शेजार्यांचे एकमेकांशी चांगले संबंध असायचे आणि शक्यतो संध्याकाळी सगळ्यांचेच दरवाजे उघडेच असायचे. ) आमच्या शेजारचा दादा धावत आमच्या घरी आला आणि म्हणाला, "अहो काकू,  डायना मावशी गेली. या ना टीव्ही वर दाखवतायेत..".  त्या क्षणाला माझ्या डोक्यात दोन - तीन  प्रश्न आले ते मला स्पष्टपणे आठवतायत. एक म्हणजे, पाटील आडनाव असलेल्या महाराष्ट्रीयन माणसाच्या मावशीचं नाव डायना कसं काय असू शकतं??  आणि समजा असलंच तरी मावशी गेल्याचं कोणी हसत,  धावत येऊन कसं काय सांगेल?? आणि त्या ही पलीकडे ही मावशी इतकी फेमस आहे की ती गेल्याचं टीव्हीवर दाखवतायेत???
नंतर लक्षात आलं की ही डायना म्हणजे इंग्लंडच्या राणीची सून, युवराज चार्ल्सची बायको. तिचा मृत्यू झाला,  अपघातात.  सौदीच्या उद्योगपतीसोबत गाडीत असताना मागावर असणाऱ्या "पापाराझीं" पासून बचाव करताना. अर्थात पापाराझीं चा अर्थ मला दुसऱ्या दिवशी मराठी वृत्तपत्रांतून कळला.
नंतर जवळजवळ आठवडाभर सगळ्या वृत्तपत्रांमध्ये  डायनाबद्दल लिहून येत होतं. ते कळण्याइतका मोठा मी नव्हतो तेव्हा.  पण  अर्थातच डायना बद्दलचं कुतूहल संपलं नव्हतं. नंतर काही वर्षांनी मी डायना बद्दल,  तिच्या आयुष्याबद्दल,  तिच्या चार्ल्स सोबत बिघडलेल्या संबंधांबद्दल वाचलं. तिचा अपघात,  त्या मागच्या थिअरी वाचल्या. तिचे निळे डोळे, गळ्यातली मोत्यांची माळ आणि देखणं हसू यात काहीतरी मेस्मराइजिंग वाटायचं. प्रसारमाध्यमांनी तिची उभी केलेली "आहे मनोहर तरी  गमते उदास " ही प्रतिमा मनात रुतून बसलेली.
शनिवारच्या निवांत दुपारी हाईड पार्कच्या हिरवळी वरून चालताना हे आठवत होतं. डायना मेमोरियल फौंटन बघायचं होतं. या मेमोरियल कडे जाण्याचा रस्ता फार सुरेख आहे. त्याचं नावच मुळात "द डायना,  प्रिन्सेस ऑफ वेल्स मेमोरियल वॉक "
एका बाजूला हाईड पार्कची हिरवळ आणि दुसऱ्या बाजूला सर्पेंटिने तळ्याचा काठ. निवांत दुपारी नौकाविहार करणारे टुरिस्ट,  तळ्याकाठने डौलात विहरणारे राजहंस बघत बघत चालत राहायचं. मेमोरियल कडे जाणाऱ्या मार्गात दर दीडशे मीटरवर,  पंचधातूचं गुलाबाचं फूल कोरलंय. चालता चालता त्या गुलाबाच्या फुलाकडे नजर जातेच. एल्टन जॉनने डायनाच्या अंत्यविधीला गायलेलं,  "गुडबाय इंग्लंडस रोज, मे यु एव्हर ग्रो इन  आवर हार्ट्स" हे गाणं नकळत कानात वाजायला लागतं. जगभरात अंदाजे अडीचशे कोटी लोकांनी तिच्या अंतिम निरोपाचा प्रसंग पाहिला. आज सुद्धा तिच्या मेमोरियल फौंटनला वर्षाला आठ लाख लोक भेट देतात. बावीस वर्षांनंतरही डायनाचं गारुड कमी होत नाही.
‌मेमोरियल फाऊंटनच्या दरवाजातच तिचा हसरा फोटो लावलाय. आत शिरताच लक्षात येतं हे "This is not a regular fountain".   हाईड पार्कच्या नैसर्गिक उताराचा उपयोग करत, कॉर्निश ग्रॅनाईट मध्ये बांधलेले हे कारंजे रूढार्थाने कारंजासारखे नाहीच मुळी. या कारंज्याचं पाणी थुईथुई नाचत नाही. यातलं पाणी वाहतं. खळाळतं. आजूबाजूला हिरवाई आणि मध्येही  हिरवाई. त्यामध्ये बांधलेल्या ग्रॅनाइटच्या घळीतून पाण्याचा हा प्रवाह अखंड सुरु राहतो. इतर कारंज्यांसारखं नुसतं कडेकडेने फिरायचं आणि चार हात लांबून सौंदर्य बघायचं असं इथं नाही.  एक छोटीशी पायवाट तुम्हाला थेट कारंज्याच्या मध्यात असलेल्या हिरवळीवर आणून सोडते. सभोवार नजर टाकली की दिसतात वाहणाऱ्या पाण्यात खेळणारी लहान मुलं. एकमेकांच्या अंगावर कारंज्याचं पाणी उडवणारं तरुण जोडपं किंवा मग नुसतंच पाण्यात पाय सोडून बसलेली इंग्लिश आज्जी. कारंज्याच्या मध्यातून पुन्हा त्याच्या कडेला यावं आणि खळाळत्या पाण्याच्या सोबतीने एक चक्कर मारावी. मी काही जगातले प्रसिद्ध फाऊंटन्स पाहिलेले नाहीत. उंचच उंच उडणाऱ्या पाण्याचं,  त्याच्या तुषारांचं, संगीताच्या तालावर नाचणाऱ्या रंगीबेरंगी कारंज्यांचं मला आकर्षण आहेच. तरीसुद्धा, हा वाहणारा,  पाण्याला उंचावर, अधिक लांबवर न नेता जवळ आणणारा आणि सहजपणे ज्याच्या अवतीभवती बागडता यावं, गाभ्यात शिरता यावं असा वेगळासा कारंजा मनात घर करून राहिलाय.
बकिंगहॅम पॅलेसच्या समोरच्या व्हिक्टोरिया मेमोरियलचा ग्रँडपणा या मेमोरियल मध्ये नाही. पण डायनाच्या मेमोरियल मध्ये आपलेपणा,  सहजपणा आहे. मेमोरियलच्या डिझाईन मध्ये,  त्या मागच्या थॉट मध्ये आणि त्याच्या एक्सिक्युशन मध्ये सुद्धा.  प्रिन्सेस  डायनाच्या सामाजिक आयुष्यातही तो होताच. म्हणून तर ती नुसती प्रिन्सेस न राहता "People's Princess" ठरली.  डायनाच्या हसऱ्या फोटोकडे पाहत मी तिथून निघालो. शनिवारची दुपार समाधानकारक होती.





- Abhishek Raut

Wednesday, July 3, 2019

अपूर्ण इच्छांचा उत्सव



काळ्या स्क्रीनवर शेवटची कमांड लिहून त्याने एंटर दाबलं.  गेले दीड तास चाललेला प्रॉब्लेम सुटला. आता 'appreciation mail ' येईल. "Weekly Achievers" मध्ये नाव आणि फोटो येईल आणि बाकी सर्व मागच्या पानावरून पुढे सुरु राहील. त्याने डोळे मिटले आणि आळस दिला. मागची काही वर्ष झरझर त्याच्या डोळ्यांसमोर आली. आपल्याला काय करायचंय या प्रश्नाचं उत्तर सापडेपर्यंत एका IT कंपनीत येउन तो स्थिरावला होता. वेगवेगळ्या शिफ्ट्स मध्ये येउन क्लायंटच्या नेटवर्कची देखभाल करायची हे त्याचं काम. नक्की काय करायचंय हे माहीत नसणं किंवा माहित असूनही करता न येणं आणि जे करत आहोत ते आवडत नसणं हे ऐन पंचविशीतले दोन प्रॉब्लेम्स त्यालाही सतावत होते. आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय. आपल्याला काहीतरी वेगळं करायचं होतं. झपाट्यानं त्याचं मन भूतकाळात जायला लागलं. खूप लहान असताना त्याला पायलट व्हायचं होतं. पप्पा त्यांचा कॅमेरा घेऊन फोटोग्राफी करायचे तेव्हा त्याला वाटायचं मॉडेल व्हावं. थोडासा मोठा झाला तेव्हा त्याला गिटार सापडली. पप्पांचे मित्र यायचे; त्यांच्यातलाच एक गिटार वाजवायचा. आपण गिटारिस्ट व्हायचं हे त्याने मनोमन ठरवलं. त्याला आठवलं , त्यानं ठरवलं तसं काही झालंच नाही. एक दिवशी अचानक पप्पानं स्वतःच्या बॅग्स उचलल्या कॅमेरा घेतला आणि कुठेतरी निघून गेला. जाताना त्याचा गालगुच्चा घेऊन आणि त्याच्यासाठी नवीकोरी गिटार ठेवून गेला. काही महिने त्याने मम्मीला विचारलं पप्पा कुठे गेला, असं न सांगता कुणी जातं का. त्याला वाटायचं कि मम्मी पप्पावर खूप चिडलीये पण कारण कळायचं नाही. ह्याला कधी पप्पाचा फारसा राग आला नाही. पप्पाचा राग. त्याला आठवली ती रात्र. बारावीच्या निकालानंतर काय करायचं असं मम्मीने विचारल्यावर तो म्हणालेला, "मला म्युझिकमध्ये करिअर करायचंय. गिटारिस्ट व्हायचंय. गिटार वाजवणं माझं पॅशन आहे." मम्मीने मला दोन कानाखाली मारल्या आणि म्हणाली, "पॅशनच्या गप्पा मला नको सांगूस." त्या क्षणी त्याला पप्पाची खूप आठवण आली. पप्पा असता तर त्याने बरोब्बर मम्मीला समजावलं असतं. का नव्हता तो त्या वेळेला. पप्पानेच दिलेली ना ती गिटार मग आता मम्मी खेचून घेत होती तेव्हा पप्पा इकडे हवा होता. त्याने काळजी घ्यायला हवी होती गिटारची. आणि अचानक त्याला जाणवलं कि ती काळजी असती तर तो असं अचानक त्याला आणि मम्मीला सोडून गेलाच नसता. त्या दिवशी रात्री मम्मीला गिटार कुलूपबंद कपाटात ठेवताना पाहून आणि स्वतः उशीत डोकं खुपसून रडताना त्याला पप्पाचा खूप जास्त राग आलेला... खूप जास्त.  आणि मग दिवसागणिक, वर्षागणिक तो राग साचत गेला, वाढत गेला.


मोबाईलच्या रिंगटोनने तो भानावर आला. "नमस्कार मी विसावा वृद्धाश्रमातून बोलतेय. येत्या रविवारी आम्ही एक कार्यक्रम ठेवलाय त्यात तुमच्या वडिलांनी काढलेल्या फोटोसचं प्रदर्शन सुद्धा आहे. तुम्हाला यायला आवडेल का?"

 "अं... हां म्हणजे मी कळवतो तुम्हाला तसं तुम्ही मला वेळ मेल करून ठेवा"

याच फोटोसने, कॅमेऱ्याने या माणसाच्या संसाराची, आयुष्याची धूळधाण केली, ह्याला वृद्धाश्रमात आणून सोडलं तरीही ह्याची फोटोग्राफी काही जात नाही आणि आपण इतक्या सहजपणे तेव्हा गिटार सोडली. आजही गिटार, म्युझिक आपल्याला बोलवत असतं पण ही हातातली नोकरी सरळसोट सोडून देता येत नाही आणि मनात आपण विचार करत राहतो कि आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय, त्याने रागात कॉम्पुटर बंद केला आणि सिगरेट मारायला स्मोकिंग झोन कडे निघाला. येत्या रविवारी बाकीचे सगळे कार्यक्रम रद्द करून वृद्धाश्रमात जायचं त्याने ठरवलं. इतके वर्ष साचलेल्या रागाला वाट मोकळी करून द्यायला.


गाडी पार्क करून तो हॉलमध्ये आला. तिकडे त्याच्या पप्पाने 'क्लिक' केलेले काही फोटोग्राफ्स मांडून ठेवले होते. त्याच्या पप्पाचे काही तिथलेच वृद्ध मित्र, दोन चार महाविद्यालयीन तरुण होते तिकडे. तो पप्पाजवळ आला. त्याला जाणवलं वयापेक्षा फार लवकर म्हातारा झालाय पप्पा. "हा माझा मुलगा." पप्पाने सोबतच्या दोन वृद्धांना त्याची ओळख करून दिली. त्यांच्या डोळ्यांत त्याला एकाच वेळी त्याच्याबद्दलचं प्रेम आणि पप्पांबद्दलचा हेवा दिसला. त्यांच्या इतक्या जवळचं, इतक्या रक्ताच्या नात्याचं कुणी तिथे येत नसावं बहुदा. तितक्यात ते दोन तीन तरुण तिथे आले आणि पप्पा बोलू लागला, "मी तसा कॅमेरा आजकाल ठेवूनच दिलाय रे बाजूला. हे पोरं इथे येत असतात आमच्याशी गप्पा मारायला.  ह्यांच्या हातात लागला ; तर म्हणे आपण प्रदर्शन भरवूयात. आता काय म्हणत होते कि तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये या फोटोग्राफीचं वर्कशॉप घ्यायला. बाकी तू येशील असं वाटलं नव्हतं."

 "हं .. कधी कधी आपल्याला वाटत नसतं तसंच वागतात लोक" तो जरा घुश्श्यातच म्हणाला.

"हं ते ही खरंच. चल जरा फिरून येऊ."

तो पप्पांसोबत फिरायला निघाला आणि बोलता बोलता दोघं त्यांच्या खोलीजवळ आले. "ये. ही माझी खोली. सवय झालीये आता एकटं राहायची."

"एकटं राहण्याबद्दल तुम्ही मला नका सांगू पप्पा. तुम्ही गेल्यापासून आम्ही एकटंच राहतोय."

"हं.. मी परत आलो नाही हे खरंच. फोटोग्राफी माझं जगणं झालं होतं. ती  असाइनमेंट म्हणजे एक खूप मोठी संधी होती. हातातली नोकरी, तुम्ही दोघं, सगळं सोडून मी गेलो." त्यांना मध्येच तोडत तो म्हणाला, "हो तू गेलास. 'तुझ्या'  पॅशनसाठी पण त्या अनुभवाने मम्मी इतकी कडवट झाली कि मला माझी गिटार, म्युझिक सारं काही सोडून द्यावं लागलं. केवळ तुझ्यामुळे. बरं गेलास ते गेलास आणि परत आलास तर ते सुद्धा एक अयशस्वी फोटोग्राफर म्हणून"?

 "अच्छा म्हणजे मी यशस्वी झालो असतो तर माझ्या नावाचा उपयोग करून मी तुला एक गिटारिस्ट म्हणून 'सेटल' केलं असतं असं होय"?

"होय. इतके वर्षं तुझं नाव लावल्याचा काहीतरी फायदा झाला असता."

"हं खरंय. ना मी एक चांगला बाप झालो ना एक चांगला फोटोग्राफर."

पप्पाला मध्येच तोडत तो पुन्हा म्हणाला "तुझ्या या अशा बेजबाबदार वागण्यामुळे मलाही गिटारिस्ट नाही होता आलं. मी गिटार सोडली, नोकरी करतोय, दर महिन्याला या वृद्धाश्रमाचे पैसे भरतोय आणि तू मात्र अजूनही तुला आयुष्यभरासाठी फेल करणारी फोटोग्राफी सोडत नाहीयेस. तुला काहीच कसं वाटत नाही रे पप्पा"?

इतका वेळ आपल्या पोराच्या डोळ्याला डोळा न देणाऱ्या पप्पाने वर पाहिलं, नजर रोखली आणि म्हणाला, "माझ्या नावाखाली स्वतःचा पळपुटेपणा लपवू नकोस. माझ्यामुळे कदाचित एकदा तुझ्यापासून गिटार दुरावली असेल पण निर्णायक क्षणी तू स्वतःतरी अशी कितीदा तिला स्वीकारलीयेस"?

 पप्पाच्या त्या वाक्याने त्याला आठवलं, कॉलेजच्या लास्ट इयरला असताना म्युझिक बँड बनवण्याची हाताने घालवलेली संधी, नंतर नोकरी लागल्यावर कमी झालेली प्रॅक्टिस, काहीतरी वेगळं करायचंय असं ऑफिसमध्ये म्हणायचं आणि वेळ आली कि 'म्युझिक गिग' सोडून ओव्हरटाईम करायचा. पप्पाला दोष देता देता त्याची पॅशन वयाच्या पंचवी-तिशीतच मरू लागली होती. बराच वेळ तो शांत राहिला.

पप्पा त्याला म्हणाला, "फार विचार करू नकोस. मी पॅशनेट म्हणून मरेन आणि तू असाच जगत राहिलास तर प्रॅक्टिकल म्हणून मरशील. तोवर तुला जसा वेळ मिळेल तसा इथे येत राहा".

 पप्पा अंथरुणातून उठला. सहजपणे त्याने हात पुढे केला. त्याचा हात धरून पप्पा कपाटाजवळ आला त्याने कपाट उघडलं आणि आत ठेवलेली नवी कोरी गिटार त्याला दिली, म्हणाला, "हे घे. मला माहित होतं तू आज येशील. लगेच सगळं सोडून गिटारिस्ट हो असं नाही म्हणणार मी. तितपत प्रॅक्टिकल मी सुद्धा झालोय आता, पण वाजवत राहा सोडू नकोस".

आताशा दर पंधरा दिवसांनी तो वृद्धाश्रमात जातो. पप्पांना एक ट्रायपॉडसुद्धा घेऊन दिलाय त्याने. दर पंधरा दिवसांनी ते भेटतात. कधी नुसते फोटोच काढतात, कधी गप्पाच मारतात, तर कधी गिटारच वाजवत बसतात. एकमेकांसोबत वेळ घालवतात. इतके वर्षं अपूर्ण राहिलेल्या एकमेकांच्या इच्छांचा उत्सव साजरा करतात.
-अभिषेक राऊत 

Sunday, February 10, 2019

मलानाच्या गोष्टी - भाग १



त्याच्या खांद्याला भलीमोठी ट्रेकर्सची सॅक होती. ती त्याने गाडीच्या डिकीत ठेवली. ATM मधून पैसे काढले. समोरच्या दुकानातून चार चॉकोलेट चिप कूकीस विथ एक्सट्रा चॉकोलेट सॉस उचलल्या आणि गाडीत पुढच्या सीट वर येऊन बसला. ड्रायव्हरने गाडी सुरु केली. तो स्थिरावला. कूकीजचा डब्बा त्याने डॅशबोर्डवर ठेवला. लेदर जॅकेटच्या डाव्या खिशातून सिगारेटचं पाकीट काढलं. त्यात रोलिंग पेपर होते. हलक्या हाताने त्यातला एक त्याने वेगळा केला. त्याच पाकिटाचा एक जाडसर तुकडा घेऊन त्याचा रोच तयार केलासिगरेटच्या पाकिटातली एक अर्धी सिगरेट होती त्यातला तंबाखू त्या रोलिंग पेपर वर पसरवलाउजव्या खिशातून नुकताच घेतलेला स्टफ काढला. अस्सल खवय्याने मसालेदार मटणाचा गंध घेऊन नुसतीच मान हलवून पसंतीची पावती द्यावी तसं काहीसं त्याने केलं. उजव्या हाताच्या दोन बोटांनी त्यातला थोडा स्टफ काढून , मळून त्याने तो रोलिंग पेपरवर घातला. एखाद्या हलवायाने जितक्या सराईतपणे बुंदीचे लाडू वळावे तितक्याच सहजपणे त्याने रोलिंग पेपर रोच भोवती गुंडाळला आणि रोल तयार केला. लाईटरने रोल पेटवत पहिला कश घेतला आणि तो उद्गारला , "ओह मलाना स्टफ मॅन". दुसरा कश हवेत सोडता सोडता, टिपिकल मल्याळी अक्सेंट मध्ये  मागे वळून म्हणाला, "हेय  ब्रो , यु वॉन्ट पफ ?".  अर्थातच बायकोसमोर मी स्टफ मारणार नव्हतोच. त्यामुळे चेहऱ्यावर शक्य तितके "मी नाही मारत ब्वा " असे भाव ठेवून मी नाही म्हणालो. एव्हाना आमची गाडी कसोलच्या चुंगुल मधून बाहेर पडत खडबडीत आणि वळणावळणाच्या रस्त्यावरून मलानाच्या दिशेने निघालेली होती.
तर मलाना!!!! बरंच काही ऐकलेलं या गावाबद्दल. माणूस जनरली सिमला , कुल्लू , मनाली करतो हनिमूनला. आम्ही सिमला , कुल्लू गाळलं आणि कसोलला पोहोचलो. तरीसुद्धा मलानाला जाऊ असं वाटलं नव्हतं. जमदग्निंच्याच मनात असणार पण बहुदा. नाहीतर रात्री रौंराव वाहणारी नदी सकाळी कशी दिसते हे बघायला नदीकाठाशी उतरावं काय , मग त्याच काठाने एका बाजूला टुमदार घरं आणि दुसऱ्या बाजूने उंच पाइनची झाडं बघत चालावं काय, चालता चालता आणि नदीच्या अंगावर बांधलेल्या झुलत्या लाकडी पुलांवरून कधी या काठावर तर कधी त्या काठावर करता करता दोनेक किलोमीटर दूर यावं काय , मग हमरस्त्याशी पोहोचल्यावर हात दाखवताच एका अल्टोवाल्याने  थांबावं काय , तो मलानाला चाललाय ऐकल्यावर आम्ही दोघांनी चलो फिर हमें भी ले चलो म्हणत क्षणार्धात हॉटेल ऐवजी मलानाचा रस्ता पकडावा काय. माझ्या डोळ्यांसमोरून मागचा अर्धा तास तरळला. "वैसे शादीशुदा लोग ज्यादा नहीं आते यहांपे." ड्रायव्हरच्या शब्दांनी मी भानावर आलो. "ओह यु गाईझ  आर  मॅरीड ? ग्रेटसमोरच्या सीट वरचा अचानक आयुष्याच्या सत्याची जाणीव झाल्यासारखा म्हणाला. एव्हाना त्याचा जॉईंट संपला होता. त्याने कूकीज काढल्या आणि मला एक ऑफर केली. मी नाही म्हणणार नव्हतोच. बाहेर नजर टाकली आणि मलाना जलविद्युत प्रकल्पा अंतर्गत चाललेलं काम दिसलं. विकासाच्या खाणाखुणा मागे टाकत आम्ही पुढे निघालो. डोंगर पोखरून काढलेले वळणावळणाचे खडबडीत रस्ते, त्या वळणांना "कॉम्प्लेक्स" देत तितक्याच वळणावळणाच्या पात्रातून खळाळत वाहणारी पार्वती नदी यांच्या संगतीनं आम्ही चाललो होतो.
सोबत ड्रायव्हरची कॉमेंट्री  होतीच. ड्रायवर तिथलाच कसोल जवळच्या गावातला. मलाना बद्दल , तिथल्या लोकांबद्दल, तिथल्या स्टफबद्दल तो सांगत होता. त्याला ते नेहमीचंच असावं. "अब देखो ये जो लोग  हैं अपने आप को पवित्र मानते हैं. देखा जाये तो हम भी ब्राह्मण हैं लेकिन ये खुदको हमसे भी उंचा मानते हैं."

मला आमच्याकडचे चित्पावन आठवले. हे मलानावासी म्हणजे तर थेट चित्पावनांच्या आजोबांचेच वंशज म्हणा. आमचा ड्रायव्हर तसा शिकलेला. आई वडील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक. कुल्लू मधल्या एकमात्र मोठ्या डिग्री कॉलेजातून इंग्लिशमध्ये BA केलेला. पण नोकरी नाही म्हणून कॅब चालवायला घेतली. कसोल , कुल्लू, मलाना , पार्वती वॅली सगळीकडे टूरिस्ट्सना फिरवायचं आणि फिरवत फिरवता गप्पा मारत मन मोकळं करायचं. अर्थातच कॅब चालवण्यातून पैसे बऱ्यापैकी मिळतोच पण हिमाचलच्या त्या निसरड्या , वळणदार रस्त्यांवरून गाडी चालवायची म्हणजे रिस्कच. त्याला ते हि सवयीचंच झालेलं. त्यामुळे आम्ही पार वाकून वाकून निसर्गाची उधळण पाहत असताना त्याच्या चेहऱ्यावर मात्र , "बचपनसे येही देख राहा हूं" असेच भाव असायचे.   साधारण दीड तासाच्या प्रवासानंतर आम्ही एका कमानीपाशी पोहोचलो. त्यावर लिहिलं होतं , "मलाणा गांव के लिये रस्ता".  आम्ही खाली उतरलो. समोरच्या सीट वर बसलेल्या मल्याळी मित्राची अवस्था , "आजि म्या स्वर्ग पहिला" अशी झाली होती. दोन दिवस मलाना मध्ये राहायचा प्लॅन होता त्याचा. आम्ही मात्र गावात चक्कर टाकून परत येणार होतो. आमच्या मित्राने पूजे आधी अगरबत्ती लावावी तसं एक रोल तयार केला आणि पहिला पफ मारून पुढे निघाला. मी नजर टाकली. एका छोट्याश्या टेकडीवर दोन तीन घरं होती. खास हिमाचलच्या "काथ कुनी " पद्धतीने बांधलेली. फक्त दगड आणि लाकूड यांचा वापर करून. बाकीचा गाव त्या टेकडीच्या कुशीत लपलेला होता. आम्ही कमानीसमोर उभे होतो आणि छोटीशी पायवाट आम्हाला बोलवत होती. मलानाकडे. इथली माणसं , इथली संस्कृती, इथलं जगणं याबद्दल ऐकलेलं होतं, वाचलेलं होतं आणि तेच अनुभवायला मलाना आम्हाला बोलवत होतं. पायवाटेवरून आम्ही निघालो तेव्हा दुपारचा एक वाजला होता.