Friday, November 18, 2016

म्हातारी, मी आणि वर कुठेतरी घेतलेला निर्णय



आमच्या बिल्डिंगमधून खाली उतरलात कि लगेच चौक लागतो. नेहमी गजबजलेला. अगदी प्रातिनिधिक असा. चार रस्ते चार बाजूंनी अस्ताव्यस्तपणे एकत्र येतात तिथे. एका कोपऱ्यातलं वाण्याचं दुकान फूटभर रस्त्यावर आलेलं असतंय. तिकडे तो भाज्या मांडतो. वरती लावलेल्या हिरव्या रंगाच्या दिव्याने त्या दिवसभर ताज्या दिसत राहतात. दुसऱ्या कोपऱ्यात चहावाल्याने त्याचा संसार थाटलाय. त्याने दुकानासमोर टाकलेल्या बाकड्यांवर दिवसभर गर्दी असते. एखादे टोपीवाले आजोबा, रोजंदारीवरचे मजूर, समोरच्या स्टॅन्डवरचे रिक्षावाले, काळ्या काचांच्या गाडीतून उतरणारे "गुंठामंत्री" आणि असे कित्येक जण. त्याबाजूलाच पोहे, मेदुवडा, इडली मिळते. संध्याकाळी तोच डोसे विकतो. दिवसभर माणसांच्या, गाड्यांच्या गर्दीत ओथंबणाऱ्या चौकाच्या मध्यभागी, येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होईल अशा योग्य ठिकाणी चौकाच्या नावाचा बोर्ड असतो. ती त्या चौकाची ओळख असते.
ती त्या चौकात रोज सकाळी येते. ठरलेल्या वेळेला. तिच्या हातात एक झाडू असतो आणि पाठीला मोठ्ठालं गोणपाट. चार रस्त्यांच्या कडेकडेने झाडते आणि गोळा होणार कचरा गोणपाटात भरत जाते. एका कोपऱ्यातल्या टपरीपासून सुरुवात करत. ती झाडत जाते आणि उडणाऱ्या धुळीसोबत गोळा होत जातात असंख्य गुटख्याची पाकीटं, सिगारेटींची थोटकं आणि चुरगाळून टाकलेले कागद. ती सारं काही पाठीवरच्या गोणपाटात भारत जाते आणि पुढे सरकते. पुढे सरकण्याआधी टपरीवाला तिच्या हातात एक विडी टेकवतो. वाण्याच्या दुकानासमोर ती थोडं जास्तवेळ थांबून नीटपणे झाडते. तिने रस्ता झाडल्याशिवाय तो त्याच्या ताज्या हिरव्या भाज्या मांडून ठेवत नाही. दुकानासमोरचा सगळा कचरा गोणपाटात भरल्यावर  काही वेळ त्याच्या पायरीवर रेंगाळते. गल्ल्यावर बसलेला शेठ ते पाहून उठतो. एका हाताने नाकाला लावलेला रुमाल  तसाच ठेवून दुसऱ्या हाताने दहा-वीसची एखादी नोट काढून तिच्या हातात टेकवतो. ती पुढे सरकत राहते झाडू आणि गोणपाट घेऊन. काय काय पडलेलं असतं रस्त्यांच्या कडेला. प्लास्टिकच्या पिशव्या, रात्री  भर चौकात दारू पिऊन फेकून दिलेल्या बाटल्या, चुरगाळून फेकलेली जुनी बिलं,तिकिटं, वापरून फेकलेल्या असंख्य गोष्टी ज्यात टूथपेस्टच्या संपलेल्या ट्यूबपासून ते कॉन्डोमच्या रिकाम्या पाकिटापर्यंत सगळं काही असतं. ती सगळ्यांवर आपला झाडू फिरवत जाते आणि गोणपाट भारत जाते. चौकाच्या एका कोपऱ्यात पोहे, मेदुवडे विकणारा असतो. त्याच्या आजूबाजूला नेहमी गर्दी असते. गर्दी सहजपणे तिला वाट करून देते. लोक तोंड फिरवतात, काही तोंड वाकडं करतात, काही एका हाताने आपली खाण्याची प्लेट झाकून घ्यायचा प्रयत्न करतात. ती सहजपणे पुढे जाते, कोपऱ्यात ठेवलेला कचऱ्याचा डब्बा ज्यात लोकांच्या खरकट्या प्लेट्स, प्लास्टिकचे चमचे, अर्धवट उरलेला सांबार, फेकून दिलेली चटणी असं सारं काही असतं. ते ती उचलते आणि आपल्या गोणपाटात रिकामं करते आणि पुढे जात राहते. त्याच शेजारी फुलवली आजी दुकान मांडत असते. शिळी फुलं गोणपाटात टाकून ती  पुढे सरकते. कधी कधी आजी तिच्या हातात एखादा गजरा ठेवते तेव्हा ती खुश होते. एका कोपऱ्यात उभं राहून ती स्वच्छ झालेल्या चौकाचा अंदाज घेते. निघताना तिला कधी कधी  एखाद प्लेट मेदुवडा किंवा पोहे मिळतात किंवा गरमागरम चहा करणाऱ्या पोराच्या हातून एखाद कप चहा. त्याने चहा दिला कि खूपशा प्रेमाने ती त्याच्याकडे पाहते. चहा पिऊन झाल्यावर कप ठेवताना सहजपणे ती त्या पोराच्या डोक्यावर हात ठेवून जातेकदाचित तिला तिचा नातू आठवत असावा. चहा आटोपला कि चौकाच्या एका कोपऱ्यात काळी छत्री उघडून चाम्भाराचं सामान घेऊन बसलेल्या आजोबांच्या शेजारी बसून टपरीवाल्याने दिलेली विडी ओढते. रोज सकाळी तीन चार चौक झाडून पन्नासेक रुपये कमावणारी  म्हातारी  आमच्या चौकाचं अविभाज्य अंग झालेली असते. मला वाटत असतं कचरा गोळा करणाऱ्या त्या आज्जीला आणि चौकाला एकमेकांशिवाय करमत नसेल.
 एक दिवशी नाश्ता करताना मला लक्षात येतं, एका कोपऱ्यात ती एकटीच बसलीये, रस्त्याकडे पाहत. निरपेक्ष नजरेने. मी आधी तिच्याकडे पाहतो आणि मग रस्त्याकडे. मला दिसतं रोड स्वीपिंग मशीन. दहा मिनिटात ते मशीन चारी रस्ते झाडून काढतं. धुळीचा एक कणसुद्धा उडत नाही. सगळा रस्ता स्वच्छ होत जातो. टपरीवाल्याला एक विडी द्यावी लागत नाही, शेठला उठून दहा रुपये द्यावे लागत नाहीत, चहावाल्याचा रोजचा एक फुकटचा चहा वाचतो. मला आठवतं पेपरमध्ये स्वीपिंग मशीनबद्दल वाचलेलं. वर कुठेतरी सरकारी पातळीवर निर्णय झालेला असतो आणि स्थायी समितीने असे १० मशिन्स मागवलेले असतात. सिंगापूरच्या धर्तीवर. शहरातले चाळीस चौक स्वच्छ करायला. निवांतपणे ते मशीन अक्खा चौक स्वच्छ करत पुढे जात राहतं आणि ती म्हातारी कुठल्याश्या अस्वस्थतेने कोपऱ्यात बसून राहते. मशीन दूर निघून जातं. चौक स्वच्छ झालेला असतो. म्हातारीचं गोणपाट आज रिकामं असतं. ती पूर्ण चौकात एक फेरी मारते. तिच्याकडे कुणाचंच लक्ष जात नाही. नेहमीच्या लोकांचंही नाही. ती शांतपणे चालू लागते, दूर दूर जाऊ लागते. मला जाणवतं कि अरे आपल्याला उगाचंच असं वाटत होतं कि कचरा गोळा करणारी ती म्हातारी आणि तो चौक यांना एकमेकांशिवाय करमणार  नाही.
त्यानंतर ती म्हातारी मला पुन्हा दिसली नाही. बाकी सगळं  तसंच आहे. म्हातारी कुठे तरी नामशेष झाली. शहराला सिंगापूर बनवायचं तर तेवढी काळ सोसायलाच हवी. कधी कधी असं वाटतं , उतरंडीच्या वर कुठेतरी असणाऱ्या  चार डोक्यांनी मिळून घेतलेला एखादा निर्णय फार खाली राहिलेल्या कुणाला बघता बघता कसा नामशेष करेल सांगता येत नाही.

-अभिषेक राऊत

Tuesday, September 27, 2016

दोघांच्या गोष्टी - अनोळखी



त्याने कचकन ब्रेक दाबला. आवाज करत गाडी रस्त्याच्या कडेला थांबली. थंड नजरेने तिच्याकडे पाहत तो म्हणाला "खाली उतर". तिला क्षणभर काही उमजेना. तडक बाहेर पडून त्याने तिच्या बाजूचा दरवाजा उघडला, तिला दंडाला धरून  बाहेर खेचलं आणि म्हणाला "चल नीघ माझ्या गाडीतून .. ". काही कळायच्या आत तिच्या नजरेसमोरून त्याची गाडी निघूनही गेली. अंगावर पडणाऱ्या पावसाच्या टपोऱ्या थेंबांनी ती भानावर आली तेव्हा तिला जाणवलं कि तो निघून गेलाय.

टपोरे थेंब. आता हे असेच भुरभुरत राहणार. या शहरातला पाऊस हा असाच. ठिबक सिंचनसारखा. तिला कठीण जायचं सुरुवातीला. सलग दहा मिनिटं झड लागल्यागत कोसळणाऱ्या पावसाची सवय तिला. कळायचंच नाही तिला या अशा पावसात बाहेर पडायचं कि नाही, छत्री उघडायची कि नाही, बाजूला थांबायचं की चालत राहायचं. असला पाऊस सोप्पा केला तो त्यानेच. पहिला पाऊस आला की त्याचा फोन यायचा. "खाली येऊन उभी राहा". दहाव्या मिनिटाला ती त्याच्या कारमध्ये बसायची.  ५ मिनिटं ड्राईव्ह केल्यावर गाडी मेनरोडच्या कडेला थांबायची. तिथून आत वीस पावलांवर "अमृततुल्य".
त्याचं सगळं असंच. वेळ अवेळ काही पाहणार नाही. मनात आलं कि भेटायला हजर.  त्याचा तो मनस्वीपणाच फार आवडायचा तिला तेव्हा. ती वाफाळणारा चहा प्यायची, तो सिगरेट प्यायचा आणि त्यांना बघत पाऊस ५ मिनिटं जास्तच भरभुरायचा. एकदा ती त्याला बोलली, "सिगरेट नको पीत जाऊस", ते ऐकून त्याने सिगरेट खाली फेकली आणि अशी काही चिरडली की पुन्हा त्या विषयावर त्यांचं बोलणं झालं नाही. पावसासोबत काय काय आठवेल कसला नेम नाही.
विचार करता करता क्षणभर तिने आजूबाजूला नजर फिरवली. या शहरात तिने आयुष्याची चार वर्षं काढली होती. त्या दोघांचं आवडतं ठिकाण तिथून जवळंच होतं. शांतपणे पावलं टाकत ती त्या दिशेनं निघाली.

त्याने गाडी भरधाव सोडली. तिचे शब्द त्याच्या कानात घुमत होते. घुमणाऱ्या प्रत्येक शब्दागणिक त्याच्या हाताची पकड स्टिअरिंगवर आणखी घट्ट होत होती.  वेग वाढत होता. इतक्यात समोरून येणाऱ्या गाडीचे हेडलाईट्स त्याच्या डोळ्यांना कापत गेले. त्याने झटकन स्टिअरिंग डावीकडे फिरवलं. करकचून ब्रेक दाबला. कर्कश्श आवाज करत त्याची गाडी बाजूला जाऊन थांबली. त्याने झटकन बाजूला पाहिलं. त्याला आवर घालणारी ती बाजूला नव्हती. कपाळावर जमा झालेल्या घामाच्या थेंबांनी त्याला भानावर आणलं. समोरच्या खोक्यातून टिशू काढून त्याने घाम पुसला. आपण भर रस्त्यात तिला एकटं सोडून आलोय हे त्याच्या लक्षात आलं. त्याने गाडी फिरवली. मोबाईल पाहिला. तिचा फोन नाही, मेसेजही नाही. तिचे शब्द त्याला आठवले. आताशा तो बराच शांत झालेला. त्याने गाडी बंद केली. सिगरेट पेटवली. "येईलच तिचा फोन." म्हणत दोन लांबलचक झुरके घेतले. झक मारत २०० किलोमीटर आलो आपण असं त्याला वाटून गेलं.


हा विषय आज संपायला हवाय कायमचा. तिच्या डोक्यात विचार घुमू लागले तशी तिची चाल वेगावली. त्याने ठरवायलाच हवंय. त्याला काय हवंय, कधी हवंय, कसं हवंय. बाबा म्हणायचे तसं ,आयुष्याचं टाईमटेबल रेडी पाहिजे डोक्यात. काय चूक आहे आयुष्य प्लॅन करण्यात. पूर्वी तर मी माझ्या उन्हाळ्याच्या सुट्टीचंही प्लॅनिन्ग करायचे, आयुष्य तर नक्कीच त्यापेक्षा मोठी गोष्ट आहे. वयाच्या पंचविसाव्या वर्षी हे पण करतो , ते पण करतो, तसं पण करून बघतो , असं कसं चालेल.त्याची हीच गोष्ट कदाचित तिला  गेल्या काही महिन्यांपासून खुपत होती. वेळच्या वेळी त्याला सेटल व्हायलाच लागेल. गेल्या चार वर्षांत इतका चाकोरीबद्ध विचार तिने पहिल्यांदाच केला असेल. असं नक्की काय घडलंय कि ज्यामुळे आपण इतकं सरधोपट विचार करायला लागलोय हे तिलाही उमगत नव्हतं. कदाचित, बऱ्याच वर्षांनी तिचं upbringing तिच्या विचारांतून डोकावत होतं.

आपलं upbringing different आहे. मग ही अक्कल चार वर्षांपूर्वी नव्हती का हिला. तेव्हा तर तिला सगळं छान वाटायचं. पासआऊट झाल्यावर मला भारत फिरायचाय हे ऐकून सगळ्यात जास्त तीच एक्साईट झाली होती. अचानक हे सेटल व्हायला हवंय, नोकरी करायला हवीय हे सगळं कुठून आलं. प्रत्येक वेळेस भेटलं कि हाच विषय. मग सगळी चर्चा upbringing, lifestyle वर यायची. माझ्या आयुष्याची  "to do" list नाहीये आणि तशी लिस्ट न बनवताही जगता येऊ शकतं हे हजारदा सांगूनही तिला पटायचं नाही. वाटायचंच नाही की काही वर्षांपूर्वी याच आयुष्यावर  ती फिदा झाली होती. विचारांच्या तंद्रीत त्याने गाडी त्यांच्या आवडीच्या कॉफी शॉप कडे वळवली.

ती तिथे असणार हे नक्की माहीत होतं त्याला. समोरासमोर बसले दोघं. आपापल्या परीने आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधू लागले. कदाचित दोघांना एकत्रच उत्तरं मिळाली असावीत.
ती त्याला म्हणाली, "I am sorry. Sometimes, you can’t marry your love, you have to find husband”.
तो तिला म्हणाला, "Sometimes, it is better to be wanderer than to settle down for love" आणि मग अनोळखी होऊन ते दोघे कॉफी शॉपच्या बाहेर पडले.

 -अभिषेक राऊत 

Sunday, May 29, 2016

रॅंडम रात्रीची गोष्ट



रॅंडम रात्रीचा प्रवास काळोखासोबत सुरु होतो. काळोख उतरत जातो आजूबाजूला. शांतपणे. जसं जमिनीत पाणी मुरतं तसं. काळोखासोबत प्रवास करते ती रात्र. रॅॅंडम प्रवास. वाट फुटेल तिथे जायचं. रात्रीला बंधन नाही. तिला कुणी सांगत नाही तू नको येउस इकडे. काळोख जसजसा जमिनीवर उतरत जातो तसतशी रात्र अजून काळवंडत जाते. आपणसुद्धा रात्रीसोबत बाहेर पडायचं. तिच्यासोबत चालायचं. तिच्यावर बंधनं नाहीत पण आपल्यावर आहेत. निर्बंध नसणारी रात्र म्हणूनच हवीहवीशी वाटते. रात्रीला कुठेही जाता येतं. दरी-डोंगरांत उतरता येतं. निर्मनुष्य पठारांवरून चालता येतं. रॅॅंडमपणे कुठेही कसंही. आपल्याला वाटतं रात्रीला डोळे नसतात, पण तसं नसतं. डोळे सताड उघडे ठेऊन रात्र फिरते. तिच्या उघड्या डोळ्यांना जे दिसतं ते ती पाहते. पाहते आणि पचवते. त्याचा बोभाटा करत नाही. रात्र आवडण्यामागे हे एक कारण असतं.

रॅॅंडमपणे कुठेही जाते रात्र. मावळच्या खोऱ्यात. अलगद उतरते. काळोखाचा फायदा घेऊन जमिनीशी लगट करायला आलेल्या ढगांना हलकेच चिरत जाते; त्यांच्या लगटपणाकडे बिल्कुलही न पाहता. तितक्याच सहजतेने ती फिरते इंद्रायणीच्या घाटावरून.  एकाच लयीत नादणाऱ्या मृदंगाना ऐकत. त्या रात्रीच्या जगात सारखेच असतात सगळे…घाटावर झोपलेले, फुटपाथवर झोपलेले, फलाटावर झोपलेले, सायडिंगला लागलेल्या गाडीच्या डब्ब्यात झोपलेले किंवा भल्या  महालात झोप लागत नाही म्हणून अस्वस्थ कुढणारे. रात्रीचं चांदणं उतरत जातं मशिदीच्या घुमटावर, मंदिराच्या कळसावर. तेव्हा रात्रीला कुणी तिचा धर्म नाही विचारत. मंदिराच्या पायथ्याशी ती घुटमळत नाही कारण तिला कुणी म्हणत नाही… हे  बहुजनांचं मंदिर आणि हे बामणांचं. सहजतेने ती पाहते, देवापुढे घातलेल्या गोंधळात अंगात आल्यावर मुक्तपणे नाचणार्यांकडे आणि निसर्गाच्या सान्निध्यात रंगलेल्या एखाद्या "ट्रान्स"मध्ये हेडबॅंगिंग करणार्यांकडे. गांजाच्या धुराकडे आणि कुठल्याश्या खोपट्यातल्या चुलीत अर्धवट जळणाऱ्या लाकडातून येणाऱ्या धुराकडे. रात्र साक्ष असते. फडात रंगलेल्या तमाशाला, दारू पिउन घातलेल्या गोंधळाला, तुकडे तुकडे करून फेकून दिलेल्या मृतदेहाला.… पण रात्र कधीच ह्या साऱ्याची साक्ष देत नाही. रात्र अशी रॅॅंडम असते. काहिही पाहणारी आणि पचवणारी.

याच रात्रीसोबत फिरताना, एका धोक्याच्या क्षणी आपला डोळा लागतो आणि रात्र संपते. रात्रीसोबत संपतो तो रॅॅंडमनेस. दिवस  साचेबद्ध असतो. कारण तो बांधून घेतो स्वतःला तासांमध्ये, मिनिटांमध्ये. दिवस उजाडतो आणि जे फक्त रात्रीला दिसत असतं ते सगळ्यांना दिसायला लागतं. आपणसुद्धा बांधून घेतो स्वतःला दिवसांमध्ये, वर्षांमध्ये. ठरवतो सगळं. बाविसाव्या वर्षी डिग्री, चोविसाव्या वर्षी दुसरी डिग्री, सव्वीसाव्या वर्षापर्यंत नोकरी, अठ्ठाविसाव्या वर्षी लग्न , तिसाव्या वर्षी पोरं.…. बांधून घेतो स्वतःला.….  रात्रीचा रॅॅंडमनेस जेव्हा हवाहवासा वाटतो तेव्हा चारचाकी काढून जातो लोणावळ्याला. काही तास.… छान वाटतं.  अगदी तसंच जसं "capitalism"चे सगळे फायदे घेतलेल्याला "Communism" छान वाटतो.

मला व्हायचं असतं रात्रीसारखं एकदम रॅॅंडम. पण माझ्या आजूबाजूचे मला थोपटतात. छान छान गोष्टी सांगून. नकळत माझा डोळा लागतो. मी उठलयावर पाहतो तर दिवस उजाडलेला असतो. उठलयावर ते मला सांगतात…. रात्र संपली. त्याच रात्रीसोबत, रात्रीसाठी लिहिलेली ही रॅॅंडम गोष्टसुद्धा संपली.

-अभिषेक राऊत 

Tuesday, January 19, 2016

"राठोड"

त्या दिवशी संध्याकाळी हजरत  निजामुद्दीनला जनरलचं तिकीट काढून आरक्षित डब्ब्यात चढलो तेव्हाच लक्षात आलेलं की खांडव्यापर्यंतचा किमान १६ तासांचा प्रवास आरक्षित डब्यातल्या सर्वात दुर्लक्षित जागेत बसून करावा लागणार आहे. कपाळाला गंध, हातात ४ वेगवेगळ्या खड्यांच्या अंगठ्या, अंगात काळा कोट आणि तोंडात खास बनारसी पानाचा तोबरा भरलेला TC दिसला. त्याला अत्यंत प्रेमाने, "देखो सरजी, कहां जुगाड हो रहा है तो" वगैरे विनवण्या करून पाहिल्या पण काही उपयोग नाही. शौचालयच्या बाजूच्या जागेत १६ तास काढता येतील इतका निर्ढावलेपणा शरीराच्या प्रत्येक अवयवांत आणला.  तोवर गाडीने आग्रा सोडलं होतं. फारसा त्रास होत नव्हता. अगदी टिपिकल मध्यमवर्गीय असल्याने "परिस्थितीशी जुळवून घेणं"तसं माझ्या रक्तातच. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे अक्ख्या डब्ब्यात जेवढे प्रवासी नसतील तेवढे प्रवासी "दरवाजा ते शौचालय" या भागात सहज सामावून घेतले जाऊ शकतात हे सुद्धा लक्षात आलं. एकेक स्टेशन घेत गाडी राजस्थानातल्या कुठल्याशा स्टेशनात शिरली तेव्हा रात्रीचा १ वाजला होता. अंगाचा पंचकोन किंवा षट्कोन करून मी एका कोपऱ्यात बसलेलो. टक्क जागा होतो. तेवढ्यात ते दोघे डब्ब्यात चढले.
ते दोघे. आधी तो आत शिरला. डार्क रंगाचा शर्ट, बाह्या कोपरापर्यंत खेचलेल्या, नजरेत एकाच वेळेला आत्मविश्वास, माज आणि तरीही अस्वस्थ भिरभिरणारे भाव. त्याच्या मागोमाग दुसरा. वयाने त्याच्यापेक्षा बराचसा मोठा. कदाचित फक्त वायानेच. दोघांच्या चेहऱ्यात बऱ्यापैकी साम्य. पण ते फक्त दिसण्यात. दुसऱ्याचा चेहरा तसा निर्विकार, डोळ्यांत फारशी चमक नाहीच असलंच तर कारुण्य. ते सुद्धा भरभरून नाही… त्याला आयुष्यात मिळालेल्या सुखाइतकच…अगदी कणभर.
माझ्याच पुढ्यात ते दोघे बसले. बाप-लेक. अगदी स्वाभाविकपणे मी त्या मुलाच्या बाजूला सरकलो आणि आमच्या गप्पा सुरु झाल्या.
 "राठोड  हैं हम." वाक्यावाक्यात एक प्रकारचा अभिमान आणि "राठोड"पणाची झलक. बोलता बोलता त्याने पाकीट काढलं. पाकिटात दहा-दहाच्या दोन जुनाट नोटा. आतमध्ये जपून ठेवलेला महाराणा प्रतापचा फोटो. "ये हैं हमारे वंशज और हमारे आदर्श. जिस दिन खुद का पैसा कामायेंगे उस दिन टेटू निकलवाएंगे "जय राजपुताना" नाम से. खून से रजपूत हैं  हम" ऐकता ऐकता मी मधूनच त्याच्या बापाकडे पाहायचो. त्याच्या चेहऱ्यावरची निष्क्रिय असाहायता आणि डोळ्यांतली केविलवाणी चमक "राठोड"पणाशी कुठेच जुळायची नाही. बोलता बोलता त्याला तहान लागली. बापाकडे त्याने पाणी मागितलं. एक घोट प्यायला आणि म्हणाला, "ये तो गरम हैं. पाणी ठंडा चाहिये." बाप काहीच बोलला नाही… कदाचित सवयीनुसार.….
थोड्याच वेळात कुठल्याशा छोट्या स्टेशनात गाडी थांबली. सिग्नल लागला असावा म्हणून.  त्याने पाण्याची बाटली घेतली आणि तो खाली उतरला. रात्री अडीच तीनची वेळ असावी. त्या टोकाला सार्वजनिक नळ होता. त्याने पाणी भरायला सुरुवात केली आणि गाडीने भोंगा दिला. निघण्याचा. इतका वेळ बसलेला त्याचा बाप उठला आणि दरवाजात आला. बापाच्या डोळ्यात काळजी होती. "किसने कहा था पाणी लेनेको??? आजा जल्दी ." शक्य तितक्या जोरात आणि अधिकाराने काही बोलेपर्यंत गाडीने वेग पकडला आणि नळासमोरून तो सुद्धा दिसेनासा झाला. पुढच्या दोन मिनिटांत बापाच्या डोळ्यांत मी राग, असहायता आणि हताशपणा सारं काही पाहिलं. "बिलकुल भी हमारी नहीं सुनता. हम जो कहे उसके ठीक उलटा करना हैं इसको. " वाक्य पूर्ण होतंय न होतंय इतक्यात मागच्या  डब्ब्यातून  तो आला. बापाने त्याला चार शब्द सुनावले. त्याने पाण्याची बाटली बापाला दिली  आणि म्हणाला, "ये लिजिये. पिजीये….  ठंडे हो जाइये. हम गये वहां इसलिये ठंडा पानी मिला. बैठे रहके जिंदगीभर गरम पानी नहीं पिना हैं हमें." तो माझ्या बाजूला येउन बसला. माझ्या नजरेला नजर मिळवली आणि म्हणाला,"कभी कभी हमें लगता हैं घरमें सिर्फ हम ही राठोड हैं " या वाक्यावर त्याच्या बापाकडे पहायची माझी हिंमत झाली नाही.
कुठल्याशा स्टेशनात ते दोघे उतरले. जाताना म्हणालेला "फेसबुकपे हू मैं".  मी काही त्याला पुन्हा शोधलं नाही. नावापुढे "राजे" आणि आडनावापुढे "पाटील" लावणारे पुष्कळ "पोरं" मी पाहतो कधी कधी मला त्यांच्यात तोच दिसतो. कधी कधी वाटतं आपला अंदाज चुकीचा असेल.  फक्त एक प्रश्न मला राहून राहून सतावतो कि ऐन तारुण्यात असलेलं हे "राठोड"पण कायम राहील की आयुष्यातले उन्हाळे-पावसाळे बघून त्याचाही "बाप" होईल.

-अभिषेक राऊत